निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना,
गती देई जीवन चक्रांना, ईश्वरी शक्ती १
उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती
याच तत्वे निसर्ग चालती, अविरत २
ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून
घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने ३
वस्तूचे निरनिराळे आकार, चेतना देवूनी करी साकार
यास जीवन संबोधणार, आपण सारे ४
मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती
वापरून तीच ती माती, आकार देई पुन्हा पुन्हा ५
दिसेल भांडी फुटलेली, अथवा नवी बनलेली
हीच हात चलाखी, सगळी त्याच्या खेळण्याची ६
मृत्यू टळला न कुणा, हे अंतर्मनी जाणा
यशस्वी करा जीवना, मर्म ओळखूनी त्याचे ७
राहीला नाही राम, उरला नाही शाम
मागे राही फक्त कर्म, तुमच्या जीवनातील ८
जाणता मृत्यूची अटळता, घालवी ती मनाची चंचलता
आणील आयुष्या निश्चिंतता, समजोनी जीवन क्षणभंगूर ९
ठेवा मनामध्ये बिंबवून, अनिश्चित आहे जीवन
मर्यादा धडपडीना देवून, आयुष्य मार्ग आक्रमाल १०
नागडा उघडा येई येथे, तसाच जाई परत तेथे
कांहीं न तयाला नेता येते, सोडताना हे जग ११
आत्म्यासंगे जाई कर्म, जगती राही देह धर्म
निसर्ग चक्राचे हे मर्म, ओळखावे सर्वांनी १२
धडपड तुमची धनापाठी, कुणी झगडे सत्तेसाठी
आकर्षण सारे मायेपोटी, बाह्य गोष्टीचे १३
संसार हा नाशवंत, सर्वासी आहे अंत
म्हणूनी जाणावा भगवंत, अविनाशी शक्तीस १४
निद्रेस जाण्यापूर्वी, मृत्यूची आठवण करावी
मात्र त्याची भिती नसावी, मनामध्ये १५
मृत्यूची करिता आठवण, चुकांना पडेल बंधन
बंधनात होईल महान, कार्य तुमचे कडूनी १६
जाणोनी छोटा काळ, न दवडी तो फुकट वेळ
शोधण्यास तो जाईल, जीवनाचे प्रयोजन १७
माहीत असते सर्वांना, मृत्यू टळला न कुणा
परी आठवण त्याची निर्भय मना, रोज येत राहावी १८
भीऊ नका मृत्यूला, अपघात समजा त्याला
जीवनचक्र पूर्ण होण्याला, मदत होई त्याची १९
जैसा आनंद जन्माचा, तैसा मानावा मृत्यूचा
यात सहभाग प्रभूचा, समजावे ही विनंती २०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply