बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ रोजी त्या वेळच्या कुलाबा जिल्हय़ातल्या आंबेत या गावी झाला.
महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या ५० वर्षात जे पाच-दहा ठळक नेते होते, त्यात बॅ. अंतुले यांना मोजल्याशिवाय राजकीय इतिहासकारांना पुढे जाता येणार नाही. कुलाबा जिल्हय़ातल्या आंबेतसारख्या एका डोंगराळ छोटय़ा गावात जन्माला आलेल्या अंतुले हे प्राथमिक शिक्षणाकरिता रोज सहा मैल पायपीट करत असत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून जेव्हा लंडनहून बॅरिस्टर ही पदवी घेऊन मुंबईला आले तेव्हा त्यांना सामाजिक कामच खुणावत होते. तो काळ काँग्रेसच्या दृष्टीने प्रतिकूल काळ होता. १९५७च्या विधानसभा निवडणुकीत समितीचेच वातावरण होते. असे असताना, काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यावेळचे समितीचे नेते सुरबानाना टिपणीस यांच्याविरुद्ध बॅ. अंतुले विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आणि मोठ्या मताने पडले; पण नंतर १९६२ पासून १९८० पर्यंत विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघाने त्यांना विजयीच केले एवढेच नव्हे तर, १९८९-१९९१ या दोन लोकसभा निवडणुकीत रायगडच्या जनतेने त्यांना लोकसभेत पाठवले आणि ते केंद्रीय आरोग्यमंत्रीही झाले.
आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, राज्यसभेचे खासदार, १९८० साली मुख्यमंत्री, १९८९ साली खासदार, १९९१ साली खासदार, केंद्रीय मंत्री अशा चढत्या श्रेणीने गेल्या ५० वर्षात अंतुले यांना राजकीय पदे मिळत गेली; पण स्वस्थता काही मिळू शकली नाही. हाती असलेले पद किती दिवस आहे, याचा त्यांनी विचार केला नाही. त्या पदाचा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याकरिता सत्ता वापरणा-या नेत्यांच्या यादीत अंतुले यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. एक अल्पसंख्याक समाजाचा नेता महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि हाती आलेली सत्ता हा नेता गरिबांकरिता राबवतो, हे सहन न झालेल्या मंडळींनी त्यांच्याविरोधात उघडलेल्या मोहिमेला यश आले आणि अंतुले पायउतार झाले; पण हाती असलेल्या सत्तेत त्यांनी नेहमीच आपली वकिली गरिबांसाठी केली.
१९७२ साली बांधकाममंत्री असताना त्यांनी रायगड, रत्नागिरी जिहय़ात जे साकव, जे पूल बांधले ते आजच्या उड्डाणपुलाच्या काळाएवढे चर्चेत नव्हते. यंत्रसामग्रीत तांत्रिकता नसताना केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर साळाव, मुरुड,आंबेत खाडी, गोरेगाव खाडी, भाट्याची खाडी यावरील पूल उभे राहिले.आजचा आणे-माळशेज घाट किंवा आजचा बोरघाट तोडून झालेला एक्सप्रेस हायवे या सगळ्याचे मूळ पुरुष अंतुले होते. पुण्याचा घाट तोडण्याचे काम त्यांनीच सुरू केले. त्यांचेच कॅबिनेट मंत्री जयंतराव टिळक एकदा घाटात अडकले आणि मग अंतुले स्टाईलने या घाटाच्या डोंगरमाथ्याला हात घातला गेला. ‘जे करायचे ते मनापासून’ अशा जिगरबाज वृत्तीचा हा नेता होता.
आज वांद्रे कॉलनीत मंत्रालयातल्या मध्यमवर्गीयांना व्यवसायासाठी सरकारी जागेवर जे दोनशे गाळे मिळाले आहेत, त्या गाळ्याचे वाटप करण्याची कल्पना अंतुले यांचीच होती. कमी पगारावर काम करणा-यांना उद्योजक करता आले पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आज वांद्रय़ातील दोनशे लोक सरकारी कर्मचारीही आहेत आणि उद्योजकही आहेत. राज्यातल्या गरीब निराधारांना रोज दोन रुपये याप्रमाणे महिना साठ रुपये ‘संजय गांधी निराधार योजने’तून देण्याची एक जबरदस्त योजना अंतुलेच राबवू शकले. आज या चांगल्या योजनेचे वांगे सरकारने वाजवले आहे.
महाराष्ट्रातल्या ज्या कोरडवाहू शेतक-यांना बँकेचे कर्ज फेडणे शक्य नव्हते, अशा कर्जबाजारी झालेल्या शेतक-यांचे एकूण ५० कोटी रुपये अंतुले यांनी एका फटक्यात माफ करून टाकले. रिझव्र्ह बँकेने मुख्यमंत्र्यांना फतवा पाठवला. विचारले, ‘तुम्ही कर्ज माफ करणारे कोण?..’ अंतुले यांनी उत्तर दिले की, ‘तुम्ही विचारणारे कोण?, तुम्हाला ५० कोटी रुपये व्याजासह मिळाले पाहिजेत, एवढेच ना! ते पैसे कोण भरतो, याची चिंता तुम्हाला कशाला?’ आणि ती रक्कम सरकारने बँकेकडे भरली. अंतुले यांची बांधिलकी कोणाशी होती, ते सांगणा-या या घटना आहेत. प्रस्थापित गोष्टीविरुद्ध निर्णय घेण्यात अंतुले आघाडीवर असायचे आणि त्या दिवशी त्यांच्या डोक्यात तोच विषय असायचा. त्यामुळे मंत्रालयात फलोद्यान या विषयाचे कृषी खात्यात एक अवघे टेबल होते, त्या एका टेबलाचे एका रात्रीत ‘पूर्ण फलोद्यान खाते’ तयार करण्याची किमया फक्त अंतुलेच करू शकतात आणि तो त्यांचा निर्णय किती योग्य होता, हे आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बहरलेल्या फळांच्या बाजाराने सिद्ध केले आहे.
१९७२ साली ते बांधकाममंत्री असताना, त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या बांधकाम खात्याचा सचिव ‘आय. ए. एस.’ आहे. या खात्याला ‘आय. ए. एस.’ हा सचिव कशाला? मुख्य अभियंता हा तांत्रिक अधिकारी आहे. तोच सचिव असला पाहिजे. हे मनात आल्याबरोबर वसंतराव नाईक यांच्या कॅबिनेट समोर जाऊन अंतुले यांनी ‘बांधकाम आणि पाटबंधारे या दोन खात्यांचा सचिव मुख्य अभियंता असेल,’ हा निर्णय करून घेतला. मंत्रालयातल्या आय. ए. एस. लॉबीला धक्का लावणे सोपे काम नव्हते. त्याचप्रमाणे ते कायदामंत्री असताना, महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयात पहिल्याप्रथम मराठी महाअधिवक्त्याची (ॲडव्होकेट जनरल) नेमणूक त्यांनी केली आणि ॲडव्होकेट रामराव आदिक पहिले महाअधिवक्ता झाले. तेसुद्धा ॲतपीलेट साईडचे. नाही तर महाअधिवक्ता ही जागा पारशी वकिलालाच आणि ओरिजनल साईडला असायची. अंतुले यांनी हे बदलून टाकले. त्यांचा कायद्याचा अभ्यास कमालीचा आहे म्हणून तर नानी पालखीवाला यांना उत्तर देण्यासाठी अंतुले यांनी लिहिलेले ‘अपॉईमेंट ऑफ चीफ जस्टीस’ हे त्यांचे पुस्तक गाजले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात बेळगाव, कारवार महाराष्ट्राला मिळाले पाहिजे, यासाठी किती वर्षे लढा सुरू आहे. सीमाप्रश्नासाठी नेमलेल्या महाजन कमिशनने महाराष्ट्रावर अन्याय करताच, त्यावेळी नुसते आमदार असलेल्या अंतुले यांनी ‘महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड’हे पुस्तक लिहून त्या अहवालाची चिरफाड केली. त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यास कर्नाटक सरकार धजावलेले नाही. त्याचे श्रेय अंतुले यांना आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर अंतुले यांची कारकीर्द अवघ्या १८ महिन्यांची असली तरी, त्यांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले आणि ते घेतानासुद्धा गरीब माणसाला समोर ठेवले. अंतुले मुख्यमंत्री होईपर्यंत मंत्र्यांचे ड्रायव्हर हे सरकारी नोकरीत नव्हते, मंत्र्यांच्या मर्जीवर ठेवले, काढले जायचे. अंतुले यांनी मंत्र्यांच्या सर्व ड्रायव्हर्सना सरकारी सेवेत घेतले. एवढेच नव्हे तर, सर्व ड्रायव्हर्ससाठी सरकारी मोकळी जागा देऊन त्यांच्या निवासाचाही विषय संपवून टाकला. आज हे ड्रायव्हर लोक अगदी छोटय़ा श्रेणीचे कर्मचारी असले तरी, त्यांच्या मनात अंतुले यांच्याबद्दलची जी भावना आहे, ती भावना कोटीत मोजता येणार नाही. अशा गरीब माणसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच अंतुले यांची शक्ती होती. त्यांची ईश्वरावर श्रद्धा होती तशी शिवाजी महाराजांवरही कमालीची होती. त्यामुळेच मंत्रालयात प्रवेश केल्याबरोबर समोर छत्रपतींचे जे भव्य चित्र दिसते, ते तेथे लावण्यासाठी अंतुलेच मुख्यमंत्री व्हावे लागले! ते मुख्यमंत्री होईपर्यंत १९६० ते १९८० या २० वर्षात कोणत्याही ‘छत्रपती मुख्यमंत्र्याला’ अस्सल छत्रपतींचे चित्र लावावेसे वाटले नव्हते! ते काम अंतुले यांनी केले. रायगड किल्ल्याचे नाव कुलाबा जिल्हय़ाला देऊन त्यांनी महाराष्ट्राची आणखीन एक आठवण सरकारी कागदपत्रात जागवली. ‘किल्ले रायगड’प्रमाणेच ‘जिल्हे रायगड’ ही नोंद अंतुले यांच्यामुळेच घ्यावी लागली. त्यांची संजय गांधी निराधार योजना, त्यांची फलोद्यान योजना, त्यांची स्वातंत्र्यसैनिक स्मारक योजना अशा कितीतरी योजना त्यांनी अमलात आणल्या. केंद्रीय आरोग्यमंत्री झाल्यानंतर आज देशभरात यशस्वी झालेली छोटय़ा बालकांची ‘पोलिओ डोस योजना’अंतुले यांनीच सुरू केली आहे, हे किती जणांना माहीत आहे? आज भारत पोलिओमुक्त झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणपत्र दिले आहे आणि या यशस्वी मोहिमेचे सूत्रधार होते बॅ. अंतुले. जे काम हातात घेतले त्या कामात प्राण घालून त्याला न्याय द्यायचा, अशी त्यांची प्रत्येक कामाबद्दलची भावना होती. त्यांचे ड्राफ्टींग जबरदस्त होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते होते. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतरही गेली ३२ वर्षे अंतुले या नावाची जनसामान्यांवर मोहिनी होती.
अब्दुल रहमान अंतुले यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी यांचे निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply