‘प्रभात’ चित्रपटगृहाच्या जागेवर पूर्वी इंदूर येथील सरदार किबे यांचा वाडा होता. ‘ज्ञानप्रकाश’ दैनिकाचे कार्यालय आणि छापखाना होता. १९३४ मध्ये सरदार रामचंद्र किबे यांनी हे चित्रपटगृह उभारले आणि या वास्तूला ‘किबे लक्ष्मी थिएटर’असे मातोश्रींचे नाव दिले. कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झालेली प्रभात फिल्म कंपनी आणि त्यांचे वितरक ‘फेमस पिक्चर्स’ यांनी हे चित्रपटगृह चालवायला घेतले होते. ‘लव्ह मी टुनाईट’ या बोलपटाने २१ सप्टेंबर १९३४ रोजी चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. १७ ऑक्टोबर १९३४ रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर ‘अमृतमंथन’ हा पुण्यातील पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती. त्यानुसार तळमजल्याला दोन वर्ग आणि महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था होती. मुलांच्या रडण्याचा प्रेक्षकांना त्रास होऊ नये यासाठी महिलांच्या वर्गात दोन काचेच्या खोल्या (क्राय बॉक्स) करण्यात आल्या होत्या. ही सोय त्या काळी कुतूहलाचा आणि कौतुकाचा विषय झाली होती. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन वेळोवेळी बदल करण्यात आले होते.
आजतागायत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील १४०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. ३७ मराठी आणि ९ हिंदी चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला असून १९९१ मध्ये आलेल्या ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने सलग १२१ आठवड्यांचा विक्रम प्रस्थापित केला, जो आजही अबाधित आहे. काही वर्षा पूर्वी मालकी सरदार रामचंद्र किबे यांच्या कडे आली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply