आयुर्वेदानुसार वातज विकारांसाठी ‘बस्ती’ हे शोधनकर्म परमश्रेष्ठ मानलेले आहे. वाताचे मुख्य स्थान ‘पक्वाशय’ आतडे असून, त्या ठिकाणाचा वातदोष जिंकल्यास शरीरातील इतर वातविकारांवर नियंत्रण ठेवता येते.
बस्तीयोग्य विकार- संधिवात, अंगदुखी, हृदयविकार, स्थुलता, कृशता, अर्धांग वायू (लकवा), कंपवात पारकिन्सन्स डिसीज, गर्भाशयाचे विकार इत्यादि.
बस्तीचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत.
परंतु मुख्यतः दोन प्रकारचे बस्ती सध्या व्याधी नष्ट करण्याकरिता वापरले जातात.
१) निरुह किंवा आस्थापन बस्ती-प्रामुख्याने काढे वापरले जातात.
२) अनुवासन बस्ती- मुख्यतः स्नेहद्रव्यांचा (तेल तूप इत्यादिचा) वापर केला जातो.
स्त्रियांच्या विकारांमध्ये उत्तरबस्ती-योनिमार्गाने औषधसिद्ध काढा देणे- देता येतो. बस्तीकर्म हे ७-१५ दिवस व्याधीनुरूप केले जाते. काही रुग्णांमध्ये सलग ७ दिवस अनुवासन बस्ती दिला जातो तर काहींमध्ये १५ दिवसांपर्यंत निरुह व अनुवासन हे दोन्ही बस्ती प्रकार दिले जातात व याचा निर्णय वैद्याद्वारे केला जातो.
बस्तीकर्माचा क्रम पूर्वकर्म – यामध्ये कोमट तेलाने कंबर, मांड्या, ओटीपोट या ठिकाणी हलके मर्दन करून शोक दिला जातो.
प्रधानकर्म – रुग्णास डाव्या कुशीवर झोपवून डावा पाय सरळ व उजवा पाय गुडघ्यात दुमडून पोटाशी घेण्यात येतो. बस्ती यंत्राच्या पुढील भागाला व गुदभागी तेल लावून बस्तीयंत्र हळूहळू गुदामध्ये प्रवेशित करून बस्तीद्रव्य शरीरात हळूहळू सोडले जाते.
पश्चातकर्म – रुग्णास पाठीवर झोपवून गरम पाण्याच्या पिशवीने कंबर मांड्या, ओटीपोट यांना शेक दिला जातो. रुग्णास आहार विहाराच्या सूचना देऊन घरी पाठविले जाते. बस्तीद्रव्य हे कमीतकमी अर्धा तास शरीरात राहणे आवश्यक आहे तरच त्याचे. उद्दिष्ट साध्य होते. जर का बस्ती द्रव्य लगेच बाहेर आले तर काही वेळ थांबून पुन्हा बस्ती द्यावा. काही रुग्णांमध्ये बस्ती द्रव्य २४ ताससुद्धा शरीरामध्ये राहिलेली आढळू येतात. बस्ती कमांमुळे सर्व शरीर शुद्ध होते.
परिणामी आरोग्य वाढते, शरीर बलवान होते. वर्ण सुधारतो व आयुष्य वाढते. हा उपचार निष्णात वैद्याच्या देखरेखीखाली करणे आवश्यक आहे.
– मनीषा नि. कोंडस्कर
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply