प्लास्टिकला अगदी सहजगत्या पाहिजे तसा आकार देता येतो. ज्या वस्तूंना कमी-जास्त दाबाने अथवा उष्णता व दाब या दोन्हींच्या साहाय्याने हवा तो आकार प्राप्त करण्याचा गुणधर्म असतो ती वस्तू प्लास्टिक आहे असे समजतात. प्लास्टिकला अंग व मजबुती देण्याकरता रंगद्रव्य, पाणी व तंतूमय पदार्थ वापरतात. तथापि त्याला आकार देण्याचे व आकार धारण करण्याचे कार्य करणारा मुख्य घटक हा उच्च भाराचा कार्बनी पदार्थ असतो. या आकारी कार्बनी घटकाला अनेक वेळेला रेझिन असे म्हणतात. पूर्वी ग्रामोफोनच्या तबकड्या ‘लाख’ या नैसर्गिक रेझिनपासून बनवत. हल्ली प्लास्टिकच्या बहुतांश वस्तू या संश्लेषित रेझिनवर आधारित असतात. रेझिन व प्लास्टिक हे शब्द बऱ्याच वेळेला समान अर्थी म्हणून वापरतात. रेझिन पाण्यात अविद्राव्य असून त्याला स्वतंत्र अस्तित्वच नसते. तो बहुवारीकाचा अविभाज्य भागच असतो. एकवारीकाचे (मोनोमर) अनेक रेणू एकत्र येऊन बहुवारिक (पॉलिमर) बनते. शुद्ध कार्बनी पदार्थाप्रमाणे त्यांना विलय बिंदू अथवा उत्कलन बिंदू नसतो. बहुवारिकाला इंग्रजीत पॉली म्हणतात. त्यात जो एकवारिक असतो. त्याच्या नावापुढे पॉली असे लावतात. उदाहरणार्थ पॉलिइथिलिन. यात इथिलिन या एकवारीकाचे बहुवारीकरण केलेले असते. नायलॉन म्हणजे पॉलिअमाइड. यात अमाइडचे बहुवारीकरण असते.
काही बहुवारीकांच्या निर्मितीसाठी, दोन रासायनिक संयुगांची जरुरी असते. बेकेलाइट प्लास्टिकसाठी लागणारे फिनोलिक रेझिन फिनोल व फार्माल्डिहाइड यांच्या प्रक्रियेने तयार होते. हे बेकेलाइट प्लास्टिक डायनिंग टेबले. टी-पॉयसाठी इत्यादी वस्तूंसाठी वापरले जाते. शोभिवंत वस्तूंसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पत्र्यासाठी युरिया, मेलामिन या अमिनो वर्गाच्या संयुगांची रेझिन वापरतात.
एकवारीकांच्या निर्मितीसाठी अथवा रेझिनच्या निर्मितीसाठी लाकडाचा भुसा, सेल्यूलोज, तंतुमय काच, इतर नैसर्गिक व संश्लेषित तंतू व माती अथवा तत्सम खनिज पदार्थ वापरतातं. रेझिनसाठी वापरले जाणारे फिनोल डांबराच्या उर्ध्वपतनापासून बनवतात. फिनोलिक रेझिन प्लास्टिक पृष्ठलेपासाठी रंग म्हणून वापरतात. काजूचे तेल हे एक प्रकारचे फिनॉलच आहे.
अ.पां. देशपांडे, (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply