एका पोस्ट मध्ये वाचले होते की जेष्ठ महिना. जेष्ठ वडवृक्ष आणि जेष्ठांचा आशीर्वाद. किती गहरा अर्थ आहे ना?
रखरखता रणरणत्या उन्हाळ्यात जीव कासावीस झाला होता. मन पण उद्विग्न. कधी एकदा पावसाची सर कधी येणार आणि सगळे कसे वातावरण बदलून जाईल याची ओढ असते. आणि हळूहळू नभ मेघानी दाटून आले की मग काय मनमोराचा पिसारा फुलून जातो. आणि जेष्ठ महिना वटवृक्षाचे पूजन बायकांची नटणे मुरडणे याची लगबग. उन्हात काम केल्यामुळे सत्यवान याला भोवळ आली होती आणि ते पाहून सावित्रीनी त्याला वडाखाली आणले आणि पुढील गोष्टी काय झाल्या होत्या हे सगळे तुम्ही जाणता. पण एक सत्य नाकारता येत नाही ती म्हणजे प्राणवायू देणारा. गारवा निर्माण करणारा हा आधार वडच असतो. इतर कोणत्याही वृक्षात हे गुणधर्म नाहीत…
जिथे जन्म झाला तिथे लहानपणापासून अंगणातील वृदांवनात छोटीशी तुळस बाई व घरातील माय बाई दोघींच्या मायेच्या कुशीत राहून अनेक संस्कार व शिकवण यांची कास धरून आणि हळुवारपणे माहेरचे बोट सोडून ती जाते सासरी. तुळशीचे अनेक गुणधर्म तिला माहित आहेत म्हणून ती तुळशीचा आदर्श समोर ठेवून वागत असते.आणि तिचा संसार सुरू होतो. मग कालांतराने ते दोघे आता घराचे आधारवड होतात. त्यांच्या कष्टाचे फळ मुलांना नातवंडांना मिळते. आणि आता फक्त त्यांना आशीर्वाद देण्याचे काम उरते. कोणत्याही संस्कृतीत वडिल धाऱ्या व्यक्तींना आदराने नम्रपणे नमस्कार करण्याची पद्धत आहे. पण आपल्या संस्कृतीत खाली वाकून पाया पडतात तेव्हा पायांना हात लावून. पायावर डोके टेकवून तर काही संत. सद्गुरू यांना साष्टांग दंडवत घालून आशीर्वाद घेतले जातात. आणि प्रसंगानुरूप आशीर्वाद दिला जातो. पण या आशीर्वादात खूप मोठी शक्ती असते. ते कवच असते. म्हणून आशीर्वाद घ्यायचे असतात. पण आता पद्धत बदलली आहे. ती कशी हे तुम्ही जाणता. श्री कृष्णाचा आशीर्वाद होता म्हणून पाच पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही आणि कौरव शंभर असूनही एकही वाचला नाही. तात्पर्य काय तर वडाचा आधार जसा सत्यवानाला मिळाला सावित्री मुळे आणि जीवदान मिळाले. म्हणून जेष्ठांचा जेष्ठ आशीर्वाद कायम राहू द्यावा. पण या साठी नम्रता. आदर. निष्ठा. वगैरे आपल्या मनात असणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. त्यामुळे तुळस. वटवृक्ष आणि आशीर्वाद हे कधीच विसरता कामा नये.
–सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply