‘मला एक सांगा हौसाबाई, मागल्यावेळी म्हणजे चार वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथं आलो होतो, तेव्हा तुम्हाला नेहमीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी दिसल्या किंवा ऐकू आल्याचं आठवतंय का?
‘वेगळ्या म्हंजे?
‘म्हणजे आम्ही इथं आल्यापासून ते आम्ही परत जाईपर्यंत जे काही घडत होतं, त्यात तुम्हाला वेगळं असं काही वाटलं का? म्हणजे दीचं, माझं किंवा आमच्याबरोबर जे राज साहेब आले होते, त्यांचं वागणं किंवा बोलणं, यात नेहमीच्या वागण्यापेक्षा वेगळं किंवा विचित्र असं काही वाटलं का?
‘तसं व्हय? ….. एक गोस्ट म्हंजे तुम्ही तिघं बरोबर असताना हसून खेळून र्हात होता. पण मी दोन ते तीन वेळा ताईसाहेबांना राजसाहेबांच्या बरोबर भांडताना ऐकलं व्हतं.’
‘ते कधि ?’
’म्हणजे येकदा बगा, मी त्यांना जेवायला बोलवन्यासाठी वर माडीवर आले होते. तुमाला हाक मारल्याव तुम्ही खाली गेला. राज साहेबांना हाका मारायसाठी त्यांच्या खोलीकडं गेले तर आतून ताईसाहेब आणि राजसाहेब यांच्या भांडणाचे आवाज आले. शब्द काय कळ्ळे नाईत, पण चिडून वादावादी चा‘ीय एवडं मला कळ्ळं. मग जरा येळ थांबून मी दार वाजवलं आणि जेवनाचा निरोप दिला. मला पायल्यावर, काईच झालं नसल्यागत, हसत हसत दोगं खाली आली बगा. जसं काय आत्ता ते भांडतच नव्हते.’
‘तसं तुमा लोकांना काय हवं नको ते बगन्याशिवाय तुमच्या बोलन्यात आमी कदी लक्ष घालत नाई. पण आवाज मोठ्ठा आला म्हनून माझं ध्यान गेलं तिकडं.’
‘अच्छा. परत कधी भांडले होते ते?’
‘त्यादिशी तुमी बाहेरून फिरून आलात. तुमचा पाय मुरगाळला होता आणि तुमाला राज साहेबांनी गाडीतून उचलून आत आनलं. तवा तुमाला ताईसाहेब हाताला धरून खोलीत सोडून आल्या आणि खाली आल्यावर राज साहेबांशी भांडत होत्या. ‘आपण दोघांनी हात दिला असता तर आरू चालू शकली असती. चालू न शकण्याइतकं तिला काहीही झालेलं नव्हतं. मग तिला उचलून न्यायची काय गरज होती?’ असं काई बाई बोलत होत्या.’
‘ताईसाहेब तुमच्यावर केवडं प्रेम करत्यात, तुमची केवडी काळजी करत्यात ते मी इतकी वरसं बगतेयं नव्हं. त्यामुळं मला जरा विचित्र वाटलं त्यांचं असं बोलणं आणि भांडणं.’
‘आय सी. असं झालं तर! अजून काही वेगळं पाहिल्याचं आठवतंय का तुम्हाला? ’
‘शेवटच्या दिशी, म्हंजे 14 तारकेला तुमचा पाय मुरगळला म्हनून तुम्ही खाली झोपाळ्यावर बसून होता, आणि ताईसाहेब राज साहेबांबरोबर बाहेर निगाल्या होत्या. मला काफी आनायला थोडा उशीर झाला म्हणून मी तुमाला इथंच काफी दिली आणि ताईसाहेबांची काफी घेवून वर गेले, तेव्हा मी पायलं की, ताईसाहेबांनी तुमची बॅग उघडली होती. त्यात लाल रंगाचं कसलंतरी पाकीट होतं ते काढून घेतलं, उघडून बगितलं आणि त्यांचं तोंड एकदम लालेलाल झालं. पटकन त्यांनी ते पाकीट बंद केलं. त्यांच्या पर्समधी टाकलं आणि तुमची बॅग बंद करून त्या बाहेर आल्या. मी काफी घ्या म्हनाले तर माज्याकडं लक्ष न देता तशाच खाली निघून गेल्या. ’
‘बाहेरून परत आल्यावर मी जेवनाचं विचाराया वर गेले तर मला म्हनाल्या, ‘मला भूक नाई, इतरांना विचारून करा काय हवं ते’ आणि दार लावून घेतलं. असं त्या कधीच माज्याशी बोलल्या नव्हत्या. त्यामुळे मला लक्षात र्हायलं त्यांचं विचित्र वागनं.’
‘याशिवाय आणखी काही आठवतंय का तुम्हाला.’
‘नाय बा. पन काय आठवलं तर नक्की सांगीन.’
‘हौसाबाई, आज खूप गप्पा झाल्या तुमच्याशी. बरं वाटलं मला बोलून. बरं मी आता जाते वाड्यात आणि हो, त्या पाहुण्या मुलाच्या उपचारांसाठी आणखी काही मदत लागली तर केळकर साहेबांना सांगून त्याची सगळी व्यवस्था करा. मी तसं बोलून ठेवते केळकर काकांशी. चला मी निघते.’
असं बोलून आरू वाड्यात परत आली. समोर पडलेलं वर्तमानपत्र हातात घेवून ती बातम्या वाचण्यात मन रमवायचा प्रयत्न करू लागली. पण वाचण्यात तिचे लक्ष लागेना.
ती मनामध्ये सतत, घाटावर नीलशी बोलताना दीच्या संदर्भातील सांगितलेल्या घटना आणि हौसाबाईंनी सांगितलेल्या घटनांची, सांगड घालण्याचा प्रयत्न करत होती.
म्हणजे दीला आपल्या आणि राजच्या नात्याबद्दल संशय आला होता की काय? म्हणूनच तिनं आपल्याला राज आवडतो का असं विचारलं होतं? आणि त्या नंतरच आपल्याला राज बरोबर बाहेर असताना बुरखा घातलेली महिला आसपास दिसत होती. पण असं वाटत होतं तर तिनं बोलून दाखवलं असतं तर आपण तेव्हाच तिचा गैरसमज दूर केला असता. दी आणि राज दोघांचं प्रेम आहे, आणि आज ना उद्या ते लग्न करतील याची आपल्याला पक्की खात्री होती. आपल्यासमोर तर आपण दी आणि राजला कधीच, कोणत्याच कारणाने भांडताना पाहिले नाही, किंवा दीच्या वागण्यातून ती एखाद्या कारणाने आपल्यावर नाराज आहे असंही अधी तिनं आपल्याल्या जाणवू दिलं नाही. मग आपल्याला कसं समजणार तिच्या मनात काय चाललं होतं ते?
पण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं. मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे…. विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं.. आणि तो हौसाबाईंच्या घरातला मुलगा, त्याचे डोळे मला ओळखीचे का वाटत होते. त्याच्याही डोळ्यांत मला ओळखीची चमक दिसली होती. कोण असेल तो मुलगा?……. नक्कीच या गोष्टींचा एकमेकांशी काहीतरी संबंध असला पाहिजे. विचार करता करता झोपाळ्यावर तिला डुलकी लागली.
थोड्या वेळाने दी आणि नीलच्या आवाजाने आरूला जाग आली.
नील म्हणला, ‘आरू तू इथेच का झोपलीस? वर नाही का जायचं झोपायला?’
‘नाही रे, मला झोप येत नव्हती म्हणून इथं बसले होते पेपर वाचत, वाचता वाचता डोळा लागला.’
चहाला सगळे टेबलवर जमले. नील म्हणला, ‘चला आपण सगळे परत एकदा गढीवर जाऊन येवू’. दी म्हणाली, ‘काल एकदा बघितलीय नं सगळी गढी फिरून? मग, आता परत कशाला जायला हवं?
‘अग लता, काल मी कॅमेर्याची बॅटरी चार्ज केली नव्हती त्यामुळे मध्येच संपली. माझे खूप फोटो घ्यायचे राहिलेत. आणि ती महालातली विहीरही तुम्ही कायमची बुजवणार आहात ना? त्यापूर्वी तिचेपण फोटो काढायचेत मला. जास्तीत जास्त अर्धा तासात माझे काम होईल, मग आपण परत येवू. आणि हो लता, मला आज तुला एक सरप्राईज पण द्यायचे आहे’
लता म्हणाली, ‘सरप्राईज आणि मला? अरे व्वा. ठीक आहे मग मी पण आज तुला एक सरप्राईज द्यायचे ठरवले आहे.’
ठरल्याप्रमाणे आरूने बहाणा केला, ती म्हणली, ‘नील, मला परत एकदा गढीवर यायला आवडले असते, पण सकाळपासून माझे पोट बिघडले आहे, त्यामुळे गढीवर फिरायला माझ्या तरी अंगात ताकद नाही. तुम्ही दोघेच जाणार असाल तर जा. फक्त ते सरप्राईज काय आहे तेव्हढं मला सांगून जा ना प्लीऽऽऽऽज.’
‘सांगितल्यावर मग त्यात सरप्राईज काय राहिलं?’
‘ते ही बरोबर आहे म्हणा. मला आता ते सरप्राईज जाणून घ्यायची जाम उत्सुकता लागलीय, पण ठीक आहे, तुम्ही लौकरात लवकर गढीवर जाऊन या आणि आल्यावर मला तुम्ही एकमेकांना काय सरप्राईज दिलं ते सांगा. ओके? निघा आता.’
आरूने असे म्हणताच दी पटकन् उठली आणि नीलला म्हणाली, ‘नील मी 15 मिनीटात तयार होते. आपण जाऊ गढीवर’ आणि ती वरच्या खोलीत आवरण्यासाठी निघून गेली.
आरू आणि नीलने एकमेकांना टाळी दिली.
नील म्हणाला, ‘आरू, मी आणि लता माझ्या गाडीतून पुढे जातोय. आम्ही आधी आंबामातेच्या मंदिरात जाणार आहोत आणि नंतर गढीवर. मी केळकर काकांना सांगितलंय, अजून अर्धा तासाने ते त्यांची गाडी घेवून येतील वाड्यावर. केळकर काका, तू आणि लक्ष्मण काका एकत्रच गढीवर या.’
‘नील, जा आता आणि काम फत्ते करूनच ये.’
‘येस डार्लिंग’. असं म्हणून नीलही चेंज करायला त्याच्या खोलीत गेला.
थोड्याच वेळात दी चेंज करून खाली आली. आरू तिच्याकडे पहातच राहिली. दी ने तिच्या आवडत्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती. डोक्यात गुलाबाची फुलं, हातात गुलाबी रंगाची पर्स आणि हलकासा मेकअप. दी नेहमी तिचे केस बांधून ठेवत असे, पण आज तिने ते मोकळे सोडले होते. त्यामुळे दी अगदीच खुलून दिसत होती.
आरू म्हणाली, ‘वॉव दी, कसली गॉजस दिसती आहेत तू… एकदम छान आणि फे‘श’
दी नं स्वतःभोवती छानसी गिरकी घेतली आणि आरूला म्हणाली, ‘थॅक्यू माय डिअर सिस्टर’.
तेवढ्यात नीलही आवरून आला.
आरूला बाय करून दोघेही नीलच्या गाडीतून बाहेर पडले.
आरूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. चार वर्षांपूर्वी १४14 फेब्रुवारीला दी आणि राज जेव्हा गढीवर गेले होते तेव्हा दीनं हीच गुलाबी साडी नेसली होती. काय कनेक्शन असेल या दोन गोष्टींचं? की हे आपल्याच मनाचे खेळ आहेत? नक्कीच यामागेही काहीतरी कारण असणारच. असू दे. आता थोड्या वेळाचा तर प्रश्न आहे. आज नील दीशी बोलून खरं काय ते जाणून घेणारच आहे, असा विचार करून आरू बाहेर जाण्यासाठी आवरायला माडीवर गेली.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply