बालकांची दोन पत्रे.
१) बालक पुतण्याचे पत्र-
( आठ दिवसाच्या पुतण्याने (भारतातल्या) काकूस (अमेरिकेतील) लिहीलेले पत्र )
प्रिय काकू,
Hi, आणि सा. नमस्कार. तुला वाटत असेल हा कोण? मला अद्याप नाव नसलं तरी रक्ताच, घराण्याच अस नातं मात्र निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या नात्याचाच आधार घेवून मी तुला काकू म्हणालो. खर म्हणजे मला प्रथम पत्र लिहावयाच होत ते माझ्या आईला. परंतु मी या जगात आल्यापासून, नव्हे त्याच्या पूर्वीही जेव्हा मी तिच्या पोटांत होतो ना, ती क्षणभर देखील मजपासून दूर झालेली नाही. मी सतत तिच्याच सहवासामध्ये आहे. त्यामुळे तिला जे माहित आहे ते सर्व मला देखील ठाऊक आहे . व मला जे ज्ञात आहे ते तिला देखील समजल आहे. तेव्हा मजकूर काय? विचार काय? आमची देवाण-घेवाण होवूच शकत नाही. मग मीच विचार केला की तू येथून खूप खूप दूर आहेस ना ? मग तुलाच पत्र लिहून आपलं मनोगत सांगाव. म्हणजे तुला माझा Bio-data, नव्हे जन्म कुंडली, नव्हे जन्म प्रवास समजेल. खरं सांगू काकू मी जसा आलो तसेच तुझेही बाळ माझ्याप्रमाणे येण्याच्या मार्गावर आहेच. म्हटले माझा प्रवासी अनूभव जर तुझ्या कानावर घातला, तर माझ्या लहान भावडांचा या जगांत येण्याचा मार्ग थोडातरी सुकर, सुखकर आणि सुयोग्य होईल. कोणतीही घटना घटताना जेव्हा संपूर्ण नावीन्यपूर्ण असते ना, त्यावेळी मन नेहमी साशंक असून एका अज्ञानाच्या मार्गामुळे खूपच काळजी वाटत असते. पण मी जेव्हां त्या प्रवास मार्गाबद्दलचा तपशील तुला सांगेल ना तेव्हा तू योग्य त्या तयारींची काळजी घेशील. व मग कोणतीही प्रसंग अघटीत होणार नाही.
काकू तुला आश्चर्य वाटेल पण मला तर तुझे आणि काकांचे नाव तर खूप पूर्वीच समजले होते. मी जेव्हां आईच्या पोटांत होतो ना, जगांत येण्याच्या आधीच तेव्हाच कळले. आई-बाबा, आजोबा-आजी जेव्हां गप्पा मारायचे, तेव्हां तुमचा विषय निघायचा. त्याचवेळी मी पण ऐकत होतो. अग, तुला माहितच असेल ना की अभिमन्यू जेव्हां त्याच्या आईच्या पोटांत होता, तेव्हांच तो जगातल्या खूप गोष्टी ऐकून शिकला होता ना. मला बोलता आले असते ना तर मी सर्व काही व्यवस्थीत सांगू शकलो असतो. माझी सर्व इंद्रिये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यारत होते. मला सभोवतालच्या सर्व जगाची पूर्ण जाणीव होत होती. सर्व व्यक्तींच्या हालचाली, त्यांचे बोलणे, अस्तित्व, मला सार काही कळत होते. तुला गंमत सांगू मला नुसते बाहेरचे जग, बाहेरील व्यवहार कळत होते असे नाही, तर माझ्या आईच्या अंतर मनाची, अंतर जगाची देखील पूर्णपणे जाणीव होत होती. माझ्या आई – बाबांनी माझ्या बद्दल केलेली व्यक्तव्ये, अंदाज, स्वप्ने इत्यादी. त्याचप्रमाणे माझ्या प्रकृतीसाठी, माझ्या उदयास येणाऱ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, ते चांगले विचार, संस्कार करीत होते.
ज्या उच्य प्रतीच्या आध्यात्मीक प्रेरणांच्या लहरी मला देत होत्या ना, त्या सर्व शक्तींची मला तीव्रतेने जाणीव होती. सारी शक्ती मजमध्ये संकलीत होत होती. ज्या गोष्टी त्यानांही समजत नव्हत्या, नव्हे माझ्या बाबांच्या बाबांना अर्थात आजोबांना देखील समजत नव्हत्या, अशा सर्व सूक्ष्म बाबींचे संकलन मी माझ्या मनांत (वा बुद्धीला) करुन ठेवीत होतो. माझं फक्त आताच्या घडीला एकच Bad Luck आणि ते म्हणजे मला बोलताच येत नाही. नाहीतर थेट तीन-चार महीन्यापूर्वीचा सारा वृतांत मी धडा-धडा बोलून दाखविला असता. आणि केवळ मला बोलता येत नाहीना, तर हे सारे आजूबाजूचे लोक मला ‘नासमज’, अज्ञानी याला काय कळतं, इत्यादी उपाधी देवून माझ्याकडे अतिशय दुर्लक्षून बघत असतात. व आजही तसेच समजतात. पण मी सर्वांना सांगू इच्छीचो की थोडे थांबा, मला बोलण्याची कला येऊ देत, भले ते बोबडे बोल का असेना, मग सारे काही बोलेन, तेव्हा सर्वजण तोंडात बोटे घालून म्हणतील, “आरे कुठे शिकला हे सारे. याला सारे समजते. आपणच त्याला नासमज म्हणून म्हणत होतो…..” इत्यादी. अग बाहेरच्या गप्पा ऐकताना मला पण जेव्हां आवडलं ना तेव्हा मी पण टाळी वाजवायचा, नाचाया देखील. परंतु हे कुणालाच कळत नव्हते. आई म्हणायची “बाळ काय सारख फिरतय” कमाल आहे नाही. त्यांच मला कळायच पण माझ मात्र त्यांना काही कळायचं नाही.
मला या जगात येवून केवळ चारच दिवस होत आहेत. बराच काळ मला आईच्या पोटांतच राहून बाहेर येण्याची वाट बघावी लागली. माझी शेवटी शेवटी सर्व तयारी झाली होती. पण कुणीच लक्ष देत नव्हते. माझ्या जन्माच्या आदल्याच दिवशी, आईने स्व:ता पावभाजी, आईस्क्रीमीची ट्रीट दिली होती. ती जे जे करीत होती व जे जे बोलत होती, ऐकत होती त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. पण माझ्याकडे लक्ष देण्यास कुणासच फूरसत नव्हती. त्यांना काय माहीत की या सर्व Activities वर माझीपण नजर खिळून होती. रात्रीतर मध्यरात्र उलटेपर्यंत सारे काही आनंदमय वातावरण होते. मग मीच का म्हणून मागे राहू. मलाही खूप खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी पण नाचू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. पण गंमत सांगू काकू तुला, सर्वांनी आनंद साजरा केला. परंतु माझ्या आनंदाला वेगळेच रुप देवून, मला चक्क आईसह हॉस्पीटलमध्ये सकाळी नेऊन सोडले. अर्थात मी माझा उत्साह आवरता घेतला व शांत झालो. मी माझ्या आईस बघण्यासाठी फार उत्सुक होतो. येताच मी आनंदाने किंचाळलो. नंतर माझा जीव शांत झाला. मला मोठी गमंत आणि आश्चर्य वाटले ती डॉक्टर काकूंचे. ती माझ्याशी, माझ्या आगमनाच्या दिवशी अतिशय रफ (वाईट) वागली.
