नवीन लेखन...

बायको माहेरी जाणे – एक दुःखद (सुखद) प्रसंग

प्रत्येक विवाहित पुरुषाच्या आयुष्यात बायको माहेरी जाणे असे आनंदाचे प्रसंग येतात. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी असा प्रसंग आला आणि तिला एकट्यालाच माहेरी जाणे आवश्यक असेल तर तशी (खुश) खबर बायकोच तुमचा मूड बघून अतिशय लाडीकपणे सांगते. काही वेळेस तुम्हाला देखील सोबत येण्याचे आग्रही निमंत्रण असते. तुम्हाला ऑफिसच्या कामातून सुटी मिळणे अशक्य असेल तर सूट मिळू शकते.  पण अशा वेळेस तुमच्या कौशल्याचा कस लागू शकतो. म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला बायको माहेरी जाणार असल्याची खुशखबर देते तेव्हा ती आपल्यासाठी खुशखबर अजिबात नाही असे भाव तुमच्या चेहऱ्यावर आले पाहिजेत. शक्यतो तीने जाऊ नये असे आग्रहाने सांगून पाहावे म्हणजे तिच्या जाण्याने तुम्हाला आनंद झालेला नाही असे दाखवायचे असते. तुमचा हा आग्रह फार ताणलात तर खरेच ती तिचे जाणे रद्द करू शकते. म्हणून तर म्हणतोय फार सावध वागावे लागते अशा वेळेस. म्हणजे तिने जाणे रद्द केले नाही पाहिजे आणि तिच्या जाण्याने आपल्याला खूप त्रास होणार आहे ह्या दोन्ही प्रतिक्रिया अतिशय कौशल्यपूर्ण दाखविण्याचे कसब तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक असते.  ह्यानंतर तिच्या जाण्याच्या तयारीमध्ये आपण फार उत्साह दाखवू नये.

लग्नानंतर आपण गाफीलपणे आपले अनेक गुण अवगुण बायकोला सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा फालतू कार्यक्रम केलेला असल्यामुळे तुम्ही फार वेंधळे आहात म्हणून तुम्हाला आता जाताना फार सूचना दिल्या जातात.  गॅस बंद करत जा.  लाईटचे ,पंख्याचे बटन बंद करत जा. आपण MSEB चे जावई नाहीत त्यामुळे आपल्याला पण लाईटचे बिल भरावे लागते. अशा शब्दात आपल्याला समज दिली जाते. दुधाची पिशवी आणायला जाताना दार वाऱ्याने लागून तुम्ही घराबाहेर आणि किल्ली  घरातच असले प्रकार होऊ शकतात अशी भयानक भीती मनात निर्माण करून देऊन तुमचा आत्मविश्वास पार रसातळाला जाऊन तुमच्या चेहऱ्यावर सर्वसाधारण गोंधळलेल्या नवऱ्याची अवस्था दिसून आली कि ती समजून घेते आता जायला हरकत नाही. तुम्ही पण खरंच तुम्ही खूप वेंधळेच आहात हे सोंग चालू ठेवणे आवश्यक असते.

बायको ज्या बसने / रेल्वेने जाणार असते त्या वेळेस तुम्ही वेळात वेळ काढून तिला पोहोंचवायला जायला पाहिजे. त्यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक तर तुम्हाला बायकोची किती काळजी आहे – प्रेम आहे हे दिसून येते. दुसरे म्हणजे ती निश्चित गेली असल्याची तुम्हाला खात्री झाल्यामुळे त्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या सगळ्या चांडाळ मित्र मंडळींना घरी जमवून पत्ते कुटणे, पार्टी करणे हे जे नियोजन बायको माहेरी जाण्याची खबर मिळाल्यापासून करून ठेवलेले असते ते पार पडू शकते. आमच्या एका मित्राने हि सावधानता घेतली नव्हती आणि आमचा कार्यक्रम रंगात आल्यावर त्याची बायको फ्लाईट खराब हवामानामुळे रद्द झाल्याने परत आली आणि नंतर आमचे सगळ्यांचे हवामान पुढे काही आठवडे खराब झाले.

आपली बायको माहेरी गेल्यामुळे आजची संध्याकाळ आपल्या घरी हक्काने जमा होणाऱ्या मित्रांसाठी असते. आपण पण त्यांच्या बायका माहेरी गेल्यावर ह्या सुविधा उपभोगलेल्या असल्यामुळे आपण हि परतफेड करायचीच असते.

आपल्या आजूबाजूच्या शेजारणी आपल्या बायकोच्या गुप्तहेर मंडळाच्या सदस्य असल्यामुळे त्यांची तुमच्यावर बारीक नजर असणार ह्याची आपणास कल्पना असायला पाहिजे. आपले बुद्धिबळातले चातुर्य वापरून   त्यांचा डाव हाणून पाडला  पाहिजे. त्यासाठी त्यांच्या नवऱ्यांना फितूर करून घेणे इष्ट. त्यांना पण निमंत्रण देऊन ठेवणे. आपल्या घरी पुरुषांची अंगत – पंगत आहे असे सांगून ते आपल्या घरून भाजी पोळी घेऊन येतात. घरचे खायला मिळते आणि खर्चही वाचतो. पंकज उधासची गझल लावून वातावरण निर्मिती करण्यात आलेली असते. चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तुही धनवान है गोरी बाकि सब कंगाल. रात्री तुमची पार्टी रंगात आली कि तुमच्या लँड लाईनवर फोन येतो. कोणत्याही परिस्थितीत तो फोन तुम्हीच उचलायला पाहिजे तो सुद्धा शक्यतो तितक्या लवकर. तो तुम्ही घरी आहेत कि नाही हे चेक करायसाठी केलेला असतो. अन्यथा मोबाईलवर WhatsApp कॉल फुकट असतात म्हणून सगळे कॉल्स WhatsApp वर करणारी बायको आज लँड लाईनवर का फोन करते हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आपला फोन चालू असताना सगळ्या मित्रांनी एकदम चुडिचूप बसायचे असते हे सगळ्यांनाच तत्सम अनुभव असल्यामुळे पाळल्या जाते.

दुसऱ्या दिवशी सकाळी तम्ही टॉयलेटला गेलात कि फोनची घंटी वाजते. तम्ही गोंधळून जाता. हाती घेतेले महत्वाचे काम अर्धवट सोडून उठावे कि काय करावे. फोन वाजून वाजून बंद होतो. तुम्ही हाय म्हणताय तोवर पुन्हा वाजायला लागतो. तुम्ही धडपडत जाता तो पर्यंत बंद होतो. हा फोन तुम्ही बाथरूममध्ये गेलात कि दबा धरून बसल्यासारखा नेमका पुन्हा त्याच वेळी वाजतो. जसा काय तुम्ही अंघोळीला जाण्याची वाट पाहत बसलेला असतो. पुन्हा धडपडत कस बस टॉवेल अंगावर गुंडाळत ओल्या अंगाने आपण जातो तोपर्यन्त त्याची वाट पाहायची तयारी नसते.

दूध गॅसवर ठेवले आणि आपण बायकोच्या सूचनेनुसार सगळे लक्ष दूध उतू जाऊ नये म्हणून  एकटक दुधाकडे पाहत असतानाच दाराची बेल वाजते. तुमचे लक्ष विचलित होते. तुम्ही दाराकडे जाऊन आलॊ आलो थोडे थांबा म्हणून सांगून परत येई तोवर दुधाला दम निघालेला नसतो. ते बरोबर त्याच क्षणाची वाट पाहत असल्यासारखे उतू येऊन तुमच्याकडे फिदीफिदी हसून पाहत वात्रटासारखं भांड्यातून बाहेर येऊन गॅस विझवून टाकत. शेगडी आनंदाने दुग्ध प्राशन करून टाकते. आपण जीवाच्या आकांताने पुढील अनर्थ टाळावा म्हणून गॅस बंद करतो. दूध नाही. शेगडी साफ करावी लागणार. आता चहाची वाट लागली हे गृहीत धरून दार उघडतो तो. शेजारी थर्मासमध्ये गरम चहा घेऊन आलेला असतो. रात्री झालेल्या ओल्या पार्टीमुळे वृद्धिंगत झालेले प्रेम सकाळच्या चहाची वेळ भागवते.

रोज सकाळी एका शेगडीवर दूध तापवून दुसऱ्या शेगडीवर चहा करणे असले दोन्ही काम अगदी सफाईने करणाऱ्या बायकोची आठवण यायला  लागते. आपण ऑफिसमधून फोन केल्यावर फोन घ्यायला उशीर झाला तर डाफरणारे आता जाणवते ती पण त्यावेळी बाथरूम मध्ये असू शकते ना.  टीव्हीवर मनोजकुमार मुकेशच्या आवाजात साधना साठी दर्दभरे गाणे म्हणत असतो. तुम बिन जीवन कैसे बीता पूछो मेरे दिलसे हाये—– पूछो मेरे दिलसे. आपला हात फोनकडे जातो आणि बायकोला फोन लावल्या जातो. दोन दिवसासाठी माहेरी गेलेल्या बायकोला आपण फोन लावतो. तिकडून मेहुणी मिस्कील हसत फोन उचलते. काय भाऊजी ताई आताच येऊन टेकली तर लगेच फोन का. राहावत नाही का एक दिवस पण ताई शिवाय.  बायको तिच्या हातातला फोन हिसकावून घेऊन विचारते. दूध तापवून फ्रिजमध्ये ठेवले का. आपण शांत असल्याचे ऐकून म्हणते गेले ना उतू. तिला CCTV कॅमेऱ्यात दिसते जणू. आपण सांगतो तुझी खूप आठवण येत आहे. आपला रडवेला आवाज ऐकून ती म्हणते. घ्या  ऑफिसला सुटी आणि या. मला परत यायला सोबत होईल.

असो. खरे म्हणजे आपले बायकोवर जीवापाड प्रेम असते. पण लग्न झाल्यावर ती आपल्यावर जी सत्ता गाजवते त्यातून एखाद दोन दिवस सावंतन्त्र्याचे मिळाले तर प्रेम रिफ्रेश होऊ शकते. आपल्याला जाणवते तिच्या सत्तेतच आपले प्रेम दडले आहे.

— एस व्ही देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..