आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
हॉल चांगला प्रशस्त होता. एकावेळी २० लोकं मावतील एवढा मोठा हॉल होता. आतमध्ये डॉ. प्रशांत जोशींबरोबर त्यांचे भाऊ डॉ. प्रकाश जोशी आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी सगळ्यांचे हसून स्वागत केले आणि बसायला सांगितले.
आरू : डॉ. आता कशी तब्बेत आहे माझ्या दीची?
डॉ. प्रशांत जोशी : आऊट ऑफ डेंजर आहे. प्रत्यक्षात तिला शारीरिक जखमा फारशा झालेल्या नाहीत. पण गेले चार वर्ष तिनं जो मानसिक ताण सहन केला, त्याचा अचानक उद्रेक झाल्यामुळे त्याचा तिच्या मनावर खूप खोल परिणाम झाला आहे. अतिटोकाचा संताप होऊन तिच्या मेंदूत प्रचंड उलथापालथ झालीय. एकाच वेळी तुला गढीवर नेमकं काय झालं हे सगळं सांगून टाकल्यामुळं ती मोकळी झाली आणि त्याचवेळी आपल्या कृत्याचा प्रचंड मनस्ताप तिला झाला. या सगळ्यांमुळे तिला नॉर्मल परिस्थितीत यायला थोडा वेळ लागेल.
आरू : तिची स्मृती निघून नाही ना जाणार डॉक्टर? म्हणजे ती पहिल्यासारखं आम्हा सगळ्यांना ओळखू शकेल का?
डॉ. प्रशांत जोशी : हो हो, निश्चितच ती यातून पूर्ण बरी होईल. फक्त आत्ता ती आपल्याला अपेक्षित आहे तेवढा प्रतिसाद देत नसल्यामुळे थोडा जास्ती वेळ लागेल तिला रिकव्हर व्हायला. त्यामुळे या कालावधीत, तिच्याशी बोलताना, तिला कोणताही मानसिक ताण येणार नाही याची काळजी तुम्ही प्रत्येकाने घ्यायची आहे.
आरू : डॉक्टरकाका, दी छतावरून खाली विहिरीत पडल्यावर लगेच लक्ष्मणकाकांची माणसं खाली तयार होती आणि ‘हे सगळं तुमच्या सांगण्यावरून केलं, हा सगळा राजच्या उपचारांचा एक भाग होता,’ असं नील म्हणाला. मला तर काहीच समजेनासं झालंय. प्लीज मला समजेल अशा पद्धतीनं तुम्ही सांगू शकाल का?
डॉ. प्रशांत जोशी : आरू बाळा, तू एक खरंच साधीसुधी आणि निष्पाप मुलगी आहेस. एक तर तुझा तुझ्या दीवरती प्रचंड विश्वास होता. त्यामुळे तुला आम्ही आधी राज आणि दीच्यात गढीवर काय झाल होतं असं आम्हाला वाटत होतं याची कल्पना तुला दिली असती, तरी तू यावर कधीच विश्वास ठेवला नसतास. म्हणून आम्ही आमच्या या प्लॅनपासून तुला अंधारत ठेवलं.
आरू : पण डॉ. काका, गढीच्या छतावर नील जेव्हा दीला माहिती सांगत होता तेव्हा मी जे ऐकलं, ते मी बहिण असूनही दी आणि राज बद्दल मला जे माहिती नव्हतं, ते सगळं नीलला कसं माहिती होतं? तुम्ही निलला कसं काय ओळखता?
डॉ. प्रशांत जोशी : आरू बाळा, मी सगळं तुला नीट समजावून सांगतो. नील, आधी तू तुझी खरी माहिती आरूला सांग.
नील : आरू, मी तुला जेव्हा लताची सगळी माहिती विचारली, त्याचवेळी तुला कल्पना दिली होती की, ‘मी तुझ्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवली आहे आणि ती मी तुला योग्य वेळ आल्यावर सांगीन, पण तू त्याबद्दल माझ्या बाबतीत कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस, माझ्यावर विश्वास ठेव, असं वचन तुझ्याकडून घेतलं होतं.’
आरू : हो नील, माझ्या तुझ्यावर अजूनही पूर्ण विश्वास आहे. पण हे सगळं इतकं विचित्र घडलंय की माझी बुद्धीच काम करेनाशी झालीय. म्हणून मला जाणून घ्यायचंय खरं काय आहे.
नील : मी आता तुला सगळं सांगणार आहे. कारण आता ती योग्य वेळ आली आहे. मी नील जोगळेकर आहे आणि राज जोगळेकर हा माझा सख्खा मोठा भाऊ आहे.
आरू : काय? तू हे खरं सांगतो आहेस? पण राजनं तर त्याचं नाव ‘जे. नितीराज’ आहे असं सांगितलं होतं. आणि इतके दिवस तो माझ्याशी सर्व विषयांवर बोलत होता, पण त्यानं त्याच्या कुंटुंबाबद्दल कधीच मला काहीही सांगितलं नव्हतं. असं का?
नील : मी सांगतो आरू. राजनं त्याचं नाव ‘जे. नितीराज’ आहे असं सांगितलं होतं कारण त्यावेळी त्यांच्या दिल्लीतील कॉलेजमध्ये सगळीचं मुलं आपली आडनावं लावत नसत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या नावापुढं आडनावाचे अद्याक्षर लावायची फॅशन चालू केली. म्हणून तो सगळ्यांना त्याचं नांव ‘जे. नितीराज’ असे सांगत असे. म्हणून तुम्हाला कधीच त्याचे आडनाव जोगळेकर आहे हे कळले नाही. तो दिल्लीचा होता हे खरं आहे कारण आम्ही म्हणजे मॉम, डॅड, राजदादा आणि मी, आम्ही दिल्लीचेच रहिवासी आहोत.
राजदादाला मुंबईला जे. जे. मध्ये अॅडमिशन मिळाली म्हणून तो इथं मुंबईला राहायला आला. पण इतकी वर्ष आम्ही दोघं एकत्र राहिलेलो होतो. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात चैन पडत नसे. दिल्लीत असताना आम्ही दोघं रोज दिवसभरातील घडलेल्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. खूप धम्माल करायचो. पण राज इकडे आला आणि सगळी मजाच संपली. मग आम्ही ठरवले की, दिवसभर कितीही बिझी असलो तरी रोज रात्री फोन वरून आम्ही दिवसभरातल्या गोष्टी शेअर करायचो. त्यामुळं राज लताला भेटला…. त्याचं तुमच्या घरी जाणं येणं वाढलं….. तो आरूबरोबर बाहेर फिरायला जात होता… त्याचं लतावर प्रेम होतं….. इथंपासून ते …… तो १४ फेब्रुवारीला शेवटचा लताबरोबर गढीवर गेला …… इथपर्यंतची प्रत्येक गोष्ट मला माहित होती.
आरूबद्दल तो नेहमी भरभरून बोलत असे. तसेच त्याने लता आणि आरू यांच्याबरोबरचे बरेचसे फोटोपण मला मोबाईलवर पाठवले होते. आरूबद्दलची माहिती ऐकून आणि फोटो पाहून मलासुद्धा आरू आवडायला लागली होती. त्याने लताला जेव्हा प्रपोज केले तेव्हा तिनं राजला ‘तो मुंबईत सेटल होईल का?’ असे विचारले तेव्हा राज मला म्हणाला की, ‘तू आरूबद्दल काय विचार करतो आहेस? जर तुला आरू आवडली असेल तर तू पण इकडे मुंबईत अॅडमिशन घे, म्हणजे आपण दोघेही इथेच सेटल होवू.’ मी सिरीअसली यावर विचार करत होतो आणि अचानक राज गायब झाला.
त्याचा मोबाईल हेच आमच्या दोघांतील एकमेव संपर्काचे साधन होते. तो शेवटचा लताबरोबर गढीवर गेला तेव्हाही त्यानं गढीवरचा लता बरोबरचा फोटो मला पाठवला होता. त्यानंतर रात्री जेव्हा मी त्याला नेहमीप्रमाणे कॉल केला तर सतत ‘फोन बंद आहे’ असेच उत्तर येवू लागले. तुमच्या गावात रेंजचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. ती रात्र मी दर तासा-अर्ध्या तासाने राजला फोन लावत होतो. राज मुंबईला आल्यापासून इतक्या वर्षात राजनं मला फोन केला नाही असा एकही दिवस झालं नव्हतं. त्यानं माझ्याबद्दल तुम्हाला काहीच सांगितलेलं नव्हतं आणि तुम्हा दोघींपैकी कुणाचाच नंबर माझ्याकडं नव्हता. सलग तीन दिवस त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केल्यावर मला दिल्लीत स्वस्थ बसवेना म्हणून मी मुंबईत आलो.
सुदैवाने मुंबईत माझ्या शाळेतील बॅचचा सुमीत नावाचा माझा मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये नोकरीला लागला होता. मी त्याला भेटून सगळी परिस्थती सांगितली. त्यानं त्याच्या सिनीअरची मदत घेवून लताबद्दल आणि तुमच्या गावाबद्दल माहिती काढली. मुंबईतल्या खबर्यांकडून लताची बॅगराऊंड तपासली, तर तिच्या वागण्यात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. तुमच्या ऑर्केस्ट्रा मधील नेहा, ती पण राजला चांगली ओळखत होती, तिलाही भेटून मी माहिती काढायचा प्रयत्न केला. तुमच्या घरातील नोकरमाणसांकरवी माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर तिथेही काहीच हाती लागले नाही.
मग मी तुमच्या गांवी जाण्याचा बेत आखला. मी माझे नाव आणि थोडी वेषभूषा बदलून गावाकडं गेलो. तिथंही मला, ‘लता आणि राज शेवटचं एकत्र गढीवर गेले आणि लताच्या सांगण्याप्रमाणे राज तेथून रागाने एकटाच निघून गेला’ एवढीच माहिती मिळाली. मी आठवडाभर गावात राहिलो पण माझ्या हाती काहीच लागले नाही. मी राजच्या नाहीसे होण्याची कंप्लेंट पोलिसांत केली. पण त्यात लताचे नाव घेतले नाही. राजच्या गायब होण्याने मी भयंकर सैरभैर झालो होतो. त्याला कुठे शोधायचा, मला काहीच सुचत नव्हते. हे सगळं होईपर्यंत तीन वर्ष संपली. मी सारखा दिल्लीवरून राजचा पत्ता लागतो का हे शोधण्यासाठी मुंबईला येत होतो. मी खूप निराश झालो होतो. पैसा, ताकद, वेळ सगळं खर्च करूनही मी माझ्या भावाचा शोध घेवू शकलो नव्हतो.
आरू, असंच एकदा मी गाण्याचे काही अल्बम पहात असताना मला अचानक तुझा अलबम दिसला. तुला पाहिल्यावर मला राजनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवल्या आणि माझ्या मनात आलं, की इतके दिवस तुला राजबद्दल विचारायचे माझ्या कसे लक्षात आले नाही? मी याबद्दल इन्स्पेक्टर सुमीतशी बोललो. त्याला पण ही कल्पना पसंत पडली. लताकडून जर खरी माहिती काढायची असेल तर त्यासाठी तुमच्या घरात प्रवेश मिळवणं महत्त्वाचं होतं.
आरू : नील, म्हणजे तू आमच्या घरात प्रवेश करण्यासाठी माझा शिडीसारखा वापर केलास?
नील : नाही आरू, मी आधीपासूनच तुझ्या प्रेमात पडलो होतो. मग अलबमचे निमित्त काढून मी तुमच्या ऑर्केस्ट्रामध्ये सामिल झालो. प्रत्यक्ष तुझ्या सहवासात आल्यावर मी खरोखरच तुझ्या प्रेमात पडलो, आणि मी जेव्हा तुला लग्नाचं विचारलं, तेव्हा तू तुझ्या दीबद्दल सांगून मला घरी बोलावलंस. पुढं काय झालं ते सगळं तुला माहितीच आहे.
आरू, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. माझं तुझ्यावर प्रेम होतं ते मी तुला आधीच सांगितलंय. पण माझ्या भावाचा शोध घेणं हे ही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. तुझ्याकडून जेव्हा मला कळलं की, राजबद्दल तुलाही काहीच माहिती नाही आणि लता कुणालाच काही माहिती देत नाही. तेव्हा मी पुन्हा एकदा गावी जायचं ठरवलं.
आरू : पण मग डॉक्टरकाका, केळकर काका, लक्ष्मणकाका हे सगळेजण तुझ्या प्लॅनमध्ये कसे काय सामील झाले?
नील : ते ही सांगतो. मी यावेळी गावी येताना राजचा शोध घेतल्याशिवाय परत जायचेच नाही असे ठरवूनच आलो होतो. मी तुमच्या घरी वारंवार येत होतो, लताशी तासंतास गप्पा मारत होतो त्याचं तेच कारण होतं. मी लताच्या आवडत्या पेंटींग विषयावर बोलत असताना, बोलता बोलता, मी इतरही माहिती गोळा करत होतो. लताशी गप्पा मारत असताना तिनं मला डॉ. जोशी बंधू, केळकर काका, लक्ष्मणकाका आणि हौसाबाई यांच्याबद्दल बरीच माहिती दिली होती.
मी यावेळीही वेश बदलूनच डॉ. जोशींना भेटलो. त्यांना मात्र मी आरूच्या कॉलेजमधला मित्र आहे असे सांगितले. मी जुने वाडे, किल्ले, डोंगर, देवळं यावर आभ्यास करतोय त्यासाठी मला इथं महिनाभर राहावं लागणार आहे, तुमच्या ओळखीत कुठं सोय होईल तर सांगा म्हणालो. तर डॉ. जोशींनी मला तुमच्या वाड्यावर जावून लक्ष्मणकाकांची भेट घ्यायला सांगितली आणि मला काही दिवस तुमच्या वाड्यावर रहायला जागा द्यायला सांगितली आणि माझ्या जेवणाखाण्याचीही सोय करायला सांगितली. त्यामुळं माझी वाड्यावर राहायची सोय झाली. मी गावात फिरताना लोकांना, ‘मी जुने वाडे, किल्ले, डोंगर, देवळं यावर आभ्यास करतो, त्यासाठी मला माहिती द्या’ असं सांगून आजूबाजूच्या बर्याच लोकांशी ओळखी करून घेतल्या आणि राजबद्दल काही माहिती मिळते का हे पहात होतो.
एके दिवशी मी डॉ. जोशींना भेटून हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना, लक्ष्मणकाकांना राजदादाला व्हिल चेअरवर बसवून आत आणताना पाहिले आणि एका क्षणात मी त्याला ओळखले. त्याला या अवस्थेत पाहून मला आधी भोवळ आली. लक्ष्मणकाका मला ओळखत असल्यामुळे ते मला आत घेवून गेले. शुद्धीवर आल्यावर मी डॉक्टरकाकांना माझी सगळी खरी हकीकत सांगितली. मी किती वेड्यासारखा माझ्या भावाला शोधतोय आणि तो अशा अवस्थेत इथं पडलाय हे पाहून मला खूप वाईट वाटले.
पण मी राजचा भाऊ आहे हे ऐकल्यावर डॉक्टर काकांनापण आनंद झाला. ते मला राज बद्दलची सगळी माहिती सांगायला तयार झाले, पण त्यांनी मला एक अट घातली की, या बाबत मी पोलिसात काही सांगणार नाही आणि यात लताचे नाव कुठंही घेणार नाही. फक्त राजची मिसिंगची तक्रार नोंदवलेली असल्यामुळे, तो सापडला आहे एवढं तू पोलिसांना कळव.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply