वर्म दावी सोपें भाविका गोपाळा । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देव ते गौरव सुखें मानी ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥
वस्त्रे घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥
त्यांच्या वचनाची पुष्पे वाहे शिरी । नैवेद्य त्यांकरी कवळ मागें ॥६॥
त्यांचिये मुखीचें हरोनियां घ्यावे । उच्छिष्ट ते खावें धणीवरी ॥७॥
वरी माथा गुंफे मोरपिसावेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदे ॥८॥
छंदे नाचतील जयासवे हरि । देहभाव वरी विसरली ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । तेचि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकाची न कळता घ्यावी । न मागता दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply