प्रसिद्ध लेखक, नाटककार, पत्रकार, अनिल बर्वे यांचा जन्म १७ जुलै १९४८ रोजी पुणे येथे झाला. अगदी २२ वर्षी त्यांनी म रा नाट्यस्पर्धेसाठी दोन नाटके सादर केली. त्यात “कोलंबस वाट चुकला” या नाटकास सोविएत (Soviet Land) नेहरू पुरस्कार मिळाला. साप्ताहिक माणूस मध्ये ७०च्या दशकात “रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता” ही नक्षलवादी चळवळीचा आढावा घेणारी त्यांची लेखमाला गाजली. त्यांनी फुलवा नावाचे एक फिल्मी मासिक काही दिवस काढले पण त्यांचा मूळ पिंड डाव्या विचारसरणीचा असल्याने त्यानंतर “रणांगण” सारखे राजकीय साप्ताहिक त्यांनी काही दिवस चालवले पण जाहिरतिअभावी ते बंद पडले.
पुढे नक्षलवादी पत्रके छापल्याच्या आरोपात ते दीड वर्षे तुरुंगात होते. तुरुंगाच्या वास्तव्यात त्यांनी “थांकयु मी. ग्लाड” ही कादंबरी लिहिली. ती इमर्जन्सीच्या काळात ‘सा. माणूस’ मध्ये छापून आली व अतिशय गाजली. पुढे त्या कादंबरीवर त्यांनी प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदा या संस्थेसाठी नाटक लिहिले. तेही लोकप्रिय झाले. त्यानंतर “हमिदाबीची कोठी” हे वेश्यावस्तीतील जीवनाचे यथार्थ दर्शन देणारे नाटक विजया मेहता यांनी अशोक सराफ, नाना पाटेकर आदि दिग्गज कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणले. त्याला समिक्षकान्नी उचलून धरले.
त्यानंतर त्यांनी लिहिलेली निपुत्रीकांच्या समस्येवर‘पुत्रकामेष्टी’ (प्र.भु. डॉ प्रभाकर पणशीकर), राजकीय नेत्यांवर आधारित ‘आकाश पेलताना’ (प्र.भु. डॉ श्रीराम लागू), आणि मर्सी किलिंग वर आधारित ‘मी मालक या देहाचा” (प्र.भु. विक्रम गोखले) आदि रंगमंचावर आली. आपल्या लिखाणात अगदी वेगवेगळे विषय अभ्यास करून हाताळणे ही त्यांची खासियत होती. ‘डोंगर म्हातारा झाला’ (आदिवासी जीवन) ‘११ कोटी गालन पाणी’ (चासनाला खाणीची दुर्घटना)‘होरपळ’ (अभयारण्ये) ‘स्टडफॉर्म’, ‘फाशिगेट’ अशा विविध विषयांचा वेध घेणाऱ्या त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या.
त्यांना महाराष्ट्र शासनाचे साहित्याचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या लेखनाचे अनेक भाषांमध्ये रुपांतर झाले. त्यावर हिंदी मराठी सिनेमेही आले. अनिल बर्वे यांचे ६ डिसेंबर १९८४ ला निधन झाले. फुलवा खामकर व राही बर्वे ही त्यांची मुलं आज आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ.चंद्रकात बर्वे
Sanjivji tumchya mahiticha khup upyog hoto. khup khup dhanyawad.
बर्याच वेळा एखाद्या लेखकाची माहिती शोधताना या वेबसाइटचा उपयोग होतो. लेखनही छान असतं. धन्यवाद.