नवीन लेखन...

भाऊबीजेचा डब्बा

आगरीकोळी समाजात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत ही परंपरा आहे. आताच्या जमान्यात भाऊ बहिणीला हिस्सा द्यायला मागत नाहीत आणि बहिणी पण सोडायला मागत नाहीत.

पण काही बहिणींची माया अशी आहे की त्या अजूनही काय दिलं किंवा काय मिळणार असं मनात येऊ न देता लाडक्या भावाची माहेरी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात.

ताईच्या मुलाचे लग्न झाल्यावर पहिलीच दिवाळी होती. बाळा मामा आणि सुनेचा भाऊ भाऊबीजेला येणार म्हणून आज चुलीवर मटण शिजवायला घेतलं होतं. गावठी कोंबडा पण कापून आणल्यावर त्याला तोडण्यापूर्वी चुलीवरच्या निखाऱ्यांवर भाजून घेतला होता, मटण झाल्यावर कोंबडा पण चुलीवरच शिजवायचा बेत होता. सुनेने न राहवून विचारले की आई आज सगळं जेवण चुलीवरच का करताय, नाही म्हणजे चुलीवरच्या जेवणाची चव जाम भारीच असते पण आज एवढी घाई गडबड आणि सणाचा दिवस असताना चुली जवळ किचन मधून सगळं आणायचं शिजल्यावर परत न्यायचं एवढा सगळा व्याप का करताय. त्यावर आईऐवजी मुलानेच उत्तर दिलं, तो म्हणाला मला आठवत तेव्हापासूनच काय पण जशी आज तुझी दिवाळी आहे तशीच जेव्हा आईची पहिली दिवाळी होती तेव्हापासून आपल्याकडे भाऊबीजेला असं चुलीवरच जेवण बनवलं जातंय. तेव्हा तीस वर्षांपूर्वी आपल्या घरात गॅस असूनसुद्धा आजीने आईला सांगितलं की तुझा भाऊ येणार आहे त्याच्यासाठी चुलीवरचेच जेवण बनवायचे.

आईकडे बघून मुलाने विचारले, काय मग आई आज तरी बाळा मामा येईल का?? मुलाकडे न बघताच आईने सांगितले तो नाही आला तरी त्याची गाडी तरी येईलच.

ताईचे लग्न झाल्यापासून तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला बाळा दरवर्षी तिला माहेरी न्यायला येत असे. पहिली पाच वर्ष सकाळी पहिल्या बसने निघून ताईच्या घरी नऊ वाजेपर्यंत हजर. त्यानंतर चार वर्ष मोटर सायकल आणि त्यानंतर फोर व्हीलर घेऊन यायचा. गेल्यावर्षी तर लक्ष्मीपूजनाला कोणालाही कळू न देता नवीन फॉर्च्युनर घेतली पण स्वतः सह घरातल्या इतर कोणालाही बसू दिले नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ताईच्या दारात फॉर्च्युनर घेऊन हजर. घरात जाण्यापूर्वी ताईला गाडीत बसवून गावाभोवती राउंड मारला आणि मगच घरात गेला. मागील तीस वर्ष बाळा ताईकडे तिला न्यायला यायचा. पाटाखाली व पाटाच्या सभोवताली रांगोळी काढून झाल्यावर ताई त्याला डोळेभरून ओवाळायची. ओवाळून झाल्यावर भाकरी आणि चुलीवरच्या मटणावर मनसोक्त ताव मारून झाल्यावर बाळा ताईच्या सासूला म्हणायचा आई आता जेवून पोट भरलंय पण मन काही भरलं नाही, मला संध्यकाळसाठी मटणाचा डबा भरून द्या. ताईची सासू ताईला बोलायची पोरी मी आहे तोपर्यंतच नाही मी गेल्यावर पण या बाळाला इथून मटणाचा डबा भरून नेत जा. ताईचं लग्न ठरल्यापासून बाळा कावरा बावरा झाला होता. ताईचं लग्न होईपर्यंत सगळ्या पै पाहुण्यांची सोय करून दोन दिवस आता जेवेन नंतर जेवेन करून उपाशी राहिला होता. लहानपणापासून ताईने लावलेली माया त्याला चैन पडू देत नव्हती. ती सासरी जायला निघाल्यावर लहान मुलासारखा हमसून हमसून रडला होता. लहान भावाच्या या आठवणींनी ताईच्या डोळ्यात पाणी आले.

दोन वर्षांपूर्वी बाळाने ग्रामपंचायतची निवडणूक लढवली आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून तो निवडुन आला. तेव्हापासून बाळाचे दिवस बदलले घरची परिस्थिती अगोदर पासून चांगलीच होती, वडिलोपार्जित घर आणि भरपूर शेती. ग्रामपंचायत सदस्य झाल्यापासून तर जमिनींचे व्यवहार आणि गावांत होणाऱ्या बांधकाम साईटवर सप्लायर म्हणून अधिकृत हक्क. गरजेपेक्षा जास्त पैसा मिळू लागला जेव्हा गरजेपेक्षा जास्त पैसा मिळायला लागल्यावर बाळाची हाव पण वाढायला लागली. गावात जमिनींचे भाव असे वाढायला लागले की चार वर्षांपूर्वी जेवढा एकरी भाव होता तेवढा आता गुंठ्याला मिळायला लागला होता. ग्रामपंचायतीत कंत्राटं आणि जमिनीच्या सौदेबाजीत होणारी कोटीच्या कोटी उड्डाणं बाळाला दिसायला लागली होती.

गेल्यावर्षी दिवाळीत फॉर्च्युनर घेतल्यावर गावातल्या दलालांनी बाळाला त्याच्या वडिलोपार्जित जमिनी बद्दल हटकले. आठ एकर जमीन, गुंठ्याला एवढा भाव एकरचा एवढा भाव सगळ्या जमिनीचा एवढा भाव एवढे करोड आणि तेव्हढे करोड. एका दलालाने सरळ मुद्दयालाच हात घातला बाळा पण यात तुझ्या ताईचा अर्धा हिस्सा. सातबाऱ्यावर दोघांचीच नावं. बाळाला त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचे काही वाटले नाही. पण दलालांनी बाळाच्या विशीत आलेल्या पोराच्या डोक्यात सातबारा आणि जागेचा भाव उतरवला, पोराने ताबडतोब त्याच्या आईच्या डोक्यात उतरवला. एका दिवशी बाळाच्या डोक्यात बायको आणि पोराने आत्याच्या हिश्श्याबद्दल विषय काढलाच आणि काय तो एकदाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी कटकट सुरु केली. ताईंच भरपूर आहे त्यांना काही कमी नाही तुम्ही बोलून तर बघा, बाळाची ताईकडे विषय काढायची हिम्मत होतं नव्हती. एका दिवशी बाळाच्या पोराने बाप काही विषयाला हात घालत नाही म्हणून स्वतःच आत्याच्या मुलाला फोन केला आणि त्याला सांगितले आत्याला आमच्या प्रॉपर्टी वरून नाव कमी करायला पाठव. ताईच्या मुलाने त्याला लगेच प्रतिप्रश्न केला तुमची कुठली प्रॉपर्टी, आजोबांची प्रॉपर्टी बाळा मामा आणि आई दोघांची आहे, त्यांचे ते ठरवतील, बाळा मामा बोलेल त्याला काय बोलायचे ते, तू कशाला बहीण भावांच्या मध्ये बोलतोस.

ताई आणि बाळा दोघांनाही पोरांनी त्यांच्यात झालेले बोलणे सांगितले. तेव्हापासून ताई आणि बाळा एकमेकांशी फोनवर सुद्धा बोलले नाहीत की एकमेकांची विचारपूस नाही.

जसजसे नऊ वाजायला आले तसतसं ताईच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. मुलाने विचारलेले, काय मग आई आजतरी बाळा मामा येईल का? या प्रश्नाला बाळाने येऊन चोख प्रतिउत्तर द्यावे असं ताईला मनोमन वाटत होतं. बरोबर नऊ वाजता तिला फॉर्च्युनरचा हॉर्न ऐकू येऊ लागला, डोळ्यात जीव आणून ती गाडीकडे बघू लागली. गाडी जवळ येताच तिला धक्का बसला, गाडीत बाळा नव्हता त्याच्याऐवजी तिचा चुलत भाऊ आला होता. ताईने त्याला ओवाळले, त्याला ओवाळताना तिला बाळाच्या आठवणीने अश्रू अनावर झाले होते पण बाळा का नाही आला हे तिने त्याला शब्दानेही विचारले नाही. त्याला बाळाला जशी पाटाभोवती रांगोळी काढायची तशीच रांगोळी घातली आणि भरल्या डोळ्यांनी जेवू घातले. चुलत भावाने तिला सोबत निघण्यासाठी आग्रह केला. तिने त्याच्याकडे बाळासाठी मटणाने भरलेला डबा दिला आणि सोबत दोन पाकीटं दिली. एका पाकिटावर लिहिलं होतं, दुसरं पाकीट फोडल्यावरच हे पाकीट फोड.

बाळाला गाडीत ताई दिसली नाही पण ताईनं दिलेला मटणाचा डबा पाहिला. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याने पहिलं पाकीट उघडलं,
स्टॅम्प पेपर वर लिहिलं होतं,

मी खाली सही करणार सौ. ताई रामचंद्र पाटील, वय 54 वर्षे, पत्ता……… स्वखुशीने आणि कोणच्याही दबावाखाली न येता पूर्णपणे शुद्धीत असताना लिहून देते की माझे वडिलोपार्जित जमीन तसेच आजही माझे वडिलांच्या नावे असलेल्या घर यापैकी माझा हक्क मी आजपासून सोडत आहे. माझे व माझ्या भावाच्या नावे असलेल्या सामायिक जमिनीवरून माझे नाव कमी करून माझा भाऊ बाळा पांडुरंग पाटील याचे नावे माझा हिस्सा करण्यास माझी कोणतीही हरकत नाही.

सही
ताई रामचंद्र पाटील.

साक्षीदार
सही
रामचंद्र कान्हा पाटील.

स्टॅम्प पेपर वरील मजकूर वाचून बाळाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.

त्याने दुसरं पाकीटं घाई घाईने उघडलं आणि वाचायला सुरवात केली,

बाळा मला माहिती आहे तुझ्या मुलाने फोन केल्याने तुझ्या जीवाची झालेली घालमेल आणि त्यातून तुझ्यात आलेले नैराश्य. तू आता सदस्य आहेस गावाचा कारभार संभाळतोस त्यामुळे ह्या स्टँम्प पेपर ला नोटरी करण्यापेक्षा रजिस्ट्रार ऑफिस मध्ये दस्त नोंदणी कर म्हणजे मीच काय तुझा भाचा पण भविष्यात त्याला चॅलेंज करणार नाही. आता निमूटपणे डोळे पुसून दिलेला डबा खाऊन घे आणि लगेच हात धुवून मला न्यायला ये. मी तुझी वाट बघते आहे मानाने माहेरी यायला.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B. E. (Mech) DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..