“बळींचा प्रवाहो चालला !”
या नावाची कथा मी लिहिली होती – माझ्या वालचंदच्या मित्रावर ! सरकारी नोकरीच्या बरबटलेल्या व्यवस्थेने घुसमट झालेल्या माझ्या कविमित्रावर – जो कालांतराने शेवटी या व्यवस्थेचा भाग झाला . त्याच्याकडे पर्याय नव्हता.
सकाळी काही सामान घ्यायला गेलो होतो. नेहेमीचे तीन दुकानदार विषण्णपणे सांगत होते – ” आम्हीं जातो आमच्या गांवा ! अर्ज केलाय. परवानगी मिळाली की निघू. सगळं कोरोना प्रकरण स्थिरस्थावर झाल्यावर परतू. ”
त्यांच्या बोलण्यातला सन्नाटा भयाण उद्धवस्थतेची नांदी सांगत होता. दोन महिन्यांची अनिश्चित अस्वस्थता भोगत रोज दुकाने उघडून आमच्या दैनंदिन गरजा भागविणारी ही मंडळी – एका फोनवर केव्हांही , काहीही घरपोच आणून देणारी ही मंडळी ,आज मात्र वेगळ्या होष्यमानाला ओ देऊन परतणार आहेत – निर्वासित ? स्थलांतरीत ? विस्थापित ?
माझ्या आजी व्यंकटेश स्तोत्रातील एक ओळ आम्हांला ऐकवीत- (आमचे पाय जमिनीवर स्थिर राहावेत म्हणून ) –
” अन्नासाठी दाही दिशा !
आम्हां फिरविशी जगदीशा !! ”
माझ्या वडिलांनी आयुष्यभर आणि मीही आत्ता आत्तापर्यंत या ओळी अनुभवल्या आहेत.
मला खरंच प्रश्न पडलाय – व्यंकटेश माडगूळकरांच्या भाषेत ही मंडळी “जगायला “इथे आली आणि आता अर्धवट जगून झाल्यावर ” चाला वाही देस कां ?”
माझ्या कथेच्या वरील शीर्षकात (मित्र मध्यवर्ती असल्याने ) मी ” बळींचा ” असा उल्लेख केला होता , पण या पोस्टसाठी प्रश्न पडलाय – काय इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घालू ?
“बळींचा “- रोज रस्त्यावर अपघातात मरणाऱ्या निष्पाप मजुरांचा ?
“प्रवाहो “- लाखावर संख्या गेली तरी सतत वाहता हा प्रवाह म्हणून ?
की
“चालला “- रस्त्यांच्या लांबी-रुंदीला हरवत निघालेल्या तांड्यांचा ??
जगदीशाच्या मनातलं समजेनासं झालंय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply