बालपणी प्रत्येक मुलाला किंवा मुलीला घरी आलेल्या पाहुण्यांकडून हमखास एकच प्रश्न विचारला जात असे…
‘मोठं होऊन तुला काय बनायचं आहे?’ तेव्हा फुशारकीनं उत्तर दिलं जायचं… मला डाॅक्टर बनायचंय, मला वकील बनायचंय, मला इंजिनिअर बनायचंय… या आलटून पालटून तीन पर्यायाशिवाय उत्तरच नसायचं… कुणी मला शिक्षक किंवा कलाकार बनायचंय, असं म्हणायचं नाही…
बालपण भरभर संपतं… सभोवतालचं जग कळायला लागतं.. शिक्षण पूर्ण होतं, नोकरी लागते, लग्न होतं, कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडते, मुलं होतात, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं होतात, नातवंड होतात…
तेव्हा लहानपणी विचारलेला प्रश्न आठवतो… ‘मोठं होऊन तुला काय बनायचंय?’.. आता त्यांना ठणकावून सांगावसं वाटतं की, ‘मला पुन्हा एकदा ‘लहान’ व्हायचं आहे!!!’
पण ज्यांनी हा प्रश्न विचारला होता ते तर कधीच देवाघरी गेलेले असतात… आणि आपल्याला एकटं पडल्याची जाणीव होते….
खरंच, लहानपण आनंदाचं असतं.. कशाचीही काळजी नसते.. काळजी घेणारे कायमच जवळपास असतात.. आपल्या आवडी निवडी जपल्या जातात.. हट्ट केला की, हवी ती वस्तू, गोष्ट मिळते.. आजारपणात काळजी घेतली जाते.. चांगली गोष्ट केली तर शाबासकी मिळते.. चुकलं तर ताकीद दिली जाते.. औत्सुक्याने विचारलेल्या प्रश्नांना समजेल अशा भाषेत उत्तरं मिळतात…
वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत कोऱ्या पाटीवर, संस्कार घोटून घोटून गिरवले जातात.. हे वय षडरिपूंपासून कोसों दूर असतं.. वयाच्या चौदाव्या वर्षापासून सभोवतालच्या निरीक्षणाची नोंद मेंदूत होऊ लागते.. कोण कसं वागतं, कसं बोलतं, कसं रहातं हे नव्याने कळू लागतं..
वाचनातून, बातम्यांतून, चित्रपटांतून चांगलं, वाईट कळायला लागतं.. संयम असेल, संस्कार असतील तर जीवन यशस्वी होतं.. संगत वाईट असेल तर व्यसनामुळे जीवनच बरबाद होतं…
तेव्हा आयुष्यातील लहानपणीचा काळ हा सर्वोत्तम असतो.. तो पुन्हा कधीही मिळत नाही..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-११-२१.
Leave a Reply