अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये स्वाती पाचपांडे यांनी लिहिलेला हा लेख
आपले आयुष्य म्हणजे आठवणींचा सुंदर गोफ असतो. गोफ विणत असताना सहजच त्यातील रेशीम धाग्यांकडे मन माझे वेधले गेले. काय आश्चर्य की एका ‘सुखानुभूतीची लहर’ त्या क्षणी माझ्या मनाला जाणवली आणि त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मी झुलू लागले. त्या हिंदोळ्याने थेट मला माझ्या बालपणात नेले. मग लक्षात आले की आयुष्यातील सर्वांत ‘सुखद’ असा तो काळ होता. ते माझे समृद्ध ‘बालपण’ होते… हिंदोळ्यावर झोके घेत असताना प्रत्येक उंच झोक्यासह मी त्या राज्यात पोहोचत होते. त्या राज्याची मी अनभिषिक्त राजकन्या होते जणू काही! तोच तो सुखद काळ जेव्हा राजकन्येचे डोळे उघडायचे तेव्हा घरात सकाळच्या कामांची गडबड असायची. आईच्या प्रेमळ हाकेने तिला जाग यायची. त्या घराची ऊब आठवताच आजही दाट सावलीचा आभास होतो आणि त्या आठवणीत मन माझे रमून जाते. घरात आकाशवाणीवरील गाण्यांचे स्वर दरवळत असायचे.
रम्य ते बालपण असे का म्हणतात ते वयाच्या आजच्या प्रगल्भ वळणावर पटू लागले आहे.आज वयाची झूल तर पांघरलेली आहेच पण त्यात जबाबदारीचा अंश जास्त आहे. कोण काय म्हणेल? कुणाला काय वाटेल? असे म्हणत जीवन जगणारे आपण क्वचितच ‘लहान’ मुलासारखे वागत असतो. मला काय आवडते किंवा माझी आवड काय आहे या गोष्टींचा अभावानेच विचार होतो. बालपणी मात्र खाण्याविषयीच्या आवडी कौतुकाने पूर्ण व्हायच्या. आज मी जेव्हा माझ्या मुलांच्या आवडीनिवडी सांभाळत असते तेव्हा नकळत मनात ‘माहेर’ डोकावते. काळाचे पाणी भले डोक्यावरून वाहू दे, त्यात ‘आठवणींचे शिपले’ काळाच्या मातीत मागे रूतून बसतात. शिंपले वेचत असताना माझी फारच तारांबळ होते. जणू काही त्या आठवणींबरोबर माझा लपंडाव सुरू होतो. सगळ्याच आठवणी निखळ आनंद देणाऱ्या, काही आठवणी तेव्हा घाबरवून सोडणाऱ्या पण आज मात्र खळखळून हसायला लावणाऱ्या, आता वयाचा आकडा वाढला की तेव्हाचा ‘पोरकटपणा’ आठवून मौज वाटते. ती मीच होते का यावर विश्वास ठेवायला जड जाते. फुलपाखरांमागे पळणारी, मेंदीचा पाला हाताने वाटून मेंदी रेखणारी, प्राजक्ताचा सडा वेचणारी, भूताला प्रचंड घाबरणारी, उंच नारळाच्या झाडाखालून जाताना पळत सुटणारी, कुणाशीही भांडता न येणारी मैत्रिणींशी कट्टी-बट्टी करणारी, बाहुलीच्या लग्नात रमणारी, भातुकलीचा डाव मांडून बसणारी, आई बाजारात गेली की तिची साडी लपेटून बघणारी, कुणाचेही दुःख न पाहवणारी आणि स्वत:चे भोकाड पसरणारी, माझीच ही सगळी बालपणीची रूपे मला आठवतात आणि मनोमन मी खूष होते. त्या बालपणीच्या राज्यात माझ्या समवेत माझे आई-पप्पा आणि दोन लहान भावंडे, सुजाता आणि क्षितिजही होते. घरी पाहुण्यांमंडळींचा सतत राबता असायचा. वाड्यातील मध्यमवर्गीय दोन खणांचे घर. रेल्वेच्या डब्यासारखे खचाखच भरलेले असायचे. एकदा तर सिंहस्थ कुंभमेळ्यात गावाकडून इतके पाहुणे आले होते की घरात झोपायला देखील जागा नव्हती. मग सगळ्यांनी ‘गप्पा’ मारत रात्र काढली. माझे लहान काका नाशिकच्या गोदेकाठी राहायचे. गोदेला पूर आला की त्यांच्या घरातील सामान आईकडे आणले जायचे आणि घर भरून जायचे.
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे. आईला वाचनालयातून पुस्तके आणून देण्याचे काम माझेच असायचे. खरेतर त्यातूनच वाचनाचा तसेच लिखाणाचा संस्कार माझ्यावर झाला आहे. त्यातून माझ्यातली आजची ‘लेखिका’ जन्माला आली आहे. वडील शिस्तप्रिय असल्याने त्यांनी जो अभ्यासाचा संस्कार घालून दिला तो आज कामी येत आहे. आजही मी पुस्तकांच्या गराड्यात हरवलेली असते. माझे जग म्हटले तर जगासोबत असते, म्हटले तर जगापासून अलिप्त देखील असते.
७०-८० च्या दशकात आम्हा भावंडांनी अनुभवलेले ते आयुष्यातील ‘मंतरलेले दिवस’ होते. त्यात भौतिक सुखांची फारशी रेलचेल नव्हती, गरजांचा महापूरही नव्हता तरीही आयुष्य आनंदी होते. शाळेतला आनंददायी आलेख समाधान देणारा होता. वाड्यातील गणपती उत्सवाने तर अनेक नवोदित कलाकार पुढे नावारूपास आले. नळावरील भांडणांनी माणसाच्या स्वभावाचे रंग दाखवून दिले आहेत. लपाछपीच्या खेळात तर स्वच्छतागृहात देखील लपायचो. गावातला ‘ढोल्या गणपती’ म्हणजे आमचे श्रद्धास्थान होते. माझ्या बाबतीत लग्नानंतरही गाव न बदलल्यामुळे आजही मी माझ्या बालपणीच्या गल्लीत फेरफटका मारून येते आणि येताना भरपूर ‘प्राणवायू’ घेऊन येते जो मला वर्तमानकाळासाठी उमेद देऊन जातो जगण्यावरचा विश्वास वाढत जातो, जगणे हवेहवेसे सुंदर भासू लागते. किती शक्ती आहे त्या आठवणींमध्ये की ते शब्दबद्ध करणेही अवघड वाटू लागले आहे. गावातली गोदावरी आजही तशीच संथ वाहत आहे. ती आमच्या समृद्ध बालपणाची ‘साक्षीदार’ आहे. छोटासा खडा तिच्या पात्रात फेकणारी आणि त्यामुळे निर्माण झालेली गोल गोल वलये हरखून बघणारी ‘मी’ तिला आठवते आहे. भान हरपते त्या वलयांत. मी आजही तितक्याच उत्कटतेने हरखून जाते.
—स्वाती पाचपांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply