बंद घरात बंद भिंतीत
कितीतरी घुसमट आहे
निःशब्द डाव भातुकलीचे
ती अबोल कितीतरी आहे..
चूल आणि मुलं यात
ती गुरफटून अबोध आहे
कर्तव्य तिचेच तिला मग
बंदिस्त घरात व्यापून आहे..
न प्रेम न जीव न काहीच
दोघांत सूर सारे बेसूर आहे
हवे ती शरीरासाठी रात्री
बायकोचे लेबल समाजमान्य आहे..
मन नाही भाव नाही
संसार हा डाव आहे
श्रुंगार न कसला तो
समाजमान्य बलात्कार आहे..
कितीक केले तरी
किंमत शून्य आहे
संसार असतो तिचाही
सुख शोधण्यात ती व्यतीत आहे..
मागून प्रेम मिळत नसते
नशिब खडतर प्रवास आहे
कित्येक अशा अभागी मग
प्रेम जीवनात रुसून आहे..
आयुष्य सुकलेला पाचोळा
मन मरुन इच्छा दबून आहे
कित्येक स्त्रिया अशा कमनशिबी
मूक रुदन निःशब्द जीवन आहे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply