नवीन लेखन...

विचारी बना

फोनमधे वेगाने बदल घडत गेले. आज स्मार्टफोन हे सामान्याच्या हातातले उपकरण बनले आहे. फोनचा फोनव्यतिरिक्त काय काय व कसा वापर करता येऊ शकतो याला आता कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. अशा सेवा पुरविणार्‍यांकडून वापरकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जाऊ लागल्या. स्पर्धा जीवघेणी बनत गेली. विश्वाला गवसणी घालण्याचे बळ आपल्या मुठीत आहे याचा प्रत्यय वापरणार्‍याला येऊ लागला. आपणच आपली प्रतिमा निर्माण करत स्वतःभोवती विश्व उभारले जाऊ लागले. मायाजाल पसरू लागले. यावर विश्वास ठेवणारे वाढत चालले. हा प्रवास काहीं साधासुधा नव्हता. प्रचंड वेगाने आपल्याबरोबर आपले पाठीराखे यानाही फरफटत नेणारा तो एक प्रवाह बनला. सत्याचे प्रतिबिंब आरशात पडेनासे झाले, इतके हे वापरकर्ते ‘आभासी’ जगात गुरफटून गेले. ‘काय भुललासी वरलिया रंगा’ म्हणणणारे संत द्रष्टे होते हे सिद्ध झाले. या सगळ्यात संधिसाधूंचे पेव न फुटते तरच नवल. आर्थिक आमिष, आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्न हे सापळे एकटं पडणारांचे बळी घेऊ लागले. एकटं पडण्याचे प्रमाण आधीच वाढीला  लागले होते.

रोजच्या संबंधातील पालक व कुटुंबीय दूरचे वाटू लागले. आधुनिक साधनांच्या मदतीने स्वतःविषयीचे निर्णय स्वतः घेण्याकडे कल  वाढला. काही बाबतीत हे स्वावलांबित्व चांगलेच होते. आपले खरे हितचिंतक आपल्या जवळपास आहेत व महत्वाच्या बाबतीत त्यांचा सल्ला आवश्यक आहे हे पटेनासे झाले. जीवनाची वाटचाल वास्तववादी ध्येयाअभावी भरकटू लागली. मेंदूचा वापर अत्यल्प होऊ लागला. विचारशक्ती क्षीण झाली. नीती-नियमांचे जोखड नको वाटू लागले. एवढी गॅजेट्स असताना कशाला वापरु डोके? असे प्रश्न पडू लागले. आणि एक दिवस एका आघाडीवर अपयशाने गाठले. आपला पत्ता कट झाल्याचे कळले. आत्मविश्वासाचा फुगा फुटला. आधारासाठी हात चाचपडू लागले. आभासी दुनिया कामाची नाही हे पटले. जवळची, रक्ताचं नातं असणारी माणसं काय सांगत आहेत हे समजून घेण्यास कष्ट पडू लागले. कारण, या खर्‍या भावनिक पातळीवर संवाद यापूर्वी घाडलाच नव्हता.

आयुष्य हा प्रवास आहे. बाल्य, तारुण्य व वार्धक्य या अवस्था आहेत. या अवस्थातून जात असताना काळानुरूप होणारे बदल अनुभवत पुढे जायचे असते. काल, आज व उद्या यात गल्लत करायची नसते. ‘आपल्याला खरी सोबत फक्त आपल्या कुटुंबियांची आहे’ या भक्कम पायावर जर आपली विश्वासाची इमारत उभी असेल, तर तुम्हाला या दुनियेत पराभूत करणारा कोणी असणार नाही. आभासी जग ओळखायला शिका. नुसते मित्र व पाठीराखे यांच्या संख्येला भूलू नका. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पारंपरिक विचारपद्धतीत सुधारणा करण्याचा तुम्हाला हक्क आहे. पण विचारधारेला तिलांजली देऊन मेंदूला मठ्ठ होऊ देऊ नका. मानवाची निर्मिती उत्क्रांती प्रक्रियेत होमो सेपीयन्स पासून झाली. उपयोगी न पडणारे अवयव कालौघात नाहीसे झाले. मेंदूला या मार्गाने जाऊ न देणे आपल्या हिताचे आहे. तार्किक डावा मेंदू व भावनिक उजवा मेंदू यांची आपल्याला सारखीच गरज आहे. मेंदूतील एक एक भाग जर वापराविना राहू लागला तर आपण आपली ‘मानव’ ही ओळख घालवुन बसू. हे स्थित्यंतर काही वर्षात होणार नाही. यासाठी पिढ्या आणि सहस्त्रक जावी लागतील. पण या सर्वाला आपण जबाबदार असु हे नक्की. तेव्हा तंत्र व साधनं याआधी आपण स्मार्ट बनूया.

शहरं स्मार्ट असून उपयोग नाही, तर शहरवासी स्मार्ट असावे लागतात. रस्ते व वाह्न स्मार्ट असली तरी ते वापरणारेही स्मार्ट असले पाहिजेत. तसच आहे गॅजेट्सचं. फोन स्मार्ट नसतो, तर तो वापरणारा स्मार्ट असावा लागतो. विचार प्रगल्भ करा. आपली गरज आहे वैचारिक श्रीमंतीची. तेव्हा ‘विचारी बना’ हा आपल्या सर्वांसाठी मंत्र आहे.

— रविंद्रनाथ गांगल 

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 36 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

1 Comment on विचारी बना

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..