एखाद्याचं व्यक्तिमत्त्व केसांमुळे अधिकच खुलून येतं असं म्हटल्यास ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यामुळेच केस गळणं हा एक चिंतेचा विषय ठरू शकतो. बघता बघता डोक्यावरील केस गळायला लागतात आणि लवकरच, टक्कल पडण्याची भीती वाटायला लागते. साधारणतः डोक्यावर असलेल्या केसांमधील १० टक्के केस गळणं हे तसं स्वाभाविक मानलं जाऊ शकतं. हे केस गळण्याआधी ‘गळण्याच्या स्थितीत’ असतात.
तीन ते चार महिन्यांतच ते गळू पडतात आणि त्याजागी नवीन केस उगवतात. साहजिकच रोज काही केस गळणं ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे ज्याविषयी चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. पुरुषांमध्ये टक्कल असण्याचा एक सर्वसाधारण प्रकार म्हणजे Androgenic Alopecia (ॲण्ड्रोजेनिक अॅलोपेशिया). या प्रकारात, केस एका ठराविक पद्धतीने कमी होतात किंवा गळून पडतात. कानाच्या वरील भागापासून डोक्यावर टाळूपर्यंत टक्कल पडतं. क्वचित डोक्यावर कडेने आणि डोक्याच्या मागील भागात काही केस राहतात. याचंच रुपांतर पुढे पूर्ण टक्कल पडण्यातही होऊ शकतं. अंदाजे २५ टक्के पुरुषांना वयाच्या तिसाव्या वर्षी टक्कल पडण्यास सुरुवात होते.
दोन तृतीयांश पुरुषांना वयाच्या साठाव्या वर्षी टक्कल पडू लागतं. पुरुषांमध्ये अशा प्रकारचं टक्कल पडणे हे शरीरातील एका जनुकामुळे (Gene) होतं. यामध्ये भरपूर प्रमाणात टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचे रुपांतर डिहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये होतं. हे संप्रेरक केसाच्या मुळाशी जाऊन बसतं ज्यामुळे केस आणि मूळ दोघांचाही नाश होतो. याव्यतिरिक्त टक्कल पडण्यामागे मानसिक ताण, धूम्रपान, पूरक अन्न न घेणं, रक्तक्षय, केमोथेरपी, फंगल इन्फेक्शन इत्यादी असू शकतं; पण सर्वात महत्त्वाचं कारण अर्थातंच अनुवांशिकता होय! कुटुंबातील व्यक्तीमध्ये एखाद्याला अशा प्रकारचं टक्कल असल्यास पुढील पिढीमध्ये टक्कल पडण्याची शक्यता वाढते. टक्कलावर साधा सरळ उपाय म्हणजे केसांचा टोप; पण आधुनिक काळात असे अनेक उपचार उपलब्ध आहेत ज्याने डोक्यावर पूर्वस्वरूपात आणता येतात. या उपायांना भरपूर मागणीही आहे.
डॉ. अपूर्व शहा
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply