बागेतील फुलपाखरा, काय शोधशी फुलाफुलात,
जसा रमे जीव साऱ्यांचा,
लहानग्या मुलां – मुलांत,–!!!
अर्धोन्मीलित त्या कळ्या,
उघडून आपल्या फुलात,
फुलवून सगळ्या पाकळ्या,
तुझ्यासंगे कशा गमतात,–!!!
रेंगाळशी तू कसा,
वाऱ्यावरती गीत गात,
पंख तुझे फडफडवतांना,
रंगांची मोहक बरसात,–!!!
कुठल्या निवडशी फुलां,
काय असते अंतरात,
टिपत असंख्य परागकणां,
काय चाले हितगुजांत,–!!!
दंग होशी ना मित्रा,
कसा विसरशी भान सुगंधात,
चुकून काट्यांचा स्पर्श होतां,
कोण औषध लावे घावांत,–?
थंडगार त्या झुळुका,
अंगाला असतील झोंबत,
नाजूक, कोमल, तरल, मुलायमा, सहशी कसे हे आघात,–!!!
सापडे कसा तुला रस्ता,
कोण दाखवतो वाट,
काय करीशी मार्ग चुकता,
पुन्हा जाण्याची निसर्गात,–!!!
आपल्या सुंदर अंगकांतीला,
युक्ती कोणती स्वच्छ ठेवण्यात, निसर्गाच्या सुंदर लेकरा,
मजा वाटे तुला निरखण्यात,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply