भारताच्या इतिहासामध्ये अनेक शूरवीर राजे, सेनापति, स्वातंत्र सैनिक होऊन गेले ज्यांनी आपल्या शब्दाना खूप महत्व दिले. ‘जान जाए पर वचन न जाये’ ही त्यांच्या जीवनाची धारणा होती. राजा हरिश्चंद्र हयाना स्वप्नामध्ये दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी अनेक परिस्थितीना सामोरे जावे लागले. अश्या अनेक घटना आपण ऐकतो.
शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते. ‘लागते’ हा शब्द ह्या साठी वापरला आहे कारण त्यांनी स्वतःला तशी सवय लावून घेतली आहे किंवा काहीना दुसऱ्यांना उल्लू बनवण्या मध्ये खूप मजा येते. एखाद्याला वेड बनवण्याचा आनंद घेतला जातो. पण ह्या सर्व गोष्टी बरोबर आहेत का?
शालेय जीवनामध्ये खरे बोलावे, इमानदार राहावे.. अशी शिकवण दिली जायची. पण त्या सर्व बाबी पुस्तकांमध्ये बंद झाल्या आहेत. व्यावहारिक जीवनात फसवणूक, भ्रष्टाचार, दगाबाजी.. ह्यांचाच बोलबाला आहे. ह्या सर्वांचा परिणाम काय, ह्याचा कोणी विचार करत नाही. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची निवड करतो तेव्हा तो प्रामाणिक, विश्वासू, इमानदार असावा ही इच्छा असते, मग तो घरात काम करणारा नोकर असो, जीवनसाथी असो की ऑफिस मध्ये काम करणारे सोबती असो. जर एखाद्यावर खूप विश्वास ठेवला व त्याने आयुष्यात कधी विश्वास घात केला तर त्याच दुःख काही वेगळंच असते. म्हणून ज्याने आपण दुःखी होतो ते कर्म आपल्याकडून कोणाला न मिळावे ह्याची खबरदारी मात्र नेहमी घ्यावी.. कारण कधी कधी सहज रित्या आपल्याकडून ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दुसऱ्यांची फसवणूक होत राहते. काही कारणांमूळे आपण खोट बोलतो. नकळत आपण आपली व्यक्तिरेखा समोरच्याचा मनात चुकीची तयार करतो. आपल्याकडून जर कोणाला वाईट अनुभव आला तर तो पुढे कधी आयुष्यात आपल्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नाही करणार.
विश्वास हा शब्द खूप छोटा आहे पण ह्यामध्ये संबंधांचे गूढ लपले आहे. एखादी वस्तु तुटल्यावर आवाज होतो, पण विश्वास तुटला तर आवाज होत नाही. मात्र संबंध कायमचे तुटून जातात. म्हणून छोट्या छोट्या कामामध्ये आपण इमानदार राहण्याचा प्रयत्न करावा. जे करू शकतो तेच बोलण्याची सवय लावावी. जे करू शकत नाहीत त्याची आश्वासानं देण्याची चूक करू नये. कारण ह्या आश्वासनांनी मनुष्य भावनिक रित्या गुंतला जातो. आणि जिथे भावना तुटतात तिथे खूप त्रास होतो. आपल्यामुळे कोणाला दुःख मिळत असेल तर आपण कधी सुखाचा अनुभव करू शकत नाही. हा कर्मांचा नियम ध्यानात ठेवावा. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण तेच बोलावे जे आपण करू शकू