नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – २५ – उमाबाई कुंदापुर

कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, शेवटच्या श्वासापर्यंत सतत काम करत राहणे, हा वसा सोप्पा नाही. “Selfless service” ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उमाबाई कुंदापुर.

१८९२ साली मंगलोर येथे गोलिकेरी परिवारात उमाबाईंचा जन्म झाला. स्त्रीसाठी पोषक नसलेल्या काळात त्यांच्या जन्म झाला खरा, पण त्यांनी जी कामगिरी केली त्यातून ही परिस्थिती कुठेच दिसत नाही, उलटपक्षी परिस्थिती तुमच्या ध्येयाच्या, तुमच्या कामाच्या आड येत नाही हेच त्यांचा जीवनपट उलगडून पाहतांना जाणवते.

काही समजायच्या वयात यायच्या आत म्हणजे अगदी १३व्या वर्षी त्यांचा विवाह संजीवराव कुंदापुर ह्यांच्याशी झाला. आनंदराव कुंदापुर, उमाबाईंचे सासरे प्रवाहा विरुद्ध विचार करणारे होते, त्यांनी उमाबाईंचे शिक्षण १०वी पर्यंत पूर्ण केले. इथून उमबाईंच्या सामाजिक जीवनाला सुरवात झाली. आपल्याच सारखे इतर महिलांना सुद्धा शिक्षणाचा आनंद देण्याचे काम त्या आपल्या सासरांच्या हाताखाली करू लागल्या. १९२० साली स्वातंत्र्य चळवळीचा सूर्य मावळला, लोकमान्य टिळकांना देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा उमबाईंच्या बालमनावर खोलवर स्पर्श करून गेली. इतका मोठा जनसमुदाय आणि त्यांना सांभाळायला अगदी बोटावर मोजण्या इतके पोलीस कर्मचारी. त्याकाळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्या सारखे होते. उमाबाईंना मार्ग सापडला. त्या काँग्रेस कार्यकर्त्या झाल्या. खादीचा प्रचार-प्रसार, स्वदेशी बाबत जनजागृती, महिलावर्गामध्ये स्वातंत्र्य चळवळी बद्दलची जागरूकता निर्माण करणे ह्यासाठी त्या दारोदारी फिरू लागल्या. कामाला सुरुवात झाली आणि दैवाचा पहिला फटका बसला, वयाच्या २५ व्या वर्षी त्यांना वैधव्य आलं, संजीवराव कुंदापुर ह्यांचे देहावसान झाले. त्यांचे सासरे त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले, त्यांनी मुबई सोडले आणि हुबळीत आले. तिथे आनंद रावांनी प्रेस सुरू केली तर त्याच्या आवारात ‘टिळक कन्या शाळा’ सुरू करून उमाबाई त्याच्या सर्वेसर्वा झाल्या.

हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना १९२१ साली झाली, टिळकांच्या मृत्यू नंतर देशातील युवकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी तयार करणे हा उद्देश ठेवून. हुबळी ह्या संग्रामचे केंद्र बनले. उमाबाई महिला सेवा दलाच्या प्रमुख झाल्या. व्यवस्थापनाचे धडे उमाबाईंनी काम करता करता घेतले. बेळगाव ला काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन १९२४ साली ठरले. गांधीजी त्यासाठी येणार होते. व्यवस्था चोख लागणार होती. उमाबाईंनी पूर्ण क्षेत्र पालथे घातले, १५० महिला कार्यकर्त्या तयार केल्या. १९३२ साली उमाबाईंनी अटक झाली, ४ महिन्याचा सश्रम कारावास. तिथे दैवाचा दुसरा झटका बसला. त्यांचे पितृतुल्य सासरे गेले. तुरुंगवासातुन बाहेर आल्यावर त्यांना कळलं की त्यांच्या प्रेस ला जप्त आणि शाळेला टाळा लावण्यात आला आहे. त्यांनीच तयार केलेली ‘भगिनी मंडळ’ ला बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. उमाबाई हरल्या नाहीत. त्यांची देशसेवा सुरूच राहिली. आता त्यांचं छोटंसं घर अनेक क्रांतीकारकांचे लपण्याचे ठिकाण झाले. कर भरणा नाही आणि मिठाचा सत्याग्रह संपूर्ण भारतभर सुरू होते. इंग्रजांची धरपकड मोहिमसुद्धा. वाटेल तसे क्रांतिकारी पुरुष आणि महिलांना पकडले जात आणि मग त्यांना सोडले की त्यांच्या घरावर पाळत असे, ती टाळण्यासाठी अश्या सगळ्या क्रांतीकारकांचे ठिकाण म्हणजे उमाबाईंचे घर. उमाबाईंनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि पुढच्या कामासाठी लागणारे धन सुद्धा पुरवले.

बिहार मधील भूकंप ग्रस्त क्षेत्र असो किव्हा चले जाव आंदोलनाचे क्रांतिकारी, उमाबाईचे घर सगळ्यांसाठी हक्काचा निवारा होता, त्याचे हात हक्काची मदत करणारे होते. १९४६ साली गांधीजींनी त्यांना कस्तुरबा ट्रस्ट च्या कर्नाटक शाखेचे प्रमुख म्हणून नेमले. ग्राम सेविकांचे प्रशिक्षण, गावातील वस्त्यांचे उत्थान अशी सगळी कामे त्यांनी पार पाडली. सरकार कडून कुठल्याच प्रकारची मदत नसतांना त्यांनी अगदी दारोदार हिंडून निधी गोळा केला आणि काम मोठे केले.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, उमदेवींना राजकारणात उडी घेऊन मोठ्या हुद्यावर काम करता आले असते, पण त्यांनी ‘कार्यकर्ता’ म्हणून जीवन जगणे पसंद केले. त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून मिळणारी पेन्शन नाकारली, त्याच बरोबर ताम्र-पत्र पुरस्कार सुद्धा नाकारला. ‘आनंद – स्मृती’ ह्या त्यांच्या पितृतुल्य सासऱ्यांच्या स्मृतीत बांधलेल्या छोट्याश्या झोपडीवजा घरात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य काढले आणि १९९२ साली ह्या जगाचा निरोप घेतला.

‘मोही फसता मुकशील वीरा, मुक्तीच्या मार्गा’ हेच बहुतेक त्यांचे जीवनाचे ब्रीद असावे, अश्या मुक्त तेजस्वी शलकेला माझे शब्दसुमन अर्पण करते.

|| वंदे मातरम् ||

— सोनाली तेलंग.

२८/०६/२०२२.

संदर्भ :

१. kamat.com

२. inuth.com

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..