थोडा देखील हळूवारपणा दाखविला नाही. किती नाजूक होतो मी, अगदी कळीचे फुलात रुपांतर होताना कसे मोहक व आल्हादकारक वाटते ना तसा. पण तीने मला पूरता उलटा सुलटा केला, प्रत्येक अवयव वाकडे तिकडे करुन बघीतले. तीला माझ्यांत कोणते
व्यंग आहे का हे बघण्याचीच उत्सुकता होती. म्हणाले कुठेही व्यंग नाही. No Congenital Anomaly, सर्व अवयव ठीक ठाक आहेत. माझ्या पायावर त्यांनी एकदम चापटी मारली. मी एकदम तळतळून रडलो तर म्हणतात कसे “रडतो चांगला बरे” कमालच आहे की नाही. रडण हे देखील चांगल असत हे मला माझ्या जीवनाच्या पहील्याच दिवशी कळलं. तीच वागणं मला फार विचित्र वाटलं. डॉक्टर काकूंचा शोध माझ्यांत काही व्यंग आहे का, वाईट आहे का त्यांच्यासाठी होत असल्याची मला जाणीव झाली. आणि ती माझी आजी, ती देखील तशीच. आज आल्या आल्या तीच लक्ष मी ‘सू’ केली का ?, ‘शी’ केली का ?, ‘उलटी’ झाली का ?, अधून मधून ‘रडतो’ का ?, बस अशीच चौकशी. कुणी म्हणाले मी बाबाप्रमाणे दिसतो. म्हणजे माझे नाक व चेहरापट्टी त्यांच्या सारखी आहे. कुणी म्हणाले चेहरा गोल असून रंग गोरा आहे. आईप्रमाणे आहे. माझ्या प्रत्येक अवयवांच पृथकरण होऊन कोणता भाग कुणासारखा आहे त्याची यादीच मोठी होत होती. प्रत्येकजण आपला त्यात सहभाग व्यक्त करीत होता. डॉक्टर आजीची तर एकदम कमाल. तिला तस काहीच सापडलं नाही, तरी तिचा प्रयत्न आपला नंबर वर ठेवण्याचा होता म्हणाली. बाळाचा Blood group A +ve आहे. मला हे सार ऐकून खूप मौज वाटत होती. आणि माझे ते भाव माझ्या चेहऱ्यावर दिसत होते. माझ्या मनांतून उत्सुर्त आलेलं हास्य, प्रथम टिपले ते आत्याबाईंनी. माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या प्रत्येक हालचालींची त्यांनी योग्य ती कदर केली. त्याच योग्य विश्लेषण केले. मी पण त्याच्यांवर फार खूश झालो. काहीतरी Gift घ्यावी वाटले. काकू तुला सांगू, माझ्याकडे तर त्यावेळी काहीच नव्हतं. मी चक्क तिच्या अंगावर पहीली ‘सू’ केली व Congratulation च्या स्वरात किंचाळलो.
काकू खर सांगू, हे सर्व माझ्या या जगांत येण्याच प्रवास वर्णन वाचून तुला खूप बर वाटल असंल. गमंत वाटली असेल व आनंदपण झाला आसेल. तुला अजून न बघता देखील मी तूझा प्रफूल्लीत झालेला चेहरा कसा असेल, याचे चित्र माझ्या चिमकुल्या डोळ्यापुढे आणू शकतो. पण तुला माहीत असेलच कि जेव्हां आपण सर्कस बघतोना त्या कलाकाराच्या उलट्या सूलट्या उड्या बघून खूप करमणूक होते. आनंद वाटतो. पण कुणीच विचार करीत नाही की त्यांच्या उड्या, करामत इतकी साधी गोष्ट नाही. त्याच्यामागे श्रम, तपश्चर्या आणि साहस यांचा मधूर मिलाप दडलेला असतो. दिसणारे चित्र आणि असणारे चित्र यांत खूप तफावत असते. तू म्हणशील काकू की मी कोणते तत्वज्ञान सांगू इच्छीतो. मी पडलो अज्ञानी मी काय ह्या जगांत नवीन सांगणार. पण मी आहे एक ‘साक्षी’, एक साक्षीदार जो आईच्या पोटांत राहून अंतर जगातील व बाह्य जगातील सर्व घटणांचा अनूभवी.
त्यामुळे मी जे सांगतो ना ते एक दीर्घ काळापर्यंत अनूभवलेले आणि परिणामी अत्यंत आनंद देणारे एक सत्य आहे.
डॉक्टर Anti अर्थात Gynecologist यांच्याकडे माझ्या आईला बाबा किंवा आजीला घेवून जात असे. जशी मला समज येवू लागली. मी त्यांनी दिलेला उपदेश माझ्या बुद्धीत साठवून ठेवला. माझ्या आईने तिच्या बुद्धीत तो साठविला. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.
१) सदैव प्रफूल्लीत व आनंदात रहा. त्याने आईची व बाळाची प्रकृती पण चांगली राहते.
२) सदैव चांगल्या गोष्टींचा विचार करावा, चांगले वाचावे, चांगले लिहावे. (जमल्यास) अध्यात्म्याची नितीज्ञानाची, संस्कार रुजविण्याची पुस्तके, देवादीकांच्या कथा, स्तोत्रे वाचवित. चांगले चारित्र्यवान गोष्टी एक प्रकारच्या लहरी निर्माण करतात व त्याचा बाळाच्या मानसिक विकासासाठी अप्रत्यक्ष खूप उपयोग होतो. जे तुम्ही ९ वर्षात बाहेर मिळवू शकणार नाहीत, ते केवळ ९ महीन्याच्या काळांत मिळविता येतो. हे पौराणिक विचार नव्हेत तर प्रयोगांनी सिद्ध झालेले एक शास्त्रीय सत्य आहे.
३) रोजच्या आहारात भाज्या, फळे, दुध, ताक, डाळीचे पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ योग्य त्याप्रमाणात असावे. आहार सकस व प्रमाणशीर असावा, नियमीत असावा. आपल्या जेवणांत जवळ जवळ सर्व गोष्टी असतात. परंतु जेवणाच्या बाबतीत दुर्लक्ष करु नये. तुला भूक नाही म्हणून न जेवणे वा कमी जेवणे हे मुळीच चालणार नाही. कारण तुझे जेवण फक्त तुझेच असते असे नाही, ते दुसऱ्याचे जेवण पण असते. त्याच्या शारिरीक वाढीसाठी लागणारे घटक पदार्थ केवळ तुझ्यामार्फत त्याला मिळत असतात. याचा विचार मनाच्या कोपऱ्यामध्ये पक्का कोरुन ठेवणे. तुझी कोणतीही दुर्लक्षीत केलेली कृती ही खूप खूप त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माझी आई खाण्याच्या बाबतीत फारच निवडक होती. तिला भूकपण लागत नव्हती. परंतु तिला सर्वांनी व्यवस्थीत समज दिली. आणि तिने पण स्वत:चा हट्ट, सोडून केवळ माझ्यासाठी आहारांत योग्य बदल व योग्य सेवन सुरु केले. ए तू आईला सांगू नकोस, पण ती ५५ किलो वजनापासून मी जगात येण्याच्या दिवशी ७६ किलो वजनाची झाली होती. आता तिचे वजन ६९ किलो आहे.
४) अत्यंत कंटाळवाणी गोष्ट, परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘व्यायाम’ याच्याचसाठी मी सुरवातीला सर्कशीचे उदाहरण दिले होते. बाकी सर्व गोष्टी करणे शक्य होते. पण व्यायाम करणे म्हणजे एक दिव्यच. त्यातही डॉक्टरांनी अतिशय मध्यम मार्ग काढला होता. घरामधील प्रत्येक गोष्ट स्वत: करण्याचे बंधनच आईवर टाकले होते. ती माझी आई कामाच्या बाबतीत फार उत्साही. तो उत्साह Casual नसावा म्हणून त्याला Medical Advice ची
झालार लावली, म्हणजे मुळीसुद्धा कंटाळा करता कामा नये. घरातले झाडणे, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे इत्यादी कामे दिसायला लहान असतात.
तरी सतत व्यस्त ठेवून शरिराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देतात. Movements देतात. पोटांत वाढणाऱ्या बाळाला आईच्या सततच्या योग्य त्या हालचालींमुळे स्वत:ची बैठक पण व्यवस्थीत set करता येते. तिचा हालचालीच्या वेळीच, तो आपला मार्ग अतिशय सुकर करतो. जेणेकरुन वेळ येताच बाळ चटकन व चांगल्याप्रकारे बाहेर येवू शकते. बाळाच्या या अतिशय मुख्य प्रवासासाठी, आईची योग्य साथ मिळणे हे फार जरुरी आहे. माझ्या आईने खरेच यासाठी थोड्याशा काळासाठी का होईना खूप श्रम घेतले. कष्ट सोसले. तिची पाठ दुखत असे. ती विव्हळायची, रात्री झोप लागण्यास त्रास व्हावयचा. पण तिने माझे व पर्यायाने तिचेदेखील भावी सूखकर आगमन डोळ्यासमोर ठेवले. व त्यामुळेच माझ्या प्रवासाचा शेवट अतिशय समाधानकारक व चांगला झाला.
तसे म्हटले तर घरांत नोकर, आजी बाबा होते पण तरीही केवळ शारिरीक हालचालींना प्राधान्य देण्यासाठी, ती कुणालाच काम करु देत नव्हती. स्वत:च घरातील सर्व कामे करावयाची. अग काकू मला पण तिची किव येत असे पण काय करणार
व्यायामामधला सर्वात चांगला प्रकार म्हणजे ‘फिरणे’ रोज एक तास आई केव्हा बाबा बरोबर तर केव्हा आजी बरोबर बाहेर फिरण्यास जात होती. कुणीच मिळाली नाही तर घरातल्या घरातच, या खोलीतून त्या खोलीतून चकरा घालायची पण व्यायाम पूर्ण करावयाची. कुणावर अवलंबून नाही. काकू तू पण व्यायामाबाबतीत हालचालीबाबतीत मत्र निश्चिचपणे आईप्रमाणेच Follow up कर. म्हणजे माझ लहान भावंड व्यवस्थीत येवून सर्वांना आनंदीत करेल.
तू ज्यांच्या supervision खाली तिथे Medical सल्ला घेतेस ना, त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे वाग. मात्र त्यात कोणतीही हयगय नको. आजचे श्रम, कष्ट, उद्याचे आनंदी वातावरण निर्मितीचे असणार.
काकू तुला सांगू, माझी वाढ व प्रकृती (Growth Development and Health) केवळ नॉर्मलच नाही तर मी केवळ चार दिवसामध्ये बरीच प्रगती केल्याचे Remarks डॉक्टराकडून ऐकू येतात. याला कारण मी अनूभवलेल्या डॉक्टरांच्या सूचनांचे आईने केलेले तंतोतंत पालन.
बाबा आईच्या थकव्याकडे, पाठ दुखण्याकडे व प्रकृतीकडे जास्त लक्ष देवू लागले. त्यांची इच्छा असो वा नसो ते रोज आईला एक तास बाहेर फिरवून आणू लागले. आईचा थकवा कदाचित वाढत होता. परंतु त्याच प्रमाणात तजेलेपणा देखील वाढत जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. मी पण खुशीने नाचत असे आणि माझ्या या नाचण्यानेच माझी प्रकृती देखील चांगल्याप्रकारे आकार घेत आहे याची सर्वांना जाणीव होत होती.
मला उत्सुकता आहे ती मला लहान भावडांशी खेळण्याची. माझी इच्छा आणि अपेक्षा तुमच्या दोघांच्या लक्षात आलीच असेल. ते भावंड कुणीही असो परंतु ते निश्चित सुदृढ असले पाहिजे. म्हणजे मग खेळण्यात खूप मज्जा येईल. आणि त्याचसाठी तू खूप काळजी घेत जा. जसे मी वर वर्णन करुन सांगीतले त्याप्रमाणे.
मला आई बाबा, आजी आजोबा ‘शांत’ आहे, रडत नाही आणि अशाचप्रकारे खूप मोठेपणाची विशेषणे माझ्या माथी मारतात. त्याचा अर्थ तू असे मुळीच समजू नकोस की मी एखादा आदर्शाचा पुतळा होणार आहे. नव्हे मी एकदम आपल्या सर्व वडीलधाऱ्याप्रमाणे त्यांच्या बालपणाच्या काळाप्रमाणे असेल. अरे श्रीकृष्ण पण मोठा झाल्यावरच मोठा झालाना. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या लहान वयांत केलेले सर्व कारनामे, प्रताप मी पण करणार आहे. सर्वांना त्रस्त करणार, रडकुंडीला आणणार, तोडमोड करणार, नुकसान करणार, मारामारी करणार, खेळणार, हसवणार देखील. माझ्या बुद्धीने सुचविले त्याप्रमाणे परिस्थितीचा विचार करुन सर्वांना खूप खूप आनंद देणार. माझ्यात हे सर्व गुण असतील. ज्याला जसे भावेल त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य करावे. मग माझ कौतुक करा, नाहीतर मला धम्मक लाडू द्या. साऱ्या साठी मी तयार असेन.
असो आता येथेच थांबतो. नवजीवनाचा एक साथीदार म्हणून व्यक्त केलेले माझे मनोगत तुम्हाला पटते. तर त्याकडे एक सत्य अनुभव म्हणून बघा. योग्यवेळी योग्य गोष्टींचा विचार , म्हणजेच Stitch is time saves nine ह्या संकल्पने प्रमाणे.
पुन्हा काका, काकू यांना माझे सविनय प्रेमळ नमस्कार. तुमच्या भेटींसाठी खूप खूप उत्सुक आहे. तुमच्या नवीन येवू घातलेल्या बाळासाठी आणि माझ्या लहान भावंडासाठी माझ्या सदिच्छा. अद्यापतरी माझे नामकरण झालेले नाही , होईल तेव्हा नाव व इतर उपाध्यायासहीत कळवीन. तुमचा प्रेमळ पुतण्या. – अनामिक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply