नवीन लेखन...

प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान

प्रख्यात सरोद वादक अमजद अली खान यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून ‘स्थलांतरित’ होत होत हे वाद्य अमजद अलींच्या ‘बंगश’ घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे. वादनाची विशिष्ट पद्धत हे अमजद अली खान यांच्या वादनाचे वैशिष्ट्य. यात ते उजव्या हाताच्या बोटांच्या नखांच्या टोकांनी सूर निर्माण करतात. त्यामुळेच त्यांचे सूर संपूर्ण वैशिष्ट्यांसह श्रोत्यांसमोर प्रकट होतात आणि आपले साम्राज्य निर्माण करतात.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सरोदवादनाने भारतातीलच नव्हे, तर जगभरातील संगीतरसिकांवर ख्यातनाम सरोदवादक अमजद अली खान यांनी मोहिनी घातली आहे. म्हणून तर सरोद आणि अमजद अली खान हे समानार्थी शब्द बनले आहेत. ग्वाल्हेरमधील “सरोदघर‘ या त्यांच्या अमजद अली खान यांचा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही; अत्यंत प्रभावशाली, पुरूषी, खर्जातला आवाज ही या वाद्याची खासियत. या वाद्याला ‘पडदे’ नाहीत. वादकाचे कान विलक्षण ‘तयार’ नसतील आणि तो स्वराला पक्का नसेल तर सरोद त्याला क्षणार्धात ‘बेपरदा’ करते असे अमजद अली नेहेमी म्हणतात. वाद्याच्या ध्वनीची गुणवत्ता मु़ळातच इतकी अप्रतिम आहे, की फारशी धडपड न करताही दोन चार स्वरावली वाजवताच नाणावलेल्या सरोद वादकाला मैफिल ताब्यात घेता येते. आपल्या मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य ‘गायला’ लागावं यासाठी स्वतः अमजद अलीं खान यांनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.

मासूम अली खान उर्फ अमजद अली खान यांना आपली सुरवातीची तालीम वडिलांकडून मिळाली. त्यांचे वडील उस्ताद हाफ़िज़ अली खान हे ग्वाल्हेर राज-दरबार मध्ये प्रतिष्ठित संगीतज्ञ होते. वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली ‘अंतर्मुखता’ त्यांना परंपरेनेच मिळाली. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणार्यात ‘असुरांची’ चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी ‘चाचपणी’ करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो ‘स्थितप्रज्ञ’ भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.
अमजद अलींच्या पत्नी शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! कै. रूक्मिणीदेवींच्या ऐन उमेदीच्या काळात चेन्नईच्या विख्यात ‘कलाक्षेत्रात’ तब्बल दहा वर्षे शुभलक्ष्मींना भरतनाट्यमचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. दाक्षिणात्य संस्कृतीतही त्या पूर्णपणे रममाण झाल्या. त्यांचं तमिळ भाषेवर असाधारण प्रभुत्व आहे. अमजद अलींच्या घरातच हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा असा सुरेख मिलाफ झालेला आहे. एक कलाकार या दृष्टीने पाहता शुभलक्ष्मी याच अमजद अलींच्या आद्य समीक्षकाचे काम चोखपणे करतात, त्यांना मोलाच्या सूचनाही देतात.

आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली ‘बंगश’ जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि ‘बंगश’ घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.

सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत ‘अमर’ केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.

भारतासह विदेशातही त्यांनी संगीत मैफिली केल्या असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अमजद अली खान यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. राघव मेनन यांच्या ‘द साँग ऑफ अमजद अली खाँ’ या लेखावर आधारित / इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..