मुंबईत रेल्वे-बस-पायी कामावर येता-जाताना जे स्वत:च्या नाकासमोर पाहून चालतात किंवा जे खाली मुंडी घालून (पाताळ ढुंढणारे नव्हेत, तर प्रोग्रेसिव्ह काचांचा चष्मा वापरणारे..!) चालतात, त्यांना या लेखाचं शीर्षक काहीसं विचित्र वाटेल किंवा ते असं का दिलं, याचं आकलन होणार नाही. परंतू ज्यांचा नाकासमोर पाहाण्यावर फारसा विश्वास नाही आणि म्हणून तेवढं सोडून आजुबाजूला (कारणपरत्वे) चौफेर किंवा चौकसपणे व क्वचित (प्रसंगपरत्वे) माना मोडेपर्यंत मागे वळून पाहाणारांना या लेखाच्या शीर्षकाचं आश्चर्य वाटू नये असं मला वाटतं. येताजाताना असं चौकसपणे चौफेर पाहाताना, ह्या लेखाच्या शीर्षकाचं वाक्य त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर कुठे न कुठे नक्की वाचलेलं असेल यात शंका नाही..
“बचना है तो ऐ मेरे दोस्त, आओ खेले मेंढीकोट..” रस्त्याशेजारच्या एका भिंतीवर हे हिन्दी वाक्य लिहिलेलं माझ्या नजरेला प्रथम पडलं ते साधारण वर्षभरापूर्वी. दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या बरोबर समोरच्या इमारतींच्या कंपाऊन्ड वाॅलवर लिहिलेलं मी ते प्रथम वाचलं. शिवाजी पार्कचा परिसर हा कल्पक कलावंतांचा मेळा..! ह्या परिसरात कल्पकतेचं भरघोस पिक येत असल्यानं, त्यांच्यापैकीच कुणीतरी, वाचणाराच्या मनातलं कुतूहल जागं व्हावं म्हणून, त्यांच्या ‘आगामी’ची मोघम पण कल्पक जाहिरात असावी, असं तेंव्हा वाटलं. त्यांच्यापैकीच किंवा त्यांच्या प्रोत्साहनाने अन्य कुणीतरी ते लिहिलं असावं, असंही वाटलं.. तरीही या वाक्यातील वेगळेपणामुळे ते साधं सरळ हिन्दी वाक्य लक्षात राहीलं. रोज येता-जाताना ते वाक्य वाचताना, ते नक्की काय असेल याचा विचार मनात यायचा, पण तो तेवढ्यापुरताच..!
माझं कामानिमित्त व आवड म्हणूनही मुंबई शहरात फिरत असतो. शक्य तो पायीच. पहिल्या परिच्छेदातील दुसऱ्या भागात म्हटल्याप्रमाणे माझं आजुबाजुला विनाकारणच लक्ष असतं. ती सवयच झाली आहे आता. असंच फिरताना एकदा दादरच्या टिळक पुलावरून दादर टी.टी.च्या दिशेने चालत असताना, माझं लक्ष दादरच्या टिळक ब्रिजच्या दक्षिण भागावरच्या लोखंडी भिंतीकडे गेलं आणि तिथेही मला हेच वाक्य रंगवल्याचं दिसलं, ते ही शेजारी शेजारी दोन वेळा..! तेच अक्षर, तेच शब्द, तेच वाक्य..!
नक्की सांगायचं म्हणजे, टिळक ब्रिजवरून थेट रेल्वे प्लॅटफॅर्मवर जायला अलिकडेच जो नवा ॲक्सेस दिला आहे ना, अगदी त्याच्या शेजारी हे वाक्य रंगवलेलं तुम्हालाही पाहाता येईल. ह्या भिंतीचं वैशिष्ट्य म्हणजे, ह्या भिंतीवर ‘भारतीय रिपब्लिकन पार्टी’च्या सभा-मोर्च्यांच्या जाहिराती रंगवलेल्या मी अगदी लहानपणापासून पाहात आलोय. आजुबाजूला उगाचच पाहायची सवय मला अशी लहानपणापासूनची आहे. वयाचा आणि या सवयीचा काही एक संबंध नाही.
वांद्र्याच्या लेडी जमशेटजी मार्गावरून जो रस्ता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जातो, त्या रस्त्यावर, रेल्वेपुलाच्यावरही हेच वाक्य पुन्हा दिसलं आणि मग मात्र मला हे अनेक ठिकाणी दिसून आलं. तेच वाक्य आणि लिहायची ढबही तीच. स्प्रे पेंटींग करायच्या स्प्रेनं लिहिलेलं ते वाक्य ‘ग्राफिटी’ प्रकारचं आहे. ठिकाणं वेगळी असली तरी, त्यांच्यात एक समानता होती आणि ती म्हणजे हे वाक्य प्रचंड रहदारीच्या रस्त्यांशेजारच्या भिंतींवर रंगवलेलं होतं.
भितींवरील हे वाक्य मला गत शतकाल्या ९० च्या दशकात घेऊन गेलं. १९८५-८६च्या दरम्यान असाच एका शब्दाने धुमाकूळ घातलेला अनेकांना माझ्या आजुबाजुच्या वयाच्या अनेकांना आठवत असेल. तेंव्हा मोबाईल आणि इअरफोन नांवाची पिच्चर दाखवणारी भानामती नसल्याने, लक्ष आजुबाजूला असणे हाच टाईमपास असायचा. अशा त्या काळात ‘ताठे’ या दोन अक्षरी शब्दानेही असाच धुमाकूळ माजवला होता. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, रस्त्याशेजारी दगडावर, एखाद्या जुनाट लोखंडी फलकावर किंवा मग भिंतीवर किंवा दुकानाच्या एखाद्या बॅद शटरवर ‘ताठे’ हजर. साध्या खडूने काढलेली तीच दोन अक्षरं. तेंव्हाही मला याचं कुतूहल वाटलं होतं. माझ्या अनेक मित्रांना ‘ताठे’ अनेक ठिकाणी दिसल्यानं आमची त्यावर चर्चाही व्हायची. प्रथम ते आडनांव असावंस वाटल होतं. नंतर कुणीतरी ते कुरीयरशी संबंधीत नांव असावं अशीही शंका व्यक्त केली, परंतू तेंव्हा माहितीची साधनं अपूरी आणि कुमारवयाचा उंबरठा पार करून तारुण्यावर स्वार झालेल्या वयात असल्यानं, इतर अनेक आकर्षणही असल्याने, तो विषय नंतर मागे पडला, तो आता या निमित्ताने आठवला इतकच..!!
प्रथम हा एखाद्या सिनेमाचा टिझर असावा असं वाटलं, तर मग वर्ष उलटून गेलं तरी असा सिनेमा आल्याचं स्मरणात नाही. ही एखाद्या वस्तूची किंवा दुकानाची जाहिरात असावी, तर गत वर्षभरात तशी काही वस्तू किंवा दुकान पाहिल्याचंही आठवत नाही. गुगल करून पाहिलं, तर फक्त पत्त्यांच्या मेंढिकोट या खेळाचीच माहिती दिसते. मग हे नक्की काय असावं? एखाद्या रखडलेल्या सिनेमाची जाहिरातच की आणखी काही? की हा एखादा सांकेतीक इशारा असावा? की मग एखादा गुप्त संदेश, जो आवश्यक त्याच व्यक्तींना कळावा?
हे वाक्य वरवर जेवढ दिसतं, तेवढं ते निरुपद्रवी नसावं असा माझा अंदाज आहे. या वाक्यातील ‘मेंढीकोट’ या शब्दाने माझं लक्ष वेधून घेतलं. ‘मेंढीकोट’ या शब्दाचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला, त्यात पत्त्यांचे खेळच अधिक दिसले. शब्दकोशातही तेच दिसलं. नाही म्हणायला ‘मेंढीकोट’ या शब्दाचा उगम गुजराती भाषेत असल्याच एक त्रोटक उल्लेख सापडला आणि तो ‘મીંડું’ या गुजराती शब्दापासून झाला असावा असं एका वाक्यात लिहिलं होतं. म्हणजे मेंढीकोट या शब्दाच्या अर्थातून काहीच गवसलं नाही. मग या शब्दाचा अधिक विचार केला तेंव्हा हा शब्द काही अंमली पदार्थांच्या नावांशी साधर्म्य राखणारा आहे असं लक्षात येऊ लागलं. अर्थात, याला आधार काहीच नाही, परंतु मला ते वारंवार वाटतंय हे मात्र खरं. सध्या एम.डी. या अंमली पदार्थच नांव अनेकदा ऐकू येतंय आणि कॉलेजात जाणाऱ्या तरुणांमध्ये हा पदार्थ लोकप्रिय असल्याचाही वाचनात आलेलं आठवतं. ‘मेंढीकोटा’तला ‘मेंढी’ हा शब्द मला एम.डी. या शब्दाशी नातं सांगणारा वाटतो. तसाच ‘मँड्रेक’ हा शब्दही ‘मेंढीकोट’ला जवळचा वाटतो. आणखी एक ‘केटामाईन’ नांवाचा अंमली पदार्थ आहे, जो उच्चभ्रूंच्या रेव्ह पार्ट्यांसाठी आवश्यक असलेला पदार्थ आहे, तो ही मेंढीकोट शब्दातील ‘कोट’ शब्दाला जवळचा वाटतो..’मेंढीकोट’ या शब्ची विविध प्रकारे फोड केली असता, मला एवढी कॉम्बिनेशन्स सापडली. हे कदाचित मी म्हणतो तसं नसेल किंवा हे सारे माझ्या मनाचे खेळही असतील, परंतु मुंबईतल्या विविध स्तरातील तरुण-तरुणींमध्ये वाढत चाललेलं अंमली पदार्थांच व्यसन पाहता, त्यांना या वाक्यातून अंमली पदार्थाच्या उपलब्धतेविषयी तसा संदेश दिला जात असण्याची शक्यता नाकारताही येत नाही.
अर्थात, मुंबई शहरात विविध ठिकाणी दिसत असलेला हा संदेश नेमका कसला आहे आणि तो कोणी लिहिला आहे हे शोधून काढण हे तपास यंत्रणांच काम आहे व ते ते करतही असतील असं मी समजतो. याकडे आपलं लक्ष वेधून घेणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा लेखन प्रपंच. इंग्रजी-हिंदी वृत्तपत्रांनी याची दखल पूर्वीच घेतलेली आहे, परंतु मराठी वृत्तपत्र किंवा सोशल मिडियावर याची अजिबात दाखल घेतली गेलेली नाही याचं आश्चर्य वाटतं. आपल्याला या विषय संबंधात काही माहीती असली, तर शेअर करायला हरकत नाही..
— नितीन साळुंखे
9321811091
(फोटो गुगलवरून घेतले आहेत.)
मी गेली दहा वर्षांपासून मुंबई च्या कोणत्या ना कोणत्या भिंतीवर हे लिहिलेले वाचतोय. तेंव्हा आश्चर्य वाटून एका दोघा मित्रांना विचारले ही के काय आहे, पण कोणालाच माहिती नव्हते. पोलिसांना नक्की माहीत असायला हवे, पण ते गप्प आहेत.
मी सूध्दा हे वाक्य मानखूर्द जवळ पाहिले आहे. आजपर्यंत ह्या वाक्याकडे एक जोक म्हणून बघितलं होतं. पण हा लेख वाचून विचार करायला एक नवी दिशा मिळाली आणि त्यातील गांभीर्य समजलं. धन्यवाद !