आमचे वडील १९८३ साली निवृत्त झाले आणि ८७ पासून गावी रहायला गेले. त्यावेळी गावी करमणुकीचे काहीच साधन नव्हते. दहा वर्षांनंतर एक ब्लॅक ॲण्ड व्हाईट टीव्ही त्यांना गावी नेऊन दिला. मग रोजच्या बातम्या, मुंबई व दिल्लीचे कार्यक्रम ते आणि शेजारचे नातेवाईक बसून बघू लागले. २००० नंतर कलर टीव्ही सगळीकडे दिसू लागले. वडिलांनीही मला कलर टीव्ही आणायला सांगितले.
एका रविवारी मी दहाच्या सुमारास गावी जाण्यासाठी घरुन निघालो. बालाजीनगरमधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जाऊन पोर्टेबल कलर टीव्ही खरेदी केला. माझ्या अंदाजापेक्षा त्या टीव्हीची किंमत जास्त द्यावी लागल्याने माझ्या खिशात जेमतेम प्रवासापुरतेच पैसे उरले होते. मी तो बाॅक्स घेऊन रोडवर आलो.
बालाजीनगरच्या थांब्यावर मी एका पुणे-कराडच्या एस.टी. ला हात केला. ड्रायव्हरने गाडी कडेला घेतली. मी गाडीत चढल्यावर पाहिले तर गाडी फुल्ल भरलेली होती. ड्रायव्हरच्या मागील सीटवर एक लहान मुलगा व माणूस बसलेला होता, त्याने सरकून मला बसायला जागा दिली. एव्हाना गाडीने कात्रज सोडले होते.
कंडक्टर पाठीमागून एकेकाची तिकीटं काढत माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. टीव्हीचा बाॅक्स मी पायाशी ठेवला होता. मी त्याला नागठाणेचे तिकीट मागितले. त्याने सत्तर रुपये घेऊन तिकीट दिले व विचारले, ‘हा बाॅक्स कुणाचा आहे?’ मी, माझा आहे सांगितल्यावर त्याने त्याचे लगेजचे पस्तीस रुपये मागितले. मी त्याला विनंती करुन सांगितले की, ‘मला इतके पैसे लागतील याची कल्पना नव्हती. तुम्ही मला सवलत द्या.’ तो ऐकायला तयार नव्हता. मी माझ्याकडील पैसे चाचपले. फक्त वीसच रुपये शिल्लक होते. मी एस.टी. मध्ये कोणी ओळखीचं दिसतंय का, हे पाहू लागलो. आमच्या पुण्याईनगरमधील एक स्त्री मागे बसलेली दिसली. ती रोज शंकराच्या मंदिरात येते हे मी पाहिलेले होते. तरीदेखील ओळख नसताना तिला पैसे मागणं मला पटत नव्हतं.
एव्हाना कंडक्टरचा हिशोब करुन झाला होता. तो मला पुन्हा पैसे मागू लागला. माझी स्थिती शोचनीय झाली. गाडी आता कात्रजचा बोगदा पार करुन घाट उतरु लागली होती. कंडक्टरने आता शेवटचं अस्त्र काढलं. तो म्हणाला, ‘तुमच्याकडे पैसे नसतील तर मी गाडी थांबवतो, उतरुन घ्या.’ मी हवालदिल झालो.
इतका वेळ शेजारी बसलेला माणूस मला म्हणाला, ‘तुम्ही उतरु नका. मी पस्तीस रुपये देतो.’ मला देव पावल्यासारखं वाटलं. त्याने दिलेले पैसे मी कंडक्टरला देऊन तिकीट घेतले. कंडक्टरचा आत्मा शांत झाला. तो ड्रायव्हर शेजारच्या सीटवर जाऊन बसला. माझ्या आसपासचे प्रवासी एखाद्या प्राणी संग्रहालयातील प्राण्याकडे पहावे तसे माझ्याकडे पहात होते. त्यांची नजर मी समजू शकत होतो. त्यांच्या नजरेत असेच भाव होते की, किती मूर्ख माणूस आहे हा. प्रवासाला निघताना जादा पैसे याच्याजवळ असू नयेत?
मी शेजारच्या देवमाणसाचे आभार मानले. तो माणूस खेड्यातला होता. पुण्याहून कराडला निघाला होता. त्याचं मूळ गाव होतं, पुसेगाव. मी त्याला नाव विचारले व माझ्या खिशातील कागदावर लिहून ठेवले. त्याच्याकडे संपर्काचे दुसरे कोणतेही साधन नव्हते. मी पुसेगाव मधील पत्ता विचारल्यावर त्याने मंदिराच्या समोर कुणालाही विचारा असे सांगितले. मी पुन्हा त्या सद्गृहस्थाचे आभार मानले व उर्वरित प्रवास करु लागलो.
शिरवळला गाडी थांबली. मी नको म्हणत असताना त्याने मला चहासाठी कॅन्टीनमध्ये नेले. चहा घेऊन पुन्हा प्रवास सुरु झाला. मी बाॅक्सची काळजी घेत होतो. चुकून धक्का लागला तर टीव्हीच्या स्क्रिनला तडा जायचा. तीनच्या सुमारास गाडी नागठाणे येथे पोहोचली. मी माझ्या प्रवासीबंधूचा निरोप घेऊन बाॅक्ससह उतरलो.
बाॅक्स खांद्यावर घेऊन मी हाय वे ओलांडला व नागठाणे गावात प्रवेश केला. पुढे मला सोनापूर गावात जाणारी रिक्षा मिळविण्यासाठी एक किलोमीटर चालायचे होते. वाटेत एकदा विश्रांती घेऊन मी वडाच्या झाडाखालील रिक्षा स्टॅण्डवर पोहोचलो. नशिबाने सहा माणसांनी भरलेली पॅगो रिक्षा उभीच होती. मागच्या बाजूला मी बाॅक्ससह बसलो व रिक्षा सोनापूरच्या दिशेने पळू लागली…
त्या प्रवासात मदत करणाऱ्या त्या सद्गृसस्थाच्या नावाचा कागद माझ्याकडून प्रवासात गहाळ झाला. आता इतक्या वर्षांनंतर तो समोर आला तरी मी त्याला ओळखू शकेन की नाही याची शंका वाटते. अशा या बिनचेहऱ्याच्या माणसाचे मी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. त्या दिवशीच्या माझ्या अडचणीला तो मला माणुसकीच्या नात्याने उपयोगी पडला होता.
असाच एक प्रसंग मी ‘दै. सकाळ’ मधील ‘मुक्तपीठ’ सदरात वाचला होता….
दोघा टू व्हिलरयरील प्रवाशांना मोठ्या घाटातून प्रवास करताना वाटेत पेट्रोल संपल्याचे त्यांच्या लक्षात येते. ते घाट चढून आलेले होते. अजून सपाटीचा प्रवास केल्यावर मग घाटाचा उतार लागणार होता. त्या दोघांनी गाडी कडेला लावली व येणाऱ्या जाणाऱ्या वहानांना मदतीची याचना करु लागले. संध्याकाळ होऊ लागली होती. तेवढ्यात एका मोटर सायकलवरून जाणाऱ्या पठाणाने त्या दोघांना पाहिले. तो जवळ आला. दोघांची अडचण समजून घेतली. आपली गाडी त्याने स्टॅण्डला लावली व साईडच्या डिकीतून रिकामी बाटली काढून पेट्रोलचा काॅक चालू करुन बाटली भरली. ती बाटली त्या दोघांच्या हातात दिली. त्यांनी टाकीत पेट्रोल भरले व रिकामी बाटली आणि पैसे त्या पठाणाला देऊ लागले. पठाणाने बाटली घेतली मात्र पैसे घेण्यास नम्रपणे नकार दिला. त्या दोघांना काय बोलावे ते सुचेना. त्यावर पठाण हसून बोलला, ‘मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या गाडीतील पेट्रोल देऊन मदत केली हे खरे असले तरी त्याची किंमत असे मला पैसे देऊन करु नका. तो एक व्यवहार होईल. त्याऐवजी तुम्हाला असा कोणी पेट्रोलसाठी अडचणीत असलेला भेटला तर त्याला तुमच्या गाडीतील पेट्रोल देऊन मदत करा, त्यातच मला माझे पेट्रोल मिळाल्याचे समाधान मिळेल.’
या बिनचेहऱ्याच्या माणुसकी जपणाऱ्या पठाणाला मी कधीही विसरू शकत नाही. अशी दुसऱ्याच्या उपयोगी पडणारी वृत्ती अंगी असावी, माणसातील मानवधर्म जपावा. सगळ्या गोष्टी पैशाने मोजता येतातच, असं नाही…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-१०-२०.
Leave a Reply