राजच्या आणि नीलच्या डोळ्यातून अश्रुंचा पूर वाहू लागला……. राज नीलला… ‘माझा नील…माझा नील’ असे म्हणून परत परत मिठी मारत होता आणि नील त्याला ‘दादा…. दादा…’ म्हणत होता. तोपर्यंत आरूलापण शुद्ध आली होती. दीला उडी मारताना पाहून तीपण कठड्याच्या दिशेने ‘दीsssss… दीsssss… थांब’ असे म्हणत धावत निघाली….. पण केळकर काकांनी तिला पकडून ठेवली. ती केळकर काकांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. लक्ष्मणकाका कठड्यापर्यंत धावत आले आणि त्यांनी जोरजोरात शिट्टी वाजवायला सुरूवात केली. शिट्टीचा आवाज ऐकून राज आणि नील दोघंही दचकून लक्ष्मणकाकांकडे पाहू लागले. तोपर्यंत केळकर काका आरूचा हात घरून तिलाही कठड्यापर्यंत घेवून आले…..
त्यांनी विहीरीच्या बाजूने खाली खूण केली… खालचं दृष्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला…. खाली स्ट्रेचर… दोरखंड असे साहित्य घेवून 10-12 तगडी माणसं उभी होती आणि ती सगळी विहीरीच्या दिशेने पळत जात होती………
नील म्हणाला… ‘काका हे सगळं काय आहे?’
लक्ष्मण काका म्हणाले….. “हापण ताईसाहेब आणि राज साहेबांच्या उपचारांचा एक भाग होता…… ताईसाहेबांच्या जिवाला कायबी हुनार नाय…… त्या सुरक्षित आहेत…… खाली आपली माणसं आहेत…… ते त्यांना व्यवस्थित बाहेर काढतील…. तुम्ही कुणीबी काळजी करू नका…. चला आपण सगळे आधी खाली जाऊया मग दमानं तुमास्नी सगळं इस्कटून सांगतो……”
आरू नीलच्या मीठीत असलेल्या राजकडेपण आश्चर्यानं पहात होती….. त्याच्या एकंदर रूपावरून तो राज आहे असे तिला क्षणभरासाठीसुद्धा वाटले नव्हते….. आणि राज नीलला कसा ओळखत होता….? नील त्याला दादा…. दादा…. असे का म्हणत होता……? खाली विहिरीपाशी आधीपासूनच स्ट्रेचर, दोरखंड घेऊन लोकं कशी काय पोहोचली ? असे असंख्य प्रश्न आरूच्या मनात धिंगाणा घालू लागले. या सगळ्याच घटना इतक्या क्षणार्धात घडल्या की, याचा ताण येवून आरूला पुन्हा एकदा भोवळ आली.
राज आणि नीलचे एकाचवेळी तिच्याकडे लक्ष गेले…. पटकन दोघांनी तिला आधार दिला… मग सगळेच हळूहळू पायर्या उतरून खाली आले. तोपर्यंत खाली जमलेल्या लोकांनी दीला विहीरीतून बाहेर काढले होते. दी बेशुद्ध पडली होती… पण तिला फक्त किरकोळ खरचटल्याच्या जखमा झाल्या होता…. हे पाहून आरू आणि निललाही आश्चर्य वाटले….. स्ट्रेरचरवर ठेवलेल्या दीला पाहून राज तिच्याकडे धावत गेला….. तिचा हात हातात घेवून “लता…लता… जागी हो…. लता…..मी जिवंत आहे….लता माझ्याकडे डोळे उघडून पहा….लता लता…”
असे म्हणू लागला…. पण लता बेशुद्ध पडली होती. ती कोणताच प्रतिसाद देत नव्हती. या सगळ्याचा राजच्या मनावरही ताण पडला आणि तोही बेशुद्ध होवून तिथेच कोसळला, पण लक्ष्मण काकांनी त्याला आधार दिला.
आरू पण दी ला पाहून धावत तिच्याजवळ गेली. लताची साडी तिनं ठीकठाक केली, तिचे विस्कटलेले केस नीट केले. दीचा चेहेरा मायेने आपल्या ओंजळीत घेवून ती दीला जागे करायचा प्रयत्न करू लागली. तिला आपल्या दीची ही अवस्था पाहून खूप रडू येत होते. “दीsssss…… दीsssss, अगं डोळे उघड ना. तू माझ्यासाठी किती त्रास सहन केलास. माझ्या भविष्याच्या काळजीपोटी तू एकटीने हे सगळे सहन केलेस. माझ्याशी जरा मोकळेपणाने बोलली असतीस, तर आजचा प्रसंग आपल्यावर आलाच नसता. दी ssss मला माफ कर. आपला राज जिवंत आहे. तुझा राज जिवंत आहे. बघ ना गं एकदातरी….”
नीलने जवळ येऊन आरूला दी पासून बाजूला केले.
“आरू, आवर स्वतःला, लता आत्ता सुरक्षीत आहे, पण तिला दवाखान्यात नेणं जास्त महत्वाचे आहे, म्हणजे ती लवकर बरी होईल. हो ना? मग त्यांना घेऊन जाऊदे त्यांना.”
लक्ष्मणकाकांचा मुलगा गण्याही त्या लोकांमध्ये होता. “‘गण्या, तुला सांगितलं होतं त्यापरमानं अॅम्ब्युलन्स बाहेर तयार हाय न्हवं?”
“व्हय जी….. तुमी सांगितलं तसंच समदं केलंया… आणि अॅम्ब्युलन्स सोबत डाक्टरसाब पण बरोबर आल्यात. तुमी काय बी काळजी करू नगसा….. समदं ठीक व्हईल…. आपण लगेच ह्या दोगास्नी दवाखान्यात घेवून जाऊयात…. ए पोरांनो चला बेगी बेगी …… यांना घेवून लवकर भायेर पडा… चला……”
आरूलापण एकदम अशक्तपणा आला होता. तिचेही हातपाय लट लट कांपत होते. केळकर काका म्हणाले, “छोट्या ताईसाहेबांना असं काही बघायला लागेल याची अजिबातच कल्पना नसल्यामुळं त्यांच्यासाठी हे सगळं शॉकिंग आहे. आपण त्यांनाही दवाखान्यात घेवून जाऊ. मग डॉक्टरसाहेब काय म्हणतील त्याप्रमाणे पुढं काय करायचं ते ठरवू. नील साहेब….. तुम्ही आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, सगळा प्लॅन बरोबर पार पडला…… आपण वेळीच योग्य प्रिकॉशन घेतली म्हणून बरं झालं. चला आपण निघूया….”
लता आणि राजला अॅब्लुलन्समधे बसवून, त्यांच्यासोबत केळकर काका आणि डॉक्टरकाका पुढे निघून गेले. नील, आरू, लक्ष्मणकाका आणि त्यांचा मुलगा नीलच्या गाडीत बसून अॅब्युलन्सच्या पाठोपाठ डॉ. जोशींच्या हॉस्पिटलकडे निघाले.
*****
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टर लता आणि राजला ताबडतोब आत घेवून गेले. नील आरूला घेवून आत गेला. डॉक्टरांनी दुसर्या डॉक्टरना आरूकडे लक्ष द्यायला सांगून ते आंत गेले.
बाहेर नील, केळकर काका आणि लक्ष्मणकाका चिंताक्रांत चेहेर्याने बसून राहिले होते. केळकर काका नीलला म्हणाले, “नीलसाहेब, तुम्ही नका काळजी करू. सगळीजणं एकदम व्यवस्थित होतील. आता डॉक्टरांनी त्यांना तपासल्याशिवाय आपल्याला नेमकी परिस्थिती समजणार नाही. पण आपण योग्यवेळी त्यांना दवाखान्यात पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे आता या विषयावर विचार करणं आणि काळजी करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आरूताईंना हे सगळं समजणं कठीण जाईल. त्यांना ते समजून सांगावं लागेल. पण त्यांची मानसिक स्थिती कशी आहे ते पाहून जरा दमा दमानं त्यांना आपण हे सगळं सांगूया. तोपर्यंत वाट पाहू.”
नीलने केळकर काका आणि लक्ष्मणकाकांचे हात हातांत घेतले. त्याचा स्वर भावनावेगानं खूप दाटून आला होता. तो म्हणाला, “काका, तुम्ही सगळ्यांनी या कामात मला मदत केली नसती तर हे शक्यच झालं नसतं. फक्त लता अशा पद्धतीनं रिअॅक्ट होईल या शक्यतेचा आपण विचारच केला नव्हता. त्यामुळे मला धक्का बसला.”
केळकर काका म्हणाले, ‘असूदे नीलसाहेब, जे झालं ते झालं. तुम्ही पण आता थोडी विश्रांती घ्या. आपण नंतर बोलू या विषयावर. मी तोपर्यंत माझी बाकीची कामं आटोपून येतो. ताईसाहेब शुद्धिवर आल्या की मात्र मला लगेच कळवा बरं, आणि काही लागलं तर लक्ष्मणकाका सोबत आहेतच. गण्यापण थांबलाय बाहेर.‘
असं सांगून केळकर काका निघून गेले.
******
नर्सनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आरूला एक इंजेक्शन आणि काही औषधं दिली होती. त्यामुळे दोन तासांनी आरूला थोडं बरं वाटायला लागलं होतं.
लताला थोडंफार खरचटलं होतं. त्यावर प्राथमिक उपचार करून जखमांवर बँडेज लावलं होतं. सुदैवाने तिच्या हाडांना कोणतीच इजा झाली नव्हती. डोक्यालाही मार लागला नव्हता. पण मेंदूवर पडलेल्या अती ताणामुळे ती अजूनही बेशुद्धच होती. तिला शुद्धीवर यायला किती वेळ लागेल ते डॉक्टर सांगू शकत नव्हते. उपचार चालूच होते.
राजला, चार वर्ष सुप्त असलेल्या मेंदूवर, अचानक इतक्या घटनांचा साक्षीदार व्हायला लागल्यामुळे, प्रचंड ताण पडला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूला एकदम थकवा येवून त्याला भोवळ आली होती. शरीरातपण प्रचंड थकवा आला होता. मधल्या कालावधीत घडलेल्या इतर गोष्टींचे त्याला काहीच ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याला ताकद येईल आणि मानसिक ट्रेस कमी होईल असे औषधोपचार चालू केले होते. त्याची तब्येत सुधारण्यासाठीही काही ताकद येणारी इंजेक्शन सलाईनमधून दिली जात होती.
१४ तारखेची पूर्ण रात्र लता आणि राज डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात होते. आरूला पण अॅडमिट करून घेतलेले होतेच. बाहेर थांबलेल्या नील, गणू आणि लक्ष्मणकाकांच्या जेवणाची व्यवस्था डॉक्टर साहेबांनीच केली होती. त्यांनाही रात्री विश्रांती घ्यायला सांगितली होती.
रात्रभर डॉक्टरसाहेबांची टीम लता आणि राजच्या देखरेखीसाठी दर तीन तासांनी चक्कर मारत होती. राज ठीक होता पण लता अजूनही शुद्धीवर आली नव्हती. तिचे शरीर औषधोपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हते.
दुसरे दिवशी दुपारी लताच्यात थोडीथोडी सुधारणा दिसू लागली. ती उपचारांना थोडा प्रतिसाद देवू लागली. आता डॉक्टरांचेही टेन्शन कमी झाले. लता त्यांच्या जीवलग मित्राची मुलगी होती. त्यामुळेही त्यांना लताची काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये ते स्वतः लक्ष घालून काळजी घेत होते.
संध्याकाळपर्यंत आरूची तब्येत एकदम ठीक झाली. तरीपण एक दोन दिवस अजून तिला दवाखान्यातच थांबायला डॉक्टरांनी सांगितले. एकंदर परिस्थिती पाहून नीलने आरूची मैत्रिण नेहाला फोन करून, ते सकळे ठरल्याप्रमाणे परत येत नाही आहेत. त्यांचा गावाकडचा मुक्काम काही दिवस वाढणार आहे, तर ऑर्केस्ट्राच्या संदर्भात त्यांनी प्रॅक्टीस पुढे चालू ठेवावी. काही प्रोब्लेम आला तर मलाच फोन करा, असे सांगितले. त्यामुळे आरूपण निश्चिंत झाली.
राजपण बर्यापैकी सावरला होता. त्याला पूर्ण रिकव्हर व्हायला एक आठवडातरी सहज लागला असता. पण आता त्याला स्वतःची ओळख झाली होती. नील आणि आरूला पण त्याने ओळखले. डॉक्टर त्याच्याशी जे काही बोलतील ते त्याला समजत होते. फक्त त्याची तब्बेत सुधारून तो पूर्वीसारखा व्हायला दोन तीन महिने तरी लागण्याची शक्यता होती.
लता मात्र अजून स्वतःहून बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला अजूनही चार पाच दिवस तरी अंडर ऑब्जर्वेशन ठेवून ट्रीटमेंट द्यावी लागणार होती.
संध्याकाळचा राऊंड झाल्यावर डॉ. जोशींनी नील, आरू, राज, केळकर काका, लक्ष्मणकाका आणि गण्या या सगळ्यांना अर्धा तासाने कॉन्फरन्स हॉलमध्ये येण्यास सांगितले. आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
हॉल चांगला प्रशस्त होता. एकावेळी २० लोकं मावतील एवढा मोठा हॉल होता. आतमध्ये डॉ. प्रशांत जोशींबरोबर त्यांचे भाऊ डॉ. प्रकाश जोशी आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी सगळ्यांचे हसून स्वागत केले आणि बसायला सांगितले.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply