आरू तिचं आवरून खाली येवून थांबली होती. तेवढ्यात तिला आठवले की नील लक्ष्मणकाकांना सोबत घेवून ये म्हणाला होता. ती परत वाड्याच्या मागच्या बाजूला लक्ष्मणकाकांना बोलावण्यासाठी म्हणून गेली. दाराबाहेर तिला लक्ष्मणकाकांच्या चप्पल दिसल्या.
आरू त्यांना हाक मारणार एवढ्यात तिला त्यांचा आवाज ऐकू आला. “ए हौसा, आज मला लगेच धाकल्या ताईसायबांबरोबर बाहेर जाया लागणार हाय. परत याला किती येळ लागल म्हायती नाय. तर आपल्या राजसायबांना तूच वेळेत जेवाय दे बरका. मी निगतो आता, एवड्यात केळकर साहेब पन येतील.”
“बरं बरं. मी घालीन राजसायबांना वेळेत जेवया. तूमी जा बिंदास.”
हे ऐकून आरूला शॉकच बसला. हे कुणाबद्दल बोलताहेत. राजसायब म्हणजे कोण?
लक्ष्मणकाका दारातून बाहेर पडताना त्यांनी समोर आरूला पहिले आणि ते एकदम दचकलेच. “छोट्या ताईसाहेब, तुम्ही हिकडं कशाला आला, मी येतच होतो वाड्यात.”
“लक्ष्मणकाका, आत्ता तुम्ही कुणाबद्दल बोलत होतात?”
“म्हंजे, मला नाय समजलं?”
“राजसायब असं म्हणताना ऐकलं मी. हे राजसायब कोण आहेत?”
कसंनुसं हसून लक्ष्मणकाका म्हणाले, “ते व्हय. अवं आमच्या घरी एक पावना हाय,त्याचं नाव राजू हाय. पण सगळं राजासारखं त्याचं जाग्यावर कराया लागतंया नव्हं, म्हणून आमी त्याला राजासाहेब असं म्हंतो. तुमी चुकुन राजसाहेब ऐकलं असंल. बरं चला जाऊया आपण. केळकरसाहेब येतील येवड्यात.”
आरू नाराजीनंच लक्ष्मणकाकांबरोबर परत वाड्यात आली. दोघेही वाड्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन थांबले. तेवढ्यात केळकर काका गाडी घेवून पोहोचलेच.
आरू आणि लक्ष्मणकाकांना समोर बघुन त्यांनी विचारले, “हे काय, तुमच्या राजूला सोबत नाही घेतलंत? त्याला पण सोबत न्यायचंच म्हणून मी ही दुसरी मोठी गाडी घेवून आलो. म्हणजे त्यालाही मागे आरामात बसता येईल, आणि त्याची व्हीलचेअरपण सोबत नेता येईल.”
“केळकर साहेब, पण त्याला कशाला गढीवर न्यायचं? तो चालू शकेल का?”
“हो, त्याला गढीवर नेणं हा त्याच्या उपचाराचाच एक भाग आहे. डॉ. जोशींनी मला तसं सांगितलंय करायला आणि आता तुम्ही त्याच्याकडून रोज चालायची प्रॅक्टीस करून घेताच ना? गढीच्या दारापर्यंत गाडी आहेेच. मी आणि ताईसाहेब त्याला हाताला धरून पायर्या चढवून नेवू आणि तुम्ही व्हील चेअर वरती घेवून या. मग वरती तटबंदीवर तशी भरपूर जागा आहे आपल्याला राजूला व्हील चेअरवर बसवून ढकलत नेण्यासाठी. चला मी येतो तुमच्याबरोबर राजूला आणायला. ताईसाहेब तुम्ही बसा तोपर्यंत गाडीत. आणि हो हे नीलसाहेब आणि मोठ्या ताईसाहेबांना सांगायचं नाहीये बरंका, सरप्राईज आहे हे त्यांच्यासाठी.”
“ठीक आहे” म्हणून आरू गाडीत बसली. 5-10 मिनिटात केळकर काका आणि लक्ष्मणकाकांनी राजूला दोन्ही बाजूला हाताला धरून गाडीपर्यंत आणले. राजू अगदी व्यवस्थित चालत गाडीपर्यंत आला. लक्ष्मण काका जशा सूचना देतील तसे तो ऐकत होता. मग त्याला हळूच गाडीच्या मागच्या भागात बसवले. त्याची चेअर फोल्ड करून गाडीत ठेवली आणि ते सगळे गाडीत बसून गढीकडे निघाले.
“लक्ष्मणकाका, मी दुपारी आले होते तुमच्या घरी तेव्हा पाहिले मी तुमच्या या पाव्हण्याला. पण याची अशी अवस्था कशामुळे झालीय?”
“आवो, पोरांबरोबर सुरपारंब्या खेळत होता आमचा राजू, अन् झाडावर चढलेला असताना, वाळक्या फांदीवरून खाली डोक्यावर पडला, तवा एक हात मोडला त्याचा अन डोक्याला लई मार बसला, अन् तवापासून त्याची मेमरी का आय असती ती गेलीय बघा.”
“खरं सांगताय काका?, अच्छा मग कधी बरा होईल तो यातून असं डॉक्टर म्हणालेत?”
“उपचार चालू हायत ताईसाहेब. पयलं म्हंजे पार मुडद्यावानी पडून असायचा ह्यो. होईल बरा हळू हळू. पण पयल्यापेक्षा लई सुदारणा हाय बगा.”
“केळकर काका, आपण त्याच्या डॉक्टरांना भेटायला जाऊया का? म्हणजे मला कळेल त्याला नेमकं काय झालंय ते. आपण त्यांच्याकडून सगळी केस हिस्ट्री तपासून घेवू आणि त्याची फाईल पण घेवून जाते मी सोबत. आपण मुंबईच्या डॉक्टरांनापण दाखवू ती, अजून चांगली ट्रिटमेंट मिळाली तर जरा लवकर बरा होईल तो नाही का? आणि हो, केळकर साहेब, त्याच्या उपचाराचा जो काही खर्च असेल तो आपण करूया, मी तसा शब्द दिलाय हौसाबाईंना.”
“लई मेहेरबानी होईल ताईसाहेब. तसं आत्तापतुर, केळकर साहेबांनी आणि डाक्टर सायबांनी पण लय मदत केलीय आमची.”
“केळकर साहेब, तुम्ही या मुलाला आधीपासून ओळखता का? आमच्याशी कधी बोलला नाहीत याबद्दल. आम्हाला यापूर्वीच सांगितलं असतंत याच्या आजारपणाबद्दल, तर आपण मुंबईला नेवून जरा लवकर उपचार केले असते त्याच्यावर. नाही का?”
“सांगायचं राहून गेलं खरं. मी डॉक्टरांशी बोलून घेतो. पण आपले जोशी डॉक्टर पहिल्यापासूनच याच्यावर योग्य उपचार करताहेत. कधी गरज लागली तर शहरातून त्यांचे स्पेशालिस्ट मित्र येतात तपासायला. तरी पण तुम्ही म्हणत असाल तर उद्याची वेळ घेवू आपण. पण आत्ता गढीवर जाणं महत्त्वाचं आहे. नील साहेबांनी वेळेत पोहोचा असं सांगितलंय.”
“ठीक आहे. आपण आधी गढीवर जाऊ.”
थोड्याच वेळात सगळे गढीवर पोहोचले. नील आणि दी पुढे आल्यामुळे गढीचा दिंडी दरवाज्याचे कुलुप काढलेलेच होते. केळकर काका आरूला आणि लक्ष्मणकाकांना म्हणाले, “आपण इकडे येतोय आणि आपल्यासोबत राजूबाबा असणार आहे हे ताईसाहेबांना माहित नाहीये. तर आपण आवाज न करता वरती जायचंय आणि गोल महालाला लागून जी कमान आहे तिथं जाऊन थांबायचं आहे. मी सांगितल्याशिवाय कोणीही पुढे जाणार नाही. आपण फक्त ते दोघं काय बोलतात ते ऐकायचे आहे. राजूला आपण डॉक्टर साहेबांच्या सांगण्यावरून मुद्दाम सोबत आणलंय. त्याला फक्त त्या दोघांकडे बघत रहा एवढंच सांगायचं आहे हे लक्षात ठेवा. चला आपण वर जाऊया.”
मग लक्ष्मण काकांनी चेअर त्यांच्या खांद्यावर घेतली आणि पायर्या चढायला सुरूवात केली. आरू आणि केळकर साहेबांनी हात धरून राजूला वर नेले. वर गेल्यावर त्याची चेअर ओपन करून राजूला त्यावर बसवून ते कमानीखाली येवून थांबले. ते ज्या कमानीखाली थांबले तिथून नील आणि दी व्यवस्थित दिसत होते. त्यांचा आवाजही व्यवस्थित ऐकू येत होता. फक्त कमानीभोवती वाढलेल्या वेली आणि गवतामुळे गोलमहालाच्या छतावरून पटकन या सगळ्यांकडे त्या दोघांचं लक्ष जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती.
आरूला, आता काय सरप्राईज बघायला मिळणार याची खूप उत्सुकता लागून राहिली होती. नीलनं आपल्याला या सगळ्या प्लॅनबद्दल आधी का नाही सांगितलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. नीलला राजूबद्दल काय माहिती असेल? त्यानं हे आपल्याला का नाही सांगितलं? डॉक्टरसाहेबांनी उपचाराचा भाग म्हणून राजूला इथं का आणायला सांगितलं असेल? असे अनेक प्रश्न आरूच्या मनात रुंजी घालत होते. पण एवीतेवी आता ते कळणारच आहे, तर कशाला विचार करा, असं आपल्या मनाला समजावून ती समोर पाहू लागली.
समोर गोल महालाच्या छतावर नील फोटो काढत होता. दी त्याच्याकडे पाहात होती.
नील म्हणाला, “लता, तू या आधी किती वेळा या गढीवर आली आहेस?”
“खूप वेळा. बाबांबरोबर तर मी लहानपणापासून प्रत्येक वेळी इथं येत होते.”
“मग आरूला तुम्ही कधी आणलं नाही का गढी पहायला? म्हणजे तिलाही यापूर्वी या गढीबद्दल काही माहित नव्हतं म्हणून विचारलं.”
“तसं काही स्पेसिफिक असं कारण नाही सांगता येणार, पण नाही आली ती कधी इथे.”
“लता, तू जर रागावणार नसलीस तर एक विचारू? म्हणजे मला आणि आरूला तुझी खूप काळजी वाटते म्हणून विचारतोय. काल आरूशी बोललो मी, तिच्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात आलं की कोणतीतरी खूप महत्त्वाची गोष्ट तू तिच्यापासून लपवून ठेवली आहेस आणि त्या गोष्टीचा तुझ्या मनावर ताण येवून त्याचा तुला त्रास होतोय. तू जर मला तुझा खरा मित्र मानत असशील तर तुला नेमका कशाचा त्रास होतोय ते प्लीज मला तू मोकळेपणाने सांगू शकतीस.”
“काहीतरीच काय नील, मी कशाला काही लपवीन? तेही आरूपासून? नाही रे, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.”
“लता प्लीज विषय टाळू नकोस.”
मी इथं आल्यापासून बघतोय, दोन रात्री तू झोपेतून ओरडत उठलीस. तुला कशाचीतरी खूप भिती वाटत होती. मागे तुम्ही चार वर्षापूर्वी राज बरोबर इथं आला होतात आणि तेव्हापासून तो गायब आहे. त्याचाही काही शोध लागलेला नाही. आणि तू याबाबत कधीच आरूशी मोकळेपणाने बोलली नाहीस. कदाचीत याचे तुझ्या मनावर दडपण येत असेल म्हणून तुला त्रास होत असेल. जर तू तुला कशाचा त्रास होतोय ते मोकळेपणाने बोललीस तर बरं वाटेल तुला. आरूला पण तुझी खूप काळजी वाटती गं. तिच्यासाठी तरी मला सांग काय टेन्शन आहे तुला?”
“मला वाटतंय नील, तुझे फोटो काढून झाले असतील तर आपण निघूया इथून.”
नील ने कॅमेरा बॅगेत ठेवला आणि तो लताला म्हणाला, “लता प्लीज विषय टाळू नकोस. याबद्दल सविस्तर बोलण्यासाठीच मी आज तुझ्याबरोबर इथं आलोय. तुझ्या टेन्शनचा, तुझ्या अबोल राहण्याचा आणि राजच्या गायब होण्याचा या गढीशी निश्चीतच काहीतरी संबंध आहे आणि आज तू मला ते सांगणारच आहेस. त्याशिवाय आपण इथून जाणार नाही आहोत.”
“नील, तू मला काहीतरी सरप्राईज देणार होतास ना? मग हे कसले विषय काढतोस बोलायला? चल, सांगून टाक मला काय सरप्राईज आहे ते मग आपण निघू या.”
“लता राज कुठाय? तुम्ही इथं गढीवर आलात तेव्हा तुमच्या दोघांत नेमकं काय झालं ते मला जाणून घ्यायचं आहे.”
“नील, तू कशाला जुन्या गोष्टी उकरून काढतोस? मला खरंच माहिती नाही राज कुठं गेलाय ते.”
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply