भाळीचे सुखदुःख,ओंजळीत ओसंडले
तरीही, आज स्वच्छंदी जगावेसे वाटते
थकली गात्रे, निमाल्याही आशाकांक्षा
तरीही सुखानंदे, मस्त जगावेसे वाटते
सरता दिनराती, अंतरी आंस उद्याची
उगवता, पुन्हा नि:शंक जगावेसे वाटते
ऋतुचक्रांचे, अविरत अस्तित्व चराचरी
विनाआसक्त, कृतार्थी जगावेसे वाटते
हे माझे ते माझे, सोडुनीया स्वार्थ सारे
जगती, मुक्त, निर्मोही जगावेसे वाटते
न कुणी कुणाचे, भास सर्वत्र मृगजळी
हाच सत्यार्थ ! उमजुनी जगावेसे वाटते
शाश्वत ! केवळ पराधीनताच जीवनी
मृत्यू ! जरी सामोरी, जगावेसेच वाटते
अतर्क्य ! जरी हा प्रवास जन्ममृत्यूचा
सर्वांसोबत, मनमौजी जगावेसे वाटते
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १३१
५ – १० – २०२१.
Leave a Reply