आरू नीलला त्यांच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटना सांगत होती……..
“आम्ही आईबाबा परत यायची आम्ही वाट पहात होतो आणि अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आली. त्यांना हॉस्पिटल मध्ये अॅाडमिट केलंय असं आम्हाला आधी सांगण्यात आलं….पण प्रत्यक्षात दोघांच्याही डेड बॉडीज घरी आल्या. आमच्या दोघींसाठी हे खूपच शॉकिंग होतं. आमचा विश्वासच बसत नव्हता की हे आमच्या आईबाबांच्या बाबतीत खरोखर घडलंय.”
“आम्ही सुन्न झालो होतो. दिवसकार्य पार पडेपर्यंत आमचे काही नातेवाईक इथे आमच्या सोबत राहिले होते. मग हळूहळू सगळे गेले.”
“बाबांच्या बिझनेस पार्टनरनी आणि डॉ. जोशींचे धाकटे भाऊ डॉ. प्रकाश जोशी यांनी खूपच मानसिक आधार दिला आणि आर्थिक फॉरमॅलिटीज पूर्ण करायला मदत केली. हळूहळू आम्ही सावरायला लागलो. पण सगळी निघून गेल्यावर जेव्हा आम्ही दोघीच घरात राहिलो, तेव्हा वास्तवाची भीषणता आमच्या लक्षात यायला लागली. आता आम्हाला दोघींनाच जगायचं होतं, आई बाबांच्या शिवाय. आमच्या दोघींच्याही मनात खूप निराशा आणि असुरक्षिततेची भावना दाटून आली होती. पण या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढलं ते राज जिजूंनी.”
“राज जिजूंनी, म्हणजे तुझ्या दी चं लग्न झालं होतं?”
“नाही रे, राज म्हणजे ‘जे. नितीराज’ म्हणून दीच्या बरोबरच कॉलेजमध्ये शिकणारा तिचा मित्र होता. तो लास्ट इयरला होता. त्याचे कॉलेजमधले मित्र त्याला ‘नित्या’ म्हणत असत, पण दी त्याला ‘राज’ म्हणत असे, म्हणून मग आम्ही सगळे त्याला ‘राज’च म्हणत होतो. त्यानं त्याचं नाव ‘जे. नितीराज’ असं सांगितलं त्यामुळे तो साऊथचा वगैरे असावा असा आमचा समज होता. विशेष म्हणजे मराठी भाषा अगदी शुद्ध बोलायचा तो, अगदी कोकणस्थासारखा. दिसायला एकदम रूबाबदार, गोरापान, 6.15 फूट उंची, सिल्की स्ट्रेट केस, मस्त कोरीव दाढी, मिशा, एकदम हँडसम होता आणि खूप हेल्पींग नेचरचा होता तो. त्याचे डोळे भुऱ्या रंगाचे होते.”
हे बोलताना आरुचं लक्ष एकदम नीलच्या डोळ्यांकडे गेलं. ती एकदम म्हणाली, “अरे नील, डोळ्यांवरून आठवलं, तुझे डोळे नीळे आहेत ना? इतके दिवस माझ्या कसं लक्षात आलं नाही?….. अच्छा………म्हणून तुझं नांव “नील” आहे तर. तू पहिल्यांदा आलास तेव्हा तुझं नांव “नीलकांत” सांगितलंस तेव्हा माझं तुझ्या डोळ्यांकडे लक्ष नव्हतं गेलं. पूर्वी गोष्टींमध्ये मी ऐकलं/वाचलं होतं की, आपली दैवतं, म्हणजे श्रीराम, श्रीकृष्ण, हे देव नीलवर्णाचे होते आणि श्री शंकरांनी विष प्यायल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला होता म्हणून त्यांना “नीलकंठ” असे म्हणत. पण तुझे डोळे नीळे आहेत म्हणूनही तुला “नील” म्हणत असतील, हे मात्र माझ्या आज लक्षात आलं. बरं ते जाऊदे, आपण ‘राज’बद्दल बोलत होतो.”
“नशीब, आपण काय बोलत होतो ते आठवलं तुला.”
“हां, तर काय झालं, राज जेव्हा आमच्याकडे आला, तेव्हा त्याचे सिल्की केस मानेपर्यंत कापलेले होते. पण तो बोलायला लागला आणि बोलताना मान हलवली किंवा एखादी वाऱ्याची झुळुक जरी आली तरी त्याचे केस सगळ्या चेहेऱ्यावर पसरत असत. त्यावरून आम्ही दोघीही त्याची खूप चेष्टा करायचो. म्हणून त्याने अजून केस वाढवले आणि सगळ्या केसांची मस्त पोनी बांधायला सुरूवात केली. मग तर तो अजूनच हॅन्डसम दिसायला लागला, युरोपियन लोकांसारखा. बाकी त्याच्या फॅमिली बॅगराऊंडबद्दल मला काहीच माहिती नव्हती. म्हणजे तो कोणत्या गावावरून आलाय, इथलाच आहे की बाहेरचा, राहातो कुठे वगैरे वगैरे. याबाबत दीला त्यानं काही सांगितलं असेल तर मला तरी माहिती नाही.”
“By the way नील, तू पण अजून मला तुझ्याबद्दल आणि तुझ्या फॅमिली बद्दल काहीच सांगितलेलं नाहीस. तरी मला नेहा म्हणाली होती, आत्ताच त्याची सगळी माहिती विचारून घे, नाहीतर राज जीजू हरवल्यावर आपली जशी पंचाईत झाली तशी होईल.”
“काही तरीच काय बोलतेस आरू? आत्ता ही माहिती मी आपल्याला तुझ्या दीचा problem solve करायचाय म्हणून विचारतोय ना? वेळ आल्यावर मी तुला माझ्याबद्दल सर्व काही अगदी सविस्तर सांगेन. ते तुला मी आधी न सांगण्यामागे एक कारण आहे, जे मी तुला आत्ता सांगू शकत नाही. पण तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मला आत्ताच वचन दे, की माझी खरी माहिती कळल्यावर तू माझ्यावर रागावणार नाहीस, माझ्याबद्दल गैरसमज करून घेणार नाहीस, आणि मुख्य म्हणजे मला सोडून जाणार नाहीस. कारण ही माहिती लपवण्यामागं तुला फसविण्याचा माझा कोणताच हेतू नाहीये, हे मी तुला आधीच सांगून ठेवतोय. Please, तेवढा विश्वास ठेवशील ना माझ्यावर?”
“ठीक आहे, तू म्हणतोस तर ठेवते विश्वास? पण आता तू हे कधी सांगणार याची मला उत्सुकता लागून राहील ना, मग मी किती दिवस वाट पाहायची?”
“एक दोन दिवसाचा तर प्रश्न आहे. लताकडून मला खरंच बरोबर माहिती मिळाली तर आपल्या खूप प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळतील. ok? मग आता सांग पुढे काय झाले?”
“आई बाबा असताना राज दीबरोबर कधी कधी घरी येत होता. तो दोन वर्ष सिनीयर होता दीला. पण त्याला स्थापत्यशास्त्र आणि फोटोग्राफीची खूप आवड होती. त्याने देशविदेशांत फिरून खूप चांगले फोटो काढलेले होते. दीला तिची चित्रं काढायला याचा उपयोग होत असे. तो चित्रं काढायच्या बाबतीतही खूप चांगलं मार्गदर्शन करत असे. त्यामुळे त्यांचं छान ट्युनिंग जमत होतं. मी माझ्या कॉलेजच्या आनंदात व्यस्त असल्याने त्या दोघांकडे माझे फारसे लक्ष नव्हते. पण ही दुर्घटना घडली आणि आईबाबा गेल्यापासून तो सगळे दिवस आमच्या सोबत होता आणि पाहुणे निघून गेल्यावर तर तो रोज घरी येवून आम्हाला काय हवं नको विचारून, आमच्याशी थोडावेळ बोलत बसून मग घरी जात असे. त्यामुळे आम्हाला त्याचा खूप आधार वाटत असे. राज दिसायला तर खूप छानच होता, पण त्यापेक्षा त्याचा स्वभाव जास्त चांगला होता.”
आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.
आरूने एकदम त्याच्या हातावर चापटी देत त्याला विचारलं, “ए तुला आठवतंय? तू पहिल्यांदा आमच्या हॉलवर आला होतास…….तेव्हा मी तुझ्याकडे एकटक पहात राहिले होते. कारण का माहितेय ?….. तुझ्या आवाजात, चालण्यात आणि दिसण्यात मला ‘राज’जिजूंचा भास झाला. फक्त त्यांचे डोळे भुरे होते आणि उंची तुझ्यापेक्षा थोडी जास्त, केस सरळ सिल्की होते. चेहेरा थोडा वेगळा आहे. बाकी चालणं, बोलणं, लकबी यात बरंचसं साम्य जाणवलं मला. असो.”
नील म्हणाला, “खरं की काय? तरीच….. मी तुझ्या घरी पहिल्यांदा आलो तेव्हा, तुझी दी माझ्याकडे आश्चर्याने डोळे मोठे मोठे करून पहात होती….आणि काल आपण डॉ. जोशींकडे गेलो तेव्हा, तेही मला म्हणाले ना, की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. त्याचं हे कारण आहे तर. बरं सांग पुढे.”
“तर दी या धक्क्यातून हळू हळू सावरत होती. मीपण परत कॉलेजला जायला लागले. एखाद्या लहान मुलाची काळजी घ्यावी तसा राज माझी काळजी घेत असे. मला काय आवडतं काय नाही, हे बरोब्बर लक्षात ठेवून तो माझ्यासाठी आठवणीने त्या गोष्टी आणत असे.
दी मात्र पहिल्यासारखी हसती खेळती राहिली नव्हती. शांत आणि गंभीर झाली होती. माझ्या पालकत्वाची पूर्ण जबाबदारी तिने तिच्या खांद्यावर घेतली होती.
काही दिवसांनी तीही पूर्वीसारखी परत कॉलेजला जायला लागली. तिचं ते शेवटचं वर्ष असल्यानं प्रोजक्टची कामं पण चालू होती. त्यासाठी तिला आणि राजला बरेचदा बाहेर जावे लागे. पण मला घरात एकटीला सोडून ते सहसा जास्त बाहेर जात नसत. जरी गेले तरी पहाटे लवकर जाऊन रात्री परत येत असत. दी खूष राहावी म्हणून राज तिला तिच्या आवडीचे कलर्स, ब्रश, चांगले चांगले फोटोग्राफ्स आणून देत असे. राजच्या सहवासात राहून हळूहळू दी पूर्वपदावर यायला लागली. आम्हाला दोघींना आता राजच्या रोजच घरी येण्याची सवय झाली होती. खूपदा आम्ही तिघं बाहेर फिरायला, जेवायला जात असू. राज जणू आमच्या फॅमिलीचा एक भागच बनला होता.”
अजून एक गोष्ट……. तू आमच्या घरी आलास तेव्हा गुलाबी रंगांच्या गुलाबांच्या फुलांचा जो बुके आणला होतास ना, अगदी तस्साच सेम बुके, राज दीसाठी बहुतेकवेळा घेवून येत असे. दीला तो रंग खूप आवडत होता…. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातले आणि बाहेरचे सगळे दीला “चारू‘ म्हणूनच बोलत असत, मी एकटी तिला “दी” म्हणते, आणि फक्त राजच दीला “लता” म्हणून बोलवत असे. त्यामुळे तू जेव्हा सेम तसाच बुके आणलास आणि दी ला लता म्हणालास तेव्हा या दोन्ही गोष्टी तुला कशा माहित, असं मलाही त्यावेळी वाटलं होतं. म्हणूनच, तू जेव्हा तो बुके आणलास तेव्हा दीला आश्चर्य वाटलं होतं, आणि बुके दिल्यावर दी हरवली होती राजच्या आठवणींत.”
“Sorry Yaar, बरं झालं हे तूच मला सांगितलंस ते. मलाही खूप आश्चर्य वाटलं होतं ती मला मनकवडा म्हणाली तेव्हा. मला खरंच कल्पना नव्हती यामागे असं काही कारण असेल. मी जस्ट मला आवडला म्हणून तो बुके आणला. अस्सं कनेक्शन आहे तर.”
“काय रे नील तू? सारखा मधे मधे बोलतोस आणि मग माझ्या आठवणी भरकटतात ना.
तूच म्हणालास ना मला, की जसं तुला आठवेल तसं सांग म्हणून… मग मी तसंच सांगायचं प्रयत्न करतेय. ते connection बिनेक्शन मला काही माहित नाही.”
“राणीसरकार, आमची चूक झाली. आम्हाला माफ करा आणि पुढे सांगा….”
आरू सांगू लागली, “मला खूप वेळा वाटत होतं की दीला विचारावं तू राजशी कधी लग्न करतेस म्हणून, पण मला तिच्या मनाचा अंदाजच येत नव्हता.”
मला मात्र एकदा तिनं विचारलं होतं की, “आरू, तुला राज आवडतो का?” तर मी तिला “हो” म्हणाले होते. अर्थात मला तो जिजू म्हणूनच पसंत होता. मला वाटलं ती राज बद्दल सिरीअस असेल तर Final decision घेण्यापूर्वी मला पण तो पसंत आहे की नाही याचा ती अंदाज घेत असावी. नंतर तिनं कधी हा विषय काढला नाही. तसंही मोकळेपणाने बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं.”
नीलने आरूला मध्येच थांवबत विचारलं, “आरू, मला एक सांग त्यांची कधी खूप मोठ्ठी भांडणं वगैरे झाल्याचं तुला आठवतं का?”
“नाही, माझ्या समोर तर कधीच नाही. बऱ्याचदा दोघं दीच्या चित्रांच्या दालनातच बसलेले असत आणि मी माझ्या खोलीत. तिथं काही भांडणं झाली असतील तर मला माहित नाही. राज जर खूप वेळ आमच्याकडे थांबला तर जेवताना वगैरे आम्ही तिघं एकत्र असायचो. पण जेवण हसतखेळत होत असे. त्यामुळे तसं काही माझ्या बघण्यात आलं नाही.”
“तुम्ही चार वर्षापूर्वी गावी गेलात आणि तिथून राज निघून गेला तो परत आला नाही असं तुझं म्हणणं आहे. तर त्यापूर्वी लक्षात राहण्यासारखं काय घडलं होतं?”
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply