आई कुठे काय करते? ही सिरीयलआता, बाई कुठे काय करतें होत आहे कां? कधी कधी असं वाटतं की आई असाह्य झाली आहे कां?
ज्या कुटुंबात स्त्री, पत्नी, आई आदर्श असते त्याच कुटुंबात भरभराट होते.चांगल्या माणसामुळे माणसांनाही वळण लागतं व कुटुंबालाही वळण लागतं.शिस्तीतल्या कुटुंबातूनच चांगली व्यक्तिमत्वें घडतात.
आजकाल संस्काराची लक्ष्मणरषा सगळेच पाळत नाहीत. संस्कार करणारी माणसे जरी कमी झाली तरी चित्रपट, वाहिन्यांची ही जबाबदारी ठरतें की त्यांनी त्या माध्यमातून संस्कार करावेत.
पूर्वीच्या चित्रपटांनी आम्हाला हसविले, आम्हाला रडविले त्यातून सामाजिक आशय दिला, करमणूक, वैचारिक प्रबोधन केलं ते आज कुठे गेल? विषय आणि आशय नसलेल्या माध्यमातून विषयांची सध्या चलती आहे.
कुटुंबासमवेत आज काही पाहताच येत नाही. कुटुंबाकडे, प्रत्येकाच्या समस्ये कडे ही आज पाहता येत नाहीं.जो तो आपल्यात मग्न आहे.
मालिकेचा भाग कंटाळवाणा, रटाळ व्हायला लागतो तेव्हा लोक मालिका पाहायचे सोडून देतात. अगंबाई सुनबाई गरज नसताना ही मालिका प्रेक्षकावर थोपवली. अशा अनेक मालिका आहेत, ज्यांची गरजच नाही.हे पुन्हा उपकाराची भाषा बोलणार.आम्ही तुमच्या मनोरंजनात खंड पडू देणार, सांगितले कुणी यांना.आशय नसलाकी वैचारीक दारिद्र्यतेला संधी मिळते.
कुणाच्या बाबतीत काही मर्यादे नंतर संस्कार उपयोगी पडत नाहीत. काही माणसे अनिर्बंध वागतात, आपण फक्त मूकपणे पाहणं एवढंच आपल्या हातात असतं.
काहीजण वय वाढतं तसं बंधने झुगारून द्यायला लागतात.आईची पकडही ठराविक काळापर्यंत असते की काय? नंतर पती ऐकत नाही, मुले ऐकत नाहीत अशी अवस्था काही कुटुंबात येते.
संवाद आणि अभिनयात उत्तम असलेली मालिका काही घटनांमुळे घसरते की काय असं वाटतंय. अनिरुद्ध चे विवाहबाह्य संबंध प्रेक्षकांनी स्वीकारलें पण अभीला साखरपुड्याची अंगठी घालून जायला काय होतं होतं?असे अनेक प्रश्न मनात येतात,त्याने ठरवलं होतं की अनघाशीच लग्न करणार, मग एक फोन कसा काय रोखू शकतो?नैसर्गिक रित्या कथानक न संपवता वाढवायचं कसं, पाणी कसं घालायचं हाच प्रश्न निर्मात्यासमोर टी.आर.पी मुळे उभा राहतो.कुटुंबात सुख नांदूच द्यायचं नाही, वेगवेगळे प्रश्न निर्माण करायचे आणि प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायची हे थांबायला हवं.
सुखी समाधानी कुटुंब कां नाही दाखवत. उध्वस्त,अस्वथ घरे दाखवायची आणि प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायची.
घरातल्या ताईला दादा मला एक वहिनी आण, गोरी गोरी पान फुलासारखी छान हे म्हणायचे प्रसंगच येत नाहीत.ती सोय दादा करून ठेवतो एक नाही दोनची.
घरातला कर्ता पुरुष आदर्शासाठी असतो भानगडी करण्यासाठी नाही.पूर्वीच्या कुटुंबातून नैतिकता झिपायची आता भौतिकता झिरपते.
कुटुंबात सगळी नाती आजी, आजोबा, काका, मामा, काकू, चुलती, वहिनी हे सगळे दीपस्तंभ होते. दिशा दाखवायचे होकायंत्र होते. आज घरात निर्वात पोकळी आहे, कुणकडे बघून काय शिकायचं हा प्रश्न आहे.
पूर्वी घरातल्या प्रत्येक सदस्याने काहीना काही हातभार लावलेला होता म्हणूनच व्यक्तिमत्व तावून-सुलाखून निघत होती. आजकालची व्यक्तिमत्त्वे सुखावून निघत आहेत. बोलणारं कोणीच नाही.
कुटुंबात प्रेम उधळायचं असतं वाटायचं असतं, पण माणसेच कुटुंबातून नाहीशी झाली आहेत. पूर्वी कधी कधी आई वडीला पेक्षा इतरांनीही व्यक्तिमत्वें घडवलीत. कोणाला काकाने घडवलं, कुणाला चुलत भावाने घडवलं, कुणाला बहिणीने घडवले आहे, आज चार भिंती काय घडवणार?. प्रत्येक स्त्री म्हणजे स्वार्थी, लंपट, कपटी, द्वेष करणारी अशीच कां दाखवायची.हास्यअसणारी मालिका प्रेक्षक स्वीकारतात, परंतु हास्यास्पद मालिका प्रेक्षक स्वीकारत नाहीत. ट्विस्ट च्या नावाखाली मालिकेत काहीही येतं तेव्हा प्रेक्षक क्विट करतात.
तार्किकता गुंडाळून खुंटीला टांगावी म्हणलं तर आजकाल खुंट्या ही राहिलेल्या नाहीत.
समाजापुढे आज आई कुठे काय करते? हा प्रश्नच राहिला नाही. बाई कुठे काय करते? हेच दाखवून देणं सुरूआहे.नवऱ्याची दुसरी बायको कुठे काय करते? हेच दाखवून दिलं आहे.
ज्या घरात स्त्रीयांची विटंबना होते ते घर रसातळाला जातं. सिरीयल ही रसातळाला जाते.
सुखी कुटुंब सिरीयल वाल्यांना पहावतच नाही, थोडेफार ठीक चालले की मिठाचा खडा टाकायचाच. साठा उत्तराची कहाणी आणि ते एकत्र नांदू लागले असं त्यांना दाखवायला नकोच वाटतं. प्रेमप्रकरण,विरह, प्रणय, इर्षा,द्वेष,विवाह बाह्य संबंध हा मसाला वापरल्याशिवाय टी.आर.पी मिळतच नाही,हे समीकरण रूढ झाले आहे.
लिव्ह-इन पर्यंत ठीक आहे ते ही कोर्टाने आता अनैतिक ठरवलं आहे. आपले वडील एका बाईच्या घरात राजरोसपणे आपल्या कुटुंबाला सोडून राहतात हे पत्नी व मुलांनी का सहन करावें? तिला आई कां म्हणावे व कां स्वीकारावे. अशा कुटुंबातली मुलगी वहावत जाणारच. अशा कुटुंबात मुलेही स्त्रीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. स्त्री म्हणजे त्यांनाही खेळणं वाटतं. हवं ते घ्यायचं, हवं ते नाकारायचे.
मूल्यांना चिकटून राहिलेल्यांनीच आदर्श निर्माण केला आहे. धरसोडपणा हा आजच्या कुटूंबाचा स्थायीभाव झाला आहे. पती एकनिष्ठ नसलेल्या कुटुंबात सुखाचे वारे कसें वाहणार?
कुणात किती मिसळायचं, कुणात किती रत व्हायचं, कुणावर किती प्रेम करायचं याला लक्ष्मणरेषाच हवीच. उघड उघड जेंव्हा माणसे एकमेकांना स्वीकारत नाहीत तेव्हा जगणं अशक्य होतं.
कुटुंबात एकाच व्यक्तीवर प्रेम उधळून चालत नाही. कुटुंबात मी, माझा नाही तर आपण, आपले ही संकल्पना रूढ व्हायला हवी. कुटुंब माझे पण जबाबदारी ज्याची त्याची असं प्रत्येकाला वाटतं.
चांगल्या संस्काराच्या गोष्टी सर्व माध्यमातून झिरपायला हव्यात. सजीव माणसें व संस्था आता असाह्य झाले आहेत. सजीव पुतळ्यासारखे निश्चल,निशब्द होतात तेव्हा निर्जीव समूह संपर्क साधनांनीच समाज सुधारायला हवां.
— डॉ. अनिल कुलकर्णी.
Leave a Reply