नवीन लेखन...

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

भगवद्गीता अंतरंग - Bhagavad Gita in Marathi
Bhagavad Geeta Chapter 2 Sankhya Yoga

अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग (अंतिम)

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो. अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय. इतकं पुरे होईल!!”

मागेल ते देण्याची तयारी दाखवणा-या जगजेत्त्या राजाला तो तत्त्वज्ञ नक्की काय सांगतोय….? तेच जे कृष्ण अर्जुनाला सांगतोय.

शरीर आणि शरीराच्या गरजा दोन्ही अल्पजीवी आहेत. राजाची देणगी आज आहे उद्या नाही. किंबहुना राज्यही आज आहे उद्या नाही. डोळ्यांना दिसणारे सुख कायम टिकणारे नाही कारण ते नश्वर प्रकृतीचा भाग आहे. जे कायम टिकणारे शाश्वत सुख आहे ते आहे आत्म्याचे सुख… कारण आत्मा शाश्वत आहे… ते सुख राजाच काय कोणीच देउ शकणार नाही. ते आपणच मिळवायचे असते. त्यामुळे शरीराचे मोह जोपासण्यापेक्षा आत्त्म्याचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे.

कसे आहे आत्म्याचे स्वरूप..

सांख्ययोगाच्या १७ व्या श्लोकापासून पुढे आत्म्याच्या स्वरुपाचे वर्णन श्रीकृष्ण करतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।।२।।२०।।

हा (आत्मा) कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन(अनादी) आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ।।२।।१७।। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२।।२२।। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२।।२३।।

आत्मा हा अविनाशी, शाश्वत, आणि सर्वव्यापी आहे. (श्लोक १७) तो ना जन्म घेतो ना नष्ट होतो. नष्ट होते ते शरीर. आत्मा नष्ट होत नाही, नष्ट करता येत नाही. शरीर नष्ट झाले की आत्मा दुस-या शरीरात प्रवेश करतो. जसे माणूस जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो.(श्लोक २२, २३)

तात्पर्य काय तर अज, नित्य, शाश्वत, पुराण अशा विशेषणांनी युक्त आत्मा देहामध्ये वास करून राहतो. देह, मग तो कोणताही असो जन्म, वाढ, वृद्ध्त्व आणि मृत्यु अशा अवस्थातून जातो. परंतु आत्म्याच्या स्वरूपात असे बदल घडत नाहीत. तुटणे, झिजणे, जळणे, बुडणे अशा अनेक अवस्थातून शरीर जाते याला विकार म्हणतात आत्म्याला विकार नसतात. शरीर एक दिवस नष्टही होते, आत्मा नष्ट होत नाही. तो केवळ दुसरे शरीर धारण करतो.

अशा प्रकारे मायावी सृष्टी आणि अविकारी आत्मा यांचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो.

पण मग शोक करायचा नाही हे जरी पटले तरी संहार करण्याच्या पापाचे काय? भीष्म, काय किवा द्रोण काय यांची शरीरे नश्वर आहेत हे पटले तरी यापैकी कोणालाही मारणे हे पापच नाही का? असा प्रश्न उरतोच.

श्लोक ३१ ते ३९ पर्यंत श्रीकृष्ण स्वधर्म पालनाचे महत्व सांगतो. धर्माची आणि सत्याची बाजू राखण्यासाठी युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्मच आहे. त्यासाठी करायला लागणा-या हानीत पाप नसते कारण ते धर्मपालनासाठीच असते. साधे उदाहरण घेउ यात. देशाच्या रक्षणासाठी शत्रुसैन्याशी सीमेवर लढणा-या जवानाला आपण पापी मानत नाही कारण देशाच्या, पर्यायाने समाजाच्या भल्यासाठी केलेले ते कर्तव्यपालन आहे, हत्याकांड नव्हे!

राज्याच्या हव्यासापोटी द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत अधःपतन झालेल्या राजकुळाला आणि हे घडू देणा-या समाजाला पुन्हा योग्य राज्यसंस्था देणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. त्यासाठी युद्ध करणे हे पाप नाही. याउलट सर्व मार्ग संपल्यावरच जे युद्ध उभे राहीले आहे त्यापासून दुर जाणे हे पाप ठरेल. युद्धापासून पळ काढल्याने समाजात अवहेलना होईल आणि समाजामध्ये चुकीचे आदर्श उभे राहतील. समाजाला योग्य दिशा देणारे वर्तन करणे भावी शासकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रसंगी जर युदध करावे लागले तर ते कठोरपणे करणेच योग्य आहे. त्यावेळी क्षत्रियाने सामुहिक हिताऐवजी वैयक्तीक नातीगोती पाहून कमकुवत होणे हे पाप आहे. हे झाले अर्जुनाच्या दुस-या शंकेचे उत्तर.

सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचे स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म याच्या चर्चेतून श्रीकृष्ण अर्जुनाला हे पटवून देतो की – दुर्योधन, दुःशासन किंवा तो स्वतः या केवळ योग्य किंवा अयोग्य मनोवृत्ती आहेत. समाज कधी योग्य तर कधी अयोग्य मनोवृत्तींकडे झुकत असतो. कधीतरी अयोग्य बलवान असते आणि समाज त्यामागे धावतो. जसे आजही दुर्योधनाच्या मागे ११ अक्षैहीणी सैन्य आहे पुढे जेव्हा अर्जुन, पर्यायाने पांडव विजयी होतील तेव्हा ते योग्य मानून समाज त्याच्या मागे धावेल. जसे सृष्टीतील सुख, दुःख,स्पर्श, रस, गंध आणि शरीरही नाशवंत आहेत तसेच योग्य आणि अयोग्य वृत्तीही नाशवंत आहे. कारण त्या वृत्ती जपणारे माणसाचे मन चंचल असते. आज जे योग्य आणि हवेसे वाटते ते त्याला उद्या अयोग्य आणि नकोसे वाटू शकते. या मनाच्या चंचलतेवर विजय मिळविणे आवश्यक आहे. कारण एकदा मन स्थिर झाले की मग ते योग्य तेच पाहते आणि योग्य तेच करते. हे मनाचे स्थैर्य म्हणजे अर्जुनाच्या शंकेचा तिसरा भाग. कारण अर्जुनाचे मन स्थिर झाले की त्याला युद्ध योग्य की अयोग्य तेही कळेल आणि योग्य ते तो ठामपणे करूही शकेल. किंबहुना मन स्थिर झाले की सर्व प्रश्नच सुटतील आणि आत्मसुखही साध्य होईल हेच कृष्णाला पटवून द्यायचे आहे. तुकोबा म्हणतात तसे –

मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धिचे कारण।।

गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संदर्भात एक कथा सांगतात. जंगलातून प्रवास करत असताना ते एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील…”

संन्यस्त आणि गृह्स्थ हे मनाचे खेळ आहेत. ज्याचे मन स्थिर असते तो गृहस्थ असूनही संन्यस्त असू शकतो आणि ज्याचे मन स्थिर नाही तो संन्यस्त गृहस्थच राहतो.

स्थितप्रज्ञ……… प्रज्ञा म्हणजे बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर/ठाम. ज्याची बुद्धी स्थिर असते तो स्थितप्रज्ञ. ज्याच्या विचार आणि कृतीमध्ये द्वैत नसते तो स्थितप्रज्ञ.

दुस-या अध्यायाच्या ५४ व्या श्लोकापासून स्थितप्रज्ञाचे वर्णन येते. मनाची स्थिरता प्राप्त असणारा आणि बुद्धीयोगाने कर्म करणारा स्थितप्रज्ञ असतो कसा? याचे कुतुहल अर्जुनाला असते. तो कृष्णाला विचारतो आणि कृष्ण त्याचे वर्णन करतो

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २।। ५६ ॥

दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो.

हे वाचायला जितके सोपे तितकेच आचरणात आणण्यास कठीण आहे. कारण

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः। इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥२।। ६० ॥

दुःखाच्या प्रसंगी खेद न वाटता राहणे एकवेळ शक्य आहे परंतु सुखाची इच्छा न करणे अवघड नाही का? माणसला दुःख टोचते म्हणून नको असते पण दुःखाबरोबर सुखही क्षणिक आहे म्हणून ते ही टोचावे आणि नको वाटावे अशा मनस्थिती प्राप्त करणे सोपे नाही. कारण अर्थातच बलवान अशी इंद्रिये माणसाच्या मनाला निरनिराळ्या मोहाच्या मार्गाने खेचत असतात.

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः। इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥२।। ५८ ॥

कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो.

म्हणूनच सर्वसामन्य माणसाला भूरळ पाडणारे मोह त्याला बाधत नाहीत. त्याचे मन आणि शरीर केवळ एकाच विचारात मग्न होते, ते म्हणजे शाश्वत आनंद जो क्षणिक सुख आणि दुःख यांच्याही पुढील पातळीवर असणारा मोक्ष आहे.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥२।।६४ ॥

परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.

अशा स्थितीला श्रीकृष्ण ब्राह्मी स्थिती म्हणजेच ब्रह्मप्राप्तीची स्थिती म्हणतो.

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥२।।७२ ॥

उपसंहार

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा गीतेचा अद्धितीय ठेवा आहे कारण गीतेशिवाय इतर कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेख येत नाही.

गीतेच्या अंतरंगात डोकावल्यास असं लक्षात येतं की दुसरा अध्याय हा गीतेचा तत्त्वज्ञानातील पहीला अध्याय आहे आणि गीतेचे संपुर्ण सार सांगणारा अध्याय सुद्धा आहे. अर्जुनापुढे उभ्या असणा-या प्रश्नांचा रोख हा केवळ युदधाकडे नसतो तर अर्थातच शाश्वत आनंदाकडे असतो. या एका अध्यायातून श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे समाधान उभे करतो.

शाश्वत सुख हवे तर, या सृष्टीत शाश्वत आणि क्षणिक काय आहे ते जाणले पाहीजे. सांख्य मतानुसार दृष्य सृष्टी ही क्षणिक आहे तर आत्मा शाश्वत आहे.

क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत त्या क्षणिकातून बाहेर येत नाही तो पर्यंत शाश्वत सुख मिळणार नाही. क्षणिकातून बाहेर येणे म्हणजेच क्षणिकात गुंतवणारे सुख आणि दुःख यातून बाहेर येणे.

सुख आणि दुःखातून बाहेर येणे म्हणजेच हर्ष आणि शोक दोन्हीकडे समभावाने पहाणे आणि त्याचा त्याग करणे. समभाव हवा तर इंद्रियांवर संयम हवा.

इंद्रियांवर संयम हवा असेल तर मन ताब्यात हवे आणि मनावर ताबा मिळवणे म्हणजेच बुद्धीने मनावर विजय मिळविणे.

ही बुद्धी प्राप्त करणारा स्थितप्रज्ञ होतो.

ज्याची बुद्धी स्थिर असते तो सुखी होतो कारण ते सुख आपल्यात असते, बाह्य पदार्थात नसते हे त्याला उमगलेले असते. मग त्याच्या कर्माची फळे त्याला बाधत नाहीत. सुख आणि दुःख दोन्ही त्याला उपभोगता येतात आणि त्यांच्या पलिकडेही जाता येते. जसा भक्त आणि भगवंत एक होतो तसा ब्राह्मी स्थितीत गेलेला व्यक्ती परमानंदी लीन होतो.

असा मनोविजय मिळविणा-याचा आनंद पाडगांवकरांच्या एका कवितेतून तंतोतंत व्यक्त होतो.

आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी ।अमृताचा चंद्रमा भाळी उगवला हो।। फुलांचे केसरा घडे चांदण्याचा संग ।आज अवघे अंतरंग ओसंडले हो।। मिटूनही डोळे दिसू लागले आकाश ।आज सारा अवकाश देऊळ झाला हो।। काही न बोलता आता सांगता ये सारे । आतली प्रकाशाची दारे उघडली हो ।।

— शीतल उवाच 

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

Avatar
About शीतल उवाच 5 Articles
एका देशात जन्म, दुस-या देशाचा नागरीक, तिस-याच देशात स्थायिक, २० वर्षांचे करीअर, ४ देशात नोकरी, १० हून अधिक देशात मुसाफीरी, ४ भाषांची ओळख. शिक्षक, व्यवसायिक, भाषांतरकार, हौशी गाईड, वाचक, श्रोता, वाचाळ, खादाड… मी एक अनेक…शीतल रानडे sheetaluwach.com
Contact: Website

2 Comments on अंतरंग – भगवद्गीता – सांख्ययोग ( स्थितप्रज्ञ)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..