उड्या मारित चिवचिवत, एक चिमणी आली
दर्पणाच्या चौकटीवरती, येवून ती बसली
बघूनी दूजी चिमणी दर्पणी, चकीत झाली होती
वाटूं लागले ह्या चिमणीला, आंत अडकली ती
उत्सुकता नि तगमग दिसे, ह्या चेहऱ्यावरी
चारी दिशेने बघत होती, आंतल्या चिमणी परी
औत्सुक्याचे भाव सारे दिसती, आतील चिमणीतही
कशी करूं तिची बंधन मुक्ती, काळजी लागून राही
चोंच मारीते आवाज करिते, यत्न केले सारे
श्रम होवूनी थकूनी गेली, हातीं न कांहीं उरे
चिंता लागली चिंता बघूनी, ह्या चिमणीला
चलबिचल ही जेवढी होती, तसेंच दिसे हिला
स्वबांधवांना मदत करणे, त्यांच्या संकटी
पशू पक्षांतही दिसून येते, तत्वें ही मोठी
चालले होते प्रयत्न निष्फळ, या चिमणीचे
परि जिद्द ठेवतां भान नव्हते, आपल्या देहाचे
कांच पडली फूटून खालती, तडा त्यास जावूनी
एक आवाज तो तेथे घुमला, घाबरली चिमणी
जरी देह झाला रक्तबंबाळ, यश चमकले तेथें
समजत होती चिमणी बिचारी, बंधन तोडले ते
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply