लहानपणापासून प्रत्येकाला दाखवलं गेलेलं एक गोड स्वप्न म्हणजे मामाचा गाव ! सुट्ट्या पडल्या की एक ओढ लागून राहायची मनाला, कधी जायचं गावी..? सहा तासांचा तो प्रवास अगदी नकोनकोसा वाटायचा, पण गावी जायच्या ओढीने ते सहा तास कसेबसे संपावेत आणि आतुरतेने त्या घराकडे, आज्जीच्या कुशीत धाव घ्यावी असं व्हायचं. गेटमध्ये आज्जी वाट बघत असायचीच, पण पुढच्या दाराने येउ नाही द्यायची ती, मागच्या दारात बोलावून हातातला भाकरतुकडा प्रेमाने ओवाळून टाकायची अंगावरून आणि मग घरात प्रवेश व्हायचा.
ते घर प्रचंड आवडायचं मला, अजूनही आवडतं, पण पूर्वीचंच जास्त सुरेख होतं असं वाटतं आजही. छोटसं अंगण, डाव्या बाजूला बदामाचं झाड.. दुपारी तिथल्या सावलीत बसून पुस्तक वाचायला जाम आवडायचं. त्यासमोरचा पांढरा गुलाब, तिकडे गेल्यावर कायम केसांत घालायची हौस असायची मला. शेजारची जास्वंदी रोज देवघरात दिसायची. उजव्या कोपऱ्यात तुळशीचं वृंदावन. त्यालगतचा तो चौकोनी पोर्च, आणि त्या पोर्चमधल्या खांबाला लपेटून गच्चीवर गेलेला लीलीचा तो वेल. लीलीचं एखादं फूल तोडून हातात घेतलं तर त्याचं सौंदर्य जाणवत नाही, पण तीच फुलं जेव्हा गुच्छाने भरलेली असतात आणि लांबून नजरेस पडतात, तेव्हा ते दृश्य अगदी नयनरम्य असतं. आणि त्याच्या सोबतच वर गेलेला शुभ्र मोगरा सुगंधाची उधळण करायचा अक्षरशः. अगदी मला जस्सं हवं तसं घर होतं ते. आणि मुख्यतः त्या घरात आज्जी होती, आज्जीची माया होती.
लहानपणापासून आज्जी खूप हवीहवीशी वाटायची. रात्री गच्चीवर झोपायला जायची दांडगी हौस मला, पण एकुलत्या एक नातीच्या सगळ्या वेड्या हौसमौज ती पुरवायची. पहाटे बोचरा वारा अंग कापायला लागायचा पण तिच्या उबदार कुशीत तिला बिलगून झोपल्यावर थंडीची जाणीवसुद्धा व्हायची नाही. दुधावरच्या सायेसारखी माया तिची… तिच्या मांडीवर झोपून हजारो गोष्टी ऐकल्या मी. गवळणीही सुरेख म्हणायची ती. मोठी झाले तरी कित्येकदा तिने गायलेली अंगाई ऐकत झोपी जायचे.
खूप सुंदर असतं घरात आज्जी असणं. घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. तिच्या पदराआड दडलं की कसं सुरक्षित वाटतं. वेगळेच संस्कार होतात मनावर तिच्यासोबत असलं की. तुम्ही चुकलात तर प्रेमाने तुम्हाला ओरडेल, रोज संध्याकाळी देवासमोर बसून शुभंकरोती म्हणवून घेईल, मनाचे श्लोक पाठ करून घेईल, लाडू वळले की पहिला तुम्हाला देवासमोर ठेवायला लावेल आणि दुसरा तुमच्या हातात देइल, तुमचा हात हातात घेउन मंदिरात नेइल आणि तुम्ही परत निघताना निरोप घेत तुमचा गोड पापाही घेईल.
खूप आठवण येतेय तुझी आज.
आता अकरा वर्षं होतायत तू दुरावल्यापासून. पण तुझ्या आठवणींचा सुंगध आजही मनाच्या कोपऱ्यात दरवळतोय, गच्चीवरल्या मोगऱ्यासारखा..
— कल्याणी
Leave a Reply