आपल्याला जन्म देणारा जो बाप असतो, त्याला आपण कदापिही विसरु शकत नाही. मात्र आपल्या जीवनात जी ज्ञात अज्ञात ‘बाप’ माणसं संपर्कात येतात, ज्यांच्या सहवासात आपण घडतो, त्यांचं स्मरण या दिवशी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे!!
लेखकांमध्ये प्रत्येक पिढीनुसार, नवे जुने ‘बाप’लेखक असू शकतात. मी आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य वाचलं. खरंच ती माझ्या दृष्टीनं ‘बाप’माणसंच होती. त्यांची पुस्तकं वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची लेखनशैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला. आज कुणी माझ्या लेखनाचं जेव्हा कौतुक केलं तर त्याचं श्रेय मी या ‘बाप’लेखकांना देतो, कारण मी त्यांच्या प्रकाशापुढे एक सामान्य ‘काजवा’ आहे…
नाट्यलेखनामध्ये, राम गणेश गडकरी हे ‘बाप’च होते. त्यांनी जी नाटकं लिहिली, ती सर्वच अजरामर आहेत. त्यातूनही मला आवडलेले नाटक आहे, ‘भावबंधन’! त्यातील घनश्याम व लतिका यांचे संवाद अविस्मरणीय आहेत. विधात्यानं त्यांना अल्पायुषी केलं, अन्यथा त्यांच्या साहित्य संपदेत अजून मोलाची भर पडली असती. महाराष्ट्राच्या या शेक्सपिअरला आदरपूर्वक ‘बाप’माणूस म्हणताना माझी छाती अभिमानाने फुगते..
मराठी चित्रपट क्षेत्रातील चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांना सर्वजण ‘बाबा’च म्हणायचे.. आणि खरंच ते ‘बाप’माणूसच होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक चित्रपटांची निर्मिती केली. त्या निर्मितीमागे व्यवसाय हा हेतू नसून, नव्या पिढीने महाराजांचे ‘संस्कार’ आत्मसात करावेत, अशी इच्छा होती. त्यांनी ज्या कलाकारांना घडविले, ते सर्व जीवनात यशस्वी झाले. ‘जयप्रभा’ स्टुडिओ हे कलाकार व तंत्रज्ञ घडविणारं, एक विद्यापीठच होतं…
हिंदी चित्रपटक्षेत्रात अनेक ‘बाप’ दिग्दर्शक होते. त्यातील हृषिकेश मुखर्जींचे सर्व चित्रपट मला भावले. त्यांनी चित्रपट निर्मिती ही निव्वळ व्यवसाय म्हणून न करता ‘कौटुंबिक मनोरंजन’ म्हणून केली. त्यांचा ‘बावर्ची’ असो वा ‘गोलमाल’..या चित्रपटांनी मनमुराद हसवलंय तर कधी ‘आनंद’ सारख्या चित्रपटांनी गंभीरही केलंय..
संगीत क्षेत्रातील रवींद्र जैन हे ‘बाप’माणूस होते. त्यांनी अंध असूनही उत्तम गीतं व संगीत दिले. राजश्री प्राॅडक्शनच्या अनेक चित्रपटांना त्यांनी गीत व संगीताचा साज चढवला आहे. ‘गीत गाता चल’, ‘अखियोंके झरोकोंसे’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘सुनयना’ सारखे कितीतरी चित्रपट कर्णमधुर आहेत. रामानंद सागर यांच्या ‘संपूर्ण रामायण’ मालिकेच्या दोन्ही भागांचे गीत व संगीत त्यांचेच आहे..
नाटकांच्या बाबतीत प्रभाकर पणशीकर यांनी ‘तो मी नव्हेच’ सारखी एकाहून एक सरस अशी नाटकं रंगभूमीवर आणली. ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक मी काशिनाथ घाणेकर यांचा अभिनय पहाण्यासाठी अनेकदा पाहिलंय..
जादूचे प्रयोग करणारे ‘जादूगार रघुवीर’ हे पुण्यातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. लहानपणापासून हलाखीच्या संघर्षमय जीवनातून त्यांनी नाव कमावले. परदेशात प्रवास करुन ‘प्रवासी जादूगार’ हे विक्रमी खपाचे पुस्तक लिहिले. त्यांचे जादूचे प्रयोग मी अनेकदा पाहिले. ते खरंच जादू मधील ‘बाप’माणूस होते..
चित्रकलेच्या क्षेत्रात अगणित ‘बाप’माणसं होऊन गेली आहेत. तरीदेखील एस. एम. पंडित, रघुवीर मुळगावकर व दीनानाथ दलाल यांना कोणीही विसरु शकणार नाही. त्यांनी जी चित्रसाधना करुन ठेवली आहे, ती अनुभवण्यासाठी आयुष्य कमी पडेल. त्यातूनही दीनानाथ दलाल, माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी व्यावसायिक चित्रकलेत ‘न भूतो न भविष्यती’ काम केलेलं आहे! व्यंगचित्रं, कथाचित्रं, मुखपृष्ठं, चित्रमालिका, रेखाटने, अक्षरलेखन, पेंटिंग्ज, काॅम्पोझिशन्स, इत्यादी सर्व प्रकारात त्यांनी ‘बाप’माणसासारखं काम केलंय…
शिक्षकांमध्ये मला म. द. वारे सर लाभले, हे माझं परमभाग्य! न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत पाचवीपासून दहावीपर्यंत वारे सरांनी मला चित्रकला विषयात घडवलं. दरवर्षी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावला. चित्रकलेची परीक्षा देण्यासाठी सराव करुन घेतला. यश मिळाल्यावर शाबासकी व अपयशावेळी धीर दिला. म्हणूनच आज शहाण्णव वर्षांचे चिरलरुण सर माझेच नाही तर शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचे ‘बाप’माणूस आहेत…
जाहिरात क्षेत्रातील सुबोध गुरूजी हे माझे ‘बाप’मित्र आहेत. या क्षेत्रात आम्ही बंधू जेव्हा रांगत होतो, तेव्हा सुबोधजी ‘हेडमास्तर’ होते. उमेदवारीच्या काळात टाॅकीजवरील कटआऊट्स व बॅनर पाहताना कधी वाटलं मी नव्हतं की, हे बॅनर करणारे गुरूजी, भविष्यात आपले जीवश्च कंठश्च मित्र होतील. १९९० साली समोरासमोर आलो, मात्र तेव्हा ओळख नव्हती. १९९६ सालापासून मैत्री झाली ती आजतागायत. मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केलेला, चित्रपटसृष्टीचा ज्ञानकोष असलेला हा ‘शेवटचा मालुसरा’, ‘बाप’मित्र असल्याचा मला सार्थ अभिमान आहे…
वर्षातून एकदा येणाऱ्या या ‘बाप’दिवशी, ज्यांनी आपल्याला कळत नकळत घडवलं, त्या सर्वांची आठवण काढणं हे माझं परमकर्तव्यच आहे!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-६-२१.
Leave a Reply