सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य दोघांमध्ये उच्चारलं गेलं नव्हतं. त्यामुळे मौनात दोघं ती टेकडी चढले आणि उतरले. खिशात पैसे बेताचे असले तरी मग आइस्क्रीम खायचं ठरलं. नंतर टॅक्सीने तिला घरी सोडायचं, असाही बेत ठरला. दोघांनाही उगाच हसू येत होतं आतल्या आत, एकमेकांकडे पाहताना मात्र चेहरा गंभीर, पण डोळे ‘देई वचन तुला’ असं सांगत होते. शेवटी त्याने तिला लग्नाचं विचारलं.. तेव्हा काही सेकंदांसाठी तिच्या घशात आइस्क्रीम अडकलं तरी ‘मला आवडेल’ एवढंच वाक्य बाहेर पडलं; पण पुढचं वाक्य कसं उच्चारायचं हे त्या २०/२१ वर्षांच्या मुलीला कळत नव्हतं. त्यानेच त्या पणला पुस्ती जोडली.. ‘लग्न केल्यावर नाटक सोडायचं नाहीस तू.’ बस्स, हेच तर हवं होतं. आता सुटकेच्या भावनेने तिला हसू फुटलं. कसाटा आइस्क्रीम महाग असल्याने पैसे संपले. मग टॅक्सी कुठली, बसच्या रांगेत उभं राहावं लागलं.. पुढची दोन वर्ष ते असे छान प्रियकर-प्रेयसीची भूमिका जगत होते. १९६० मध्ये सुलभा कामेरकर या सुलभा देशपांडे झाल्या आणि पुढे हे दाम्पत्य विलक्षण पद्धतीने शेवट पर्यत नाटक जगले..
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..
त्यांचा मुलगा निनाद ३/४ वर्षांचा होईपर्यंत सुलभाताई नाटक सोडून घरीच रमल्या. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये, ‘रंगायन’मध्ये मात्र जात राहिल्या, कारण नाटकाचं वातावरण. त्याच इमारतीत अल्काझींची थिएटर युनिट ही हिंदी नाटकवाल्याची संस्था. सत्यदेव दुबे ती सांभाळत. ते अरविंदचे मित्र. एकदा ते अडचणीत होते. त्यांनी अरविंदला गळ घातली आणि अरविंदनी सुलभाताईंना. ‘कलकत्ता फेस्टिव्हल’मध्ये थिएटर युनिटचं नाटक सादर होणार होतं- ‘अंधायुग’. त्यातली मूळ गांधारी आजारी पडली होती. फेस्टिव्हल चार दिवसांवर आला होता. ती गांधारी (हिंदीत) सुलभाताईंनी उभी करावी म्हणून अरविंद सुलभाताईंना सांगत बसले, ‘‘रंगभूमीची तुझ्याकडून कलावंत म्हणून अपेक्षा आहे, तू हे चॅलेंज स्वीकार. आपला विश्वास आपल्यावर बसणं आवश्यक आहे. आर्टिस्ट जितका टेन्शनमध्ये तितकंच त्याचं काम चांगलं होतं. वगैरे वगैरे.’’ सुलभाताई सांगतात, ‘‘असं जगावेगळं अभिनयाचं तंत्र अरविंद मला सांगत होता आणि शेवटी मी गांधारीची भूमिका करायला तयार झाले. चार दिवस हिंदी उच्चारांसह कसून तालीम केली.’’
आणि नेमका निनाद आजारी पडला; पण अरविंदनी ताईंना गळ घातलीच, ‘‘कलकत्त्याची तयारी कर. प्रेस्टिज शो आहे. रंगभूमीची प्रतिष्ठा राखली पाहिजे.’’ सत्यदेव दुबे न्यायलाही आले, त्यांनी सुलभाताईंची बॅग घेतली. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. सुलभाताई एका मुलाखतीत म्हणतात, ‘‘तापानं फणफणलेल्या निनादने हे पाहिलं. नंतर दोन वर्ष तो दुबेंशी बोलत नव्हता.’’ ‘अंधायुग’मध्ये तेव्हा अमरीश पुरी, राजेश खन्ना हे हिंदी थिएटरचे कलावंत होते. कोलकात्याला पोचताच सुलभाताईंना तार मिळाली- ‘निनादचा ताप उतरला.’ त्या म्हणतात, ‘‘त्या दिवशी माझी गांधारीची भूमिका इतकी छान झाली की शेवटचा, कृष्णाला गांधारी शाप देते तो सीन आठवला की, अजूनही अंगावर शहारे उभे राहतात.’’
विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद देशपांडे त्या काळात दिग्दर्शित करीत होते. तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. ‘‘आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्याला कळून चालत नाही तर करणाऱ्या कलाकाराला ते सांगता आलं पाहिजे. या दिग्दर्शनाच्या मुख्य सूत्राचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. अजूनही माझा तो धडा पूर्ण झालेला नाही,’’ असं सुलभाताई नमूद केलं आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नाटक. त्या आधी सुलभाताई बऱ्याच नाटकांत कामं करीत होत्याच; पण अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केलं. एक दिवस रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. ‘शांतता..’चे प्रयोग या संस्थेतर्फे चालू राहिले. ज्या छबिलदास शाळेत सुलभाताई शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका होत्या. तिथेच ‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला. तीच छबिलदास चळवळ. रंगायननंतर ‘शांतता..’चे प्रयोग ‘आविष्कार’च्या वतीने चालू ठेवायचं ठरलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘गृहिणी सचिव’ अशीही भूमिका (प्रयोग चालू ठेवायचा) माझ्यावर येऊन पडली.’’
अरविंद यांनी या नाटकाबद्दल एका ठिकाणी लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडिस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचं तिचं स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअॅलिस्टिक पातळीवर येतं. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’’
अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.
अरविंद देशपांडे यांचे ३ जानेवारी १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/मधुवंती सप्रे
Leave a Reply