अर्धवट बांधकाम झालेल्या एका ३० मजली टॉवरला लोंबकळत असलेले प्रेत राजा विक्रमादित्याने आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये कोंबले आणि तो शासकिय शवागराकडे निघाला. प्रेतात बसलेल्या वेताळाने एक दीर्घ सुस्कारा सोडला अन् म्हणाला-
‘ विक्रमा… अशी किती प्रेते तू शवागराकडे घेऊन जाणार आहेस? तूझं मन वरवर तर खूपच शांत दिसत आहे. पण शांत राहीलास तर तुझीही गत त्या बगळ्या व बावळ्या सारखीच होईल. थांब तुला मी गोष्टच सांगतो……’
एका वनात बरेचसे बावळे, थोडेसे बगळे आणि काही कावळे होते. बऱ्याच काळानंतर वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला आणि कावळे हळू आवाजात काव काव करू लागले. अभयारण्यातील एका सुंदर तळ्याकाठी बगळे शांत चित्ताने शिकार करीत. पूर्वी ते शिकार करताना एक पाय वर करीत असत पण आता ते तसं करत नव्हते. ते निश्चिंत होते. बावळ्यानां स्वत:चे काहीच मत नव्हते म्हणून तेही निश्चिंत होते. कावळ्यांचे मात्र तसे नव्हते. अनेक वर्षे गेली. एक दिवस कावळे झुंडीने तळ्याकाठी आले. येण्यापूर्वी आपापल्या चोचानां त्यांनी धारही लावली. बगळे नेहमी प्रमाणे शांत उभे होते आपल्या सावजांची वाट बघत. तळ्यात भरपूर कमलपुष्पे फुललेली होती. एक कावळा म्हणाला-
‘रे काळ्याकुट्ट कावळ्यानो !!! इथे काय करत आहात? हे तळे आमचे आहे. निघा इथून.’..
बगळे सभ्रंमात पडले. एकमेकांकडे बघू लागले. एक बगळा म्हणाला-
‘रे, कावळ्या…आम्ही बगळे आहोत…शुभ्र पांढरे..तुम्ही कावळे…कुट्ट काळे.’
कावळे एका सुरात जोरजोरात कावकाव करू लागले. मग दुसरा कावळा चोचओठ खात म्हणाला-
‘आम्ही खरे या तळ्याचे मालक. आम्ही आहोत खरे बगळे. चला निघा येथून..’
आणि कावळे आपल्या धारदार चोचींनी बगळ्यावर तुटून पडले. बघता बघता तळ्याचे पाणी लाल झाले जणू काही कमलपुष्पांचे प्रतिबिंब………हे अगदी अनपेक्षित घडले. बगळे गाफिल राहिले होते मात्र कावळे आपली आखणी करत होते. लांबून काही बावळे हे बघत होते. कावळ्यांनी लगेच त्यानां घेरले. एका कावळ्याने विचारले-
‘रे बावळ्यानो तुम्ही काय बघितले.’?
बावळे म्हणाले- ‘तुम्ही बगळ्यानां मारून टाकलंत. कावळे तर तुम्ही आहात’
मग कावळे त्या बावळ्यावर सर्व ताकदीने तुटून पडले अन् हकनाक मेले….
वेताळ आपली गोष्ट थांबवत म्हणाला-
‘राजा सांग बरे बगळे आणि काही बावळे का मेले?’
राजाला उत्तर सुचेना. पूर्वी चांदोबामामाच्या राज्यात असताना त्याला सर्व उत्तरे कशी पटकन सुचत असत. मग आत्ता काय झाले बरे? यावर वेताळ म्हणाला-
‘राजा…गोंधळू नकोस… मीच सांगतो. बगळे या साठी मेले की त्यानां माहित होतं कावळे खोटं बोलत आहेत आणि बावळे यासाठी मेले की त्यानां माहित होतं आपण खरं बोलत आहोत’….
विक्रमादित्याने पाठीवरील सॅक खाली ठेवली. वेताळाने शरीरला हलका झटका दिला आणि पुन्हा त्याच टॉवरकडे चालू लागला.
— दासू भगत
Khup chan!!! keep posting
Thank you very much