समुद्राचं आकर्षण कोणाला नसतं? समुद्र आणि त्याचं अथांगपण हे मानवी आयुष्याला वेढून टाकणार आहे. आपण सामान्य माणसं आपलं सरळसोट आयुष्य जगत असतो, त्यावेळी समुद्रावर, तेथील जहाजांवर असणारे दर्यावर्दी, त्यांचं पाण्यावर तरंगणारं जीवन कसं असेल याचंही एक सुप्त आकर्षण आपल्या मनात असतं. समुद्रावरील जहाजे महिनोंमहिने त्या अथांग प्रवाहावरून दूरदेशी जात असतात. त्या आयुष्यात आव्हाने आहेत, साहस आहे, रोमांचकारी अनुभव आहेत. जमिनीपासून दूर जाऊन खूप मोठा काळ काढणं हा विचारच किती रोमांचक आहे. अशा सागरी जीवनाचे चित्र रेखाटणारी दोन पुस्तके अशाच प्रकारचे अनुभव व माहितीचा विलक्षण खजिना आपल्यासमोर ठेवतात.
प्रथम रामदास म्हात्रे यांची “सातासमुद्रापार” व “फ्लोटिंग लाइफ इन मर्चंट नेव्ही” ही दोन पुस्तके देखण्या स्वरूपात ठाण्याच्या सृजनसंवाद प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. “मराठीत वेगळ्या विषयावरची पुस्तके प्रकाशित होत नाहीत किंवा मराठी लेखनातील अनुभवविश्व कोंदटलेले आहे, नवीन अनुभवांना स्पर्श करणारे लेखन मराठीत नाही” अशा विचारांना पूर्ण छेद देतील अशी ही दोन पुस्तके आपल्याला एका वेगळ्या अपरिचित जगाचं दर्शन घडवतात. सातासमुद्रापार व द फ्लोटिंग लाइफ इन मर्चंट नेव्ही या दोन पुस्तकांना अनुक्रमे कवी अरुण म्हात्रे व कॅप्टन वैभव दळवी यांच्या प्रस्तावना आहेत. या दोन्ही प्रस्तावना आशयपूर्ण, वाचनीय व पुस्तकाचे मर्म सांगणार्या आहेत. लेखक प्रथम रामदास म्हात्रे हे इंजिनियर आहेत आणि लेखक, कवींकडे असणारी मर्मदृष्टीही त्यांच्याकडे आहे. समोरचा प्रसंग बारीक-सारीक तपशीलातून जिवंत करण्याचं कसब त्यांच्याकडे आहे आणि मुख्य म्हणजे लेखकाकडे असणारी संवेदनशीलताही त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच ह्या वेगळ्या प्रकारच्या दोन पुस्तकांत ते प्रभावीपणे अनुभवांची मांडणी करू शकले आहेत. त्याच वेळी समोरच्या घटितांकडे बघण्याचा एक तटस्थ भाव त्यांच्याकडे आहे. मुळात त्यांचे त्यांच्या कामावर विलक्षण प्रेम आहे, त्यात समरसता आहे . समुद्रावरची नोकरी, त्यातली आव्हानं यातून मिळणारे लाभ व त्याचवेळी कराव्या लागणार्या तडजोडी, त्याग यांचा सांगोपांग विचार करून त्यांनी या नोकरीत प्रवेश केला. त्यांच्या स्वभावात एक झोकून देण्याची वृत्ती आहे तसंच काम करताना तपशीलात जाण्याचा, खोलवर जाण्याचा स्वभाव याचं दर्शन दोन्ही पुस्तकांमधून घडतं.
सातासमुद्रापार या पुस्तकाचे वर्णन कवी अरुण म्हात्रे म्हणतात त्याप्रमाणे ‘शांत समंजस जहाज आख्यान’ असे करता येईल. पण हे आख्यान लेखकाने ललितरम्य भाषेत केले आहे. जहाजावरचे हे नोकरीपर्व प्रांजळपणे शब्दबद्ध केले आहे. यातील सर्वच लेखांची शीर्षके आपल्याला अपरिचित वाटणारी आहेत. सर्व शीर्षकांमध्ये इंग्रजी शब्द आहेतच. ते असणं अपरिहार्य देखील आहे. त्यानिमित्ताने एक वेगळा शब्दकोशही आपल्यापुढे उलगडला जातो. रेस्क्यू, मसिना स्ट्रेट, ग्राउंडींग, वेकअप कॉल अशा प्रत्येक लेखांत त्याविषयीचे चित्र आहे. आॅनबोर्ड सरदार, ब्लॅक मॅजिक आॅन बोर्ड, फायर अॉन बोर्ड अशा प्रकारच्या शीर्षकांची मग आपल्यालाही सवय होऊन जाते. ‘मर्चंट नेव्ही रियालिटी’ या पहिल्या लेखाने सुरुवात होते तेव्हा मराठी वाचकांना फारसे परिचित नसलेले विश्व समोर येते. कुठल्याही गोष्टीची थेट, इत्यंभूत माहिती लेखक देतोआणि हे फक्त माहिती देणे यापुरते सीमित नाही. त्याच्या मागे पुढे असणारे संदर्भ व त्यातून मिळणारा अनुभव, त्यात मिसळलेल्या मानवी अनुभवांचे, भावनांचे तरल चित्रण इथे येते. काही ठिकाणी तो प्रसंग, अनुभव रंगून सांगताना वाचकाच्या डोळ्यांसमोर चित्र उभे करणारी सक्षम भाषाशैली लेखकाला अवगत आहे. उदाहरणार्थ ‘स्पॉटलाईट’ या लेखातील वर्णन हे वर्णन पहा, “जहाजापासून थोड्या अंतरावर एक मोठा देव मासा त्याची मोठी मोठी शेपटी पाण्याबाहेर काढून हळुवारपणे आपटत होता. त्यामुळे उठणारे जलतरंग आणि त्यावर काळ्यापांढर्या ढगांच्या आडून बाहेर पडणारे सोनेरी प्रकाशाचे झोत मोहक दिसत होते. अथांग निळ्या समुद्राच्या रंगमंचावर देव मासा आपली कलाकारी दाखवत होता आणि वरून साक्षात सूर्यदेव त्याच्यावर स्पॉटलाईट मारत होता”
‘डबल डेकर’ या लेखात म्हटले आहे, “टायटॅनिक आणि त्यासारख्या हॉलीवुड पिक्चरमध्ये जहाजावरचे आयुष्य दाखवले गेले. पण वास्तविकतेत जहाजावरील आयुष्य हे त्यापेक्षाही कठीण कष्टप्रद आणि धोक्याचे आहे हेच खरे” आणि लेखकाच्या या वाक्याचा प्रत्यय आपल्याला अनेक लेखांमधून येत राहतो. 440 व्होल्ट आणि हजारो किलोवॅट पाॅवर या सगळ्यांमध्ये अतिशय सांभाळून आणि काळजीने काम करणारी माणसे इथे आहेत. प्रत्येक लेखातून साद्यंत माहिती देण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. कुठलीही माहिती वरवरची नाही, त्याच्या मागे कष्ट, परिश्रम आहेत. इमारतीसारख्या दिसणाऱ्या मजल्यांना जहाजाचे अकोमोडेशन म्हणतात, तर त्याखाली असते ती इंजिनरूम अशी काही सूक्ष्म निरीक्षणे नोंदवतानाच एखादे महत्त्वपूर्ण विधान लेखक करून जातो. “द मोस्ट स्पोकन लँग्वेज’ या लेखात तो म्हणतो, “पण जगात एक भाषा समजायला खूप सोपी आहे. तसेच तिचा वापर सुद्धा इतर सर्व भाषांपेक्षा जास्त केला जातो. ही भाषा कोणत्याही देशात गेलो आणि कोणाशी ही बोललो तरी पटकन समजली जाते, ती भाषा आहे पैशांची भाषा. जी रंगीत कागदाच्या कपट्याद्वारे बोलली जाते.”
‘वॉकीटॉकी’, ‘टेबल मॅनर्स’, ‘वॉटरटाईट डोअर्स’ अशा अनेक लेखांत त्या त्या विषयाची खोलातून, इत्यंभूत माहिती आणि एखादा किस्सा ही लेखक देऊ करतो. जहाजावरील त्या त्या वस्तूचे, विषयाचे महत्त्व कसे अबाधित आहे किंवा तिथल्या आयुष्याशी ते कसं सर्वार्थाने निगडित आहे हे सहजपणे सांगितलं जातं. उदाहरणार्थ ‘स्नेक फ्रुट’ या लेखात जहाजावर मिळणारे स्नेक फ्रुट, इतर फळे त्यांचे भारतातील फळांची असलेले साधर्म्य अशा अनेक गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्याचे वर्णन लेखक आपल्या शैलीनुसार अतिशय विस्तृतपणे करतो. उदाहरणार्थ “मंगीस नावाचे एक कवठासारखे फळ आहे. बाहेरून मरून रंगाचे पण आतून त्याला लसणाच्या पाकळ्यांसारखे गरे असतात. मंगीसाच्या पांढर्याशुभ्र पाकळ्या जिभेवर विरघळतात” अशाप्रकारचं वेल्हाळ वर्णन लेखकाने केले आहे.
या लेखनात अनेक वेगळे शब्द सामोरे येतात आणि लेखक आपल्याला त्या शब्दांशी परिचित करतो. उदाहरणार्थ ‘तेरिमा कसीह’ चा अर्थ धन्यवाद. हा इंडोनेशियन भाषेतील शब्द आपल्या संग्रही येतो. त्याचप्रमाणे ‘मकान डुलू’ हा देखील एक शब्द फार उत्कंठा वाढवतो.
‘द फ्लोटिंग लाइफ इन मर्चंट नेव्ही’ या पुस्तकात लेखकाचा नोकरीत प्रवेश होण्यापूर्वीपासूनचा प्रवास अतिशय प्रांजळपणे कथन केला आहे. मराठी माध्यमात शिकलेला तरुण, अलिबागहून मुंबईत येतो, त्याला सोमय्या कॉलेजमध्ये शिकताना आलेले दडपण, आलेले अपयश, त्यातून त्याचं हळूहळू शिकत जाणं, स्वतःला शोधत रहाणं, आत्मविश्वास कमावणं व पुढच्या जीवनात धडाडीने आव्हानांचा सामना करणं हा प्रवास वेधक पद्धतीने मांडला आहे. यामध्ये कोर्समध्ये प्रवेश करतानाची मानसिक तयारी कशी असावी याचा प्रत्यय तरुण वाचकांना मिळेल. ह्या पुस्तकात अबाऊट द फ्लोटिंग लाईफ, काही किनारे आणि अॉनबोर्ड आठवणी असे तीन विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागात मर्चंट नेव्ही ह्या क्षेत्राबद्दल सहजगत्या उपलब्ध नसलेली माहिती आपल्याला मिळते. या क्षेत्रात बरीच वर्ष कार्यरत असणारी अधिकारी व्यक्ती ती सांगत असल्याने हे अनुभवाचे बोल या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या तरूणांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरतील. तर ‘काही किनारे, बेटं, शहरं आणि समुद्री थरार’ या प्रकरणातील १३ लेखांमध्ये माल्टा, ब्लॅक सी, सुएझ, ॲमेझॉन इथले अनेक रोमांचित करणारे अनुभव लेखकाने त्याच्या शैलीत रंगवले आहेत. “तसे पाहिले तर पाण्याला नेमका रंग तरी कुठला असतो? पाणी फक्त स्वच्छ आणि नितळच तर असते. आपण पाण्याला रंगाच्या उपमा देतो पण कुठल्या रंगाला पाण्याची उपमा देताना ऐकले नाही.” अशी अनेक अन्वर्थक वाक्यं समोर येतात. जहाजावरच्या किचनला गॅली असे संबोधतात. त्याचेही समग्र वर्णन येते. ‘आॅन बोर्ड आठवणी’ हा विभागही असाच वाचनीय व ललितरम्य झाला आहे. ‘जहाजावर न दिसलेली भूतं’, ‘फ्लोटिंग आईस’, ‘टॅटू’, ‘समुद्रातला पाऊस’, ‘अनबेंडेंड शिप’ इत्यादी लेख वाचनीय आहेत.
या दोन्ही पुस्तकांतून लेखकाने एक मोलाचा ऐवज दिला आहे. फक्त इंग्रजी शब्दांचा विपुल प्रमाणात वापर या लेखनात आढळतो. अर्थात ते या विषयात अपरिहार्यही आहे हे लक्षात ठेवून वाचावे लागते. विशेष म्हणजे सर्व इंग्रजी शब्द शुद्ध देवनागरी फॉन्टमध्ये अचूक स्वरूपात छापले गेले आहेत. दोन्ही पुस्तकांना उत्कृष्ट प्रस्तावनेसोबत सुरेख मुखपृष्ठ लाभलेले आहे. ही मुखपृष्ठे मंदार नेने यांची आहेत. पुस्तकांतील छायाचित्रे, बांधणी, रचना या दृष्टीने सृजनसंवाद प्रकाशनाने सरस अशी पुस्तक निर्मिती केलेली आहे. मराठी वाचकांसमोर एक अपरिचित विश्व प्रथम रामदास म्हात्रे यांनी खुले केलेले आहे. त्यांच्या प्रवासातून तरुणांना प्रेरणा व माहिती दोन्ही मिळेल आणि सामान्य वाचकांना थरारून टाकणारे अनुभव वाचता येतील. या पुस्तकांमध्ये माहिती व लालित्यपूर्ण लेखन याचा संयोग झालेला दिसतो. मराठी वाचक अशा अपरिचित जगाचे दर्शन घडवणार्या पुस्तकांचे निश्चितच स्वागत करतील.
ठाणे वैभव मध्ये माझ्या पुस्तकावर सुजाता राऊत यांनी लिहिलेले परीक्षण. सुजाता राऊत मॅडम यांचे मनस्वी आभार.
• सातासमुद्रापार : मूल्य ₹२५०/-
• द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही : मूल्य ₹३००/-
• लेखक : प्रथम रामदास म्हात्रे
• सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे.
• पुस्तकाकरता संपर्क : ९८२०२७२६४६
Leave a Reply