आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे लेखक श्री जयराम भिडे यांचा हा लेख.
कोणत्याही नाटकाची वा चित्रपटाची कथा प्रत्यक्षात फुलत जाते आणि मनावर ठसते ती पार्श्वसंगीताने. अलीकडे आलेल्या कांतारा या चित्रपटात पार्श्वसंगीत म्हणून लोक संगीताचा केलेला वापर चित्रपटास वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
चित्रपट असो की जीवनपट पार्श्वसंगीत असतेच. फक्त जीवनपटात येणारी वाद्य व त्याचे संगीत स्वर वेगळे असतात इतकेच.
मानवाच्या जीवनपटाच्या पार्श्व संगीतात विविध वाद्य व त्यांचे संगीत कर्म स्वरूपात वाजत राहतात व साथ संगत करतात. हे कर्म संगीत त्याचे आयुष्य सर्व अर्थाने समृद्ध करून जाते.
हे वाचत असताना प्रत्येकास वाटेल ” हे काय नवीन आज?” हा वेगळा विचार डोक्यात येण्याचे कारण तसे वेगळेच.
उत्तर आयर्लंड मध्ये आता दिवस लहान होत चालला आहे. सकाळी आठ वाजता सूर्य दर्शन तर दुपारी पाच वाजताच पूर्ण अंधार. या वातावरणात लांबचा प्रवास करणे अवघड झाले आहे. त्या मुळे जवळील कोणते तरी ठिकाण पहावे असा विचार मनात आला. बेलफास्ट सिटी सेंटर जवळ जॉर्ज वीकेंड मार्केट आहे हे कळले. ते पाहण्यासाठी निघालो.
जॉर्ज मार्केट मध्ये प्रवेश करताच मला पुण्यातील तुळशी बागेत आल्याचा फील आला. कपडे, शोच्या वस्तू, दागदागिने, खादाड गल्ली इत्यादी. येथील एका वेगळ्या बाजाराने माझे लक्ष वेधून घेतले, तो म्हणजे जुन्या वस्तूंचा बाजार. जुन्या वस्तूंचा बाजार पाहताच मला सोलापूर मधील बुधवार बाजाराची आठवण झाली. येथे बाजारात जुने फोन,कपबश्या,किटली ,घड्याळे ,विविध वाद्य नजरेत भरत होती. तेव्हड्यात तेथील जुन्या टाईप राईटर वर माझी नजर खिळली.
टाइप राईटर कडे निरखून पाहत असतानाच मला की बोर्ड वरती बोटे नाचत आहेत असे वाटू लागले आणि टायपिंगचा Chik-chik-cha-chik-chik-chika-chik-cha-chik-Ding-ziiiiiiiiiiiiiiiip-Chik-chik-chik…….
असा आवाज माझ्या कानात घूमू लागला. त्या आवाजाच्या पार्श्वसंगीता वर मी टाईम मशीन मध्ये बसल्या गत पन्नास वर्षे मागे गेलो.
आमच्या घरी भाऊंचा ( माझे वडील) स्मिथ कंपनीचा टाईप रायटर होता. भाऊ कोर्टात टायपिस्ट होते. त्यांची इंग्लिश वरती कमांड तर होतीच त्याच बरोबर टायपिंग चा स्पीड 100 /मी शब्दाच्या वरती होता. या गुणांमुळे त्यांचा कोर्टात दबदबा होता. त्यांच्या कडे अनेक जण टायपिंगची काम घेऊन येत.
ते कामावरून घरी आले की टाईप राइटर वरती काम करत असत. त्यांचे काम चालू असताना मी निरखून पाहत असे.एक ओळ पूर्ण होत आली की टिंग अशी घंटा वाजायची. ती वाजली की वडील डाव्या हातास असणारा रॉड ओढून कागद वर सरकवत त्याचा ziiiiiiiiiiiiiiiip- असा आवाज व्हायचा आणि परत टायपिंगचा Chik-chik-chik……. असा आवाज सुरू.याच आवाजाच्या पार्श्वभूमीवर आम्हा चारी भावंडांचा अभ्यास चाले.
असच आणखी एक जीवनपटातील वाद्य म्हणजे शिलाई मशीन. माझी आई शिवण शिवायची. तिच्या कडे येणारे काम व सणाचा काळ या नुसार मशीनचा कमी जास्त प्रमाणात आवाज आमच्या घरात चाले. ती बरेच काम आम्ही शाळेत असताना करावयाची किंवा आम्ही झोपल्यावर.जेणे करून आमच्या अभ्यासात वा झोपेत व्यत्यय येऊ नये. आज ही तो आवाज मनात आहे .
तिसरा आवाज म्हणजे भांड्यावर नाव घालणाच्या मशीनचा आवाज. मी व्यवसाय करत कॉलेज शिक्षण घेतले.
पंतप्रधान सुशिक्षित बेकार योजने खाली कर्ज काढून भारत स्टील सेंटर या नावाने स्टील भांड्याचा व्यवसाय सुरू केला होता. भांड्यावर नाव घालणाऱ्या मशीनचा नाव घालताना घुररर … घुर घुरर असा आवाज होई. हा आवाज हाताला व कानाला जाणवत असे. एका वेळेस वीस पंचवीस भांड्यावर नावे घालावी लागत. त्या मुळे हा आवाज पुढे दिवस भर शरीरात घुमत राही.
तर अशा या टाईप राईटर्, शिलाई मशीन, भांड्यावरती नाव घालणारे इलेक्ट्रिक मशीन यांच्या पार्श्वसंगीतावर आम्हा भावंडांचे जीवनपट उलगडत गेले व आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या समृध्द झाले.
असेच प्रत्येकाचे जीवन विविध आवाजाच्या सानिध्यात आले असेल यात शंका नाही. असे पार्श्वसंगीत आठवा आणि जीवनात आलेल्या अनोख्या वाद्यांच्या ठेक्यावर आपलेच
जीवन गाणे आनंदाने गात रहा.
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावेजीवनगाणे गातच रहावे !
— श्री जयराम भिडे
7/11/22
(वरील गाण्यातील शब्द आपली माणसे या चित्रपटातून)
Leave a Reply