नवीन लेखन...

अर्थापोटी अनर्थ टाळा !

नुकतीच एक बातमी वाचली कि भारतात तरूण लोकांमध्ये ह्रदयविकार, मधुमेह आणि रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. याची कारणमींमासा करताना बदलती जीवनशैली, ताण, खाण्यापिण्याच्या सवयी यासारख्या गोष्टींकडे बोट दाखवले गेले. थोडक्यात ‘हे होणारच’ असा सूर आहे.
जागतिकीकरणाबरोबर पाश्चात्य पध्दतीचे काही बदल आपल्याकडेही आले. आपणही ते अपरिहार्य म्हणून स्वीकारले. नव्हे काही ठिकाणी तर आपण त्यांच्या पुढे गेलो. भारत एक महासत्ता होणार अशी स्वप्ने पाहू लागलो. पुढील काही वर्षात भारतात तरुणांची संख्या खूप मोठी असेल त्यामुळे महासत्ता होणार अशीही चर्चा सुरु झाली. पण अमर्यादित चंगळवाद आणि बाजारीकरण या गोष्टी महासत्ता बनण्यासाठी पुरेश्या आहेत का? ज्या तरुणांच्या जीवावर आपण या गोष्टी करतो तेच अकाली म्हातारे झालेले असले तर आपण काय करणार? आजकाल तर तरूण अधिकार्यांच्या अकाली मृत्यूंचे प्रमाणही वाढत चालले आहे.
माझ्या माहितीतील एक तरूण एका बड्या उद्योगपतीचा खासगी सचिव आहे. तो सकाळी सात वाजता घर सोडतो आणि रात्री बाराच्या पुढे घरी येतो. महिनोंमहिने साप्ताहिक सुटीदेखील घेता येत नाही. पगार मात्र भरपूर आहे.
थोडक्यात आपल्यापैकी बरेच जण जीवन जगणे म्हणजे काय, जीवनातला आनंद उपभोगणे म्हणजे काय हेच विसरून गेलो आहोत. पुष्कळ पैसा कमावणे हेच जीवन असाच अर्थ आजकाल घेतला जातो. (Theory of Diminishing Utility) या अर्थशास्त्रातील सिध्दांताप्रमाणे एखादी गोष्ट माणसाला हवी असेल आणि ती जर त्याला मिळाली तर काही काळाने त्याच्या दृष्टीने त्या गोष्टीची उपयुक्तता कमी कमी होत जाते. उदा. एखाद्या माणसाला भूक लागली आणि तो अन्न खाऊ लागला तर जसजसे तो खात जाईल तसतशी त्याची भूक कमी होत जाईल. म्हणजेच जसे पोट भरत जाते तसतशी अन्नाची उपयुक्तता कमी कमी होत जातेआणि पोट भरल्यावर ती शून्य होते. पण आपल्या सर्वांच्या मते हा सिध्दांत पैशाला लागू होत नाही असे आपण मानतो. आपली पैशाची वा तत्सम गोष्टींची भूक हि वाढतच राहते. थोडक्यात अर्थशास्त्राचा सिध्दांत अर्थाला (पैशाला) लागू होत नाही!
श्री गोंदवलेकर महाराजांनी म्हटले आहे की पैशाचे नाव अर्थ पण तो करतो अनर्थ. पण पैशापुढे आपल्याला सर्व गोष्टी गौण वाटतात. खरे तर परीपूर्ण जीवनात अर्थार्जनाबरोबरच कौटुंबिक जबाबदार्या, सामाजिक भान, संगीत, नाट्य, कला यांचा आस्वाद, देशाटन, वाचनाचा आनंद, दानधर्म, अध्यात्मिक उन्नती यासारख्या कितीतरी गोष्टींचा समावेश होतो. वर दिलेल्या उदाहरणातील तरूणाला पैसा जरी खूप मिळत असला तरी त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठीदेखील त्याच्याकडे वेळ नाही की कुटुंबियांशी बोलायला वेळ नाही. शेवटी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असला तरी माझ्या मते तो खरे आयुष्य जगत नाही आहे. किंबहुना (हे थोडे कटू वाटेल) पुर्वीच्या काळातील गुलाम किंवा वेठबिगार यांच्यात व या तरूणात सांपत्तिक स्थिती सोडता कोणताही गुणात्मक फरक नाही. मग हे खरे जीवन जगणे आहे का? आणि या जगण्यातून ह्रदयविकार, मधुमेह यासारखे मित्र मिळाले तर तो दोष कुणाचा?
खरे सांगायचे म्हणजे आपली अवस्था कळतं पण वळत नाही अशी झालेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की देवाने मला हवे होते ते नाही दिले पण मला ज्याची गरज होती ते सर्व दिले. पण आपल्यापैकी बहुतेक जण गरज आणि हव्यास यातील फरकच विसरून जातो. किंबहुना हे हवे ते हवे करत आपण पैशाच्या एवढे मागे लागतो की त्यातून जीवनाचा खरा आनंद आपल्या हातून निसटून जातो.
जीवनाचा खरा आनंद रोजच्या रोज उपभोगण्यातच खरी मजा आहे. वेळ निघून गेल्यावर काही उपयोग नाही. बायकोला साठाव्या वर्षी गजरा आणून दिल्यावर तिला आनंद जरूर होईल पण तिला हेही वाटेल की हेच प्रेम पंचविसाव्या वर्षी का नाही मिळाले!
तेव्हा पैशाच्या फक्त मागे लागण्यापेक्षा खरे जीवन जगण्याला प्राधान्य द्या. पैसा हे साध्य नसून साधन आहे हे सर्व साधूसंतांनी सांगितले आहे ते लक्षात ठेवा. त्यामुळे पैसा जरूर मिळवा पण त्याचबरोबर त्याचा उपभोगही घ्या आणि चांगल्या कामासाठी आणि समाजासाठी खर्चही करा. (पहा ‘सत्पात्री दान’ हा लेख) आपणा सर्वांना जमिनीच्या हव्यासापोटी सूर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत धावून शेवटी मरून गेलेल्या माणसाची गोष्ट ठाऊकच आहे. तेव्हा कुठे थांबायचे हे प्रत्येकाने आपापले ठरवावे.

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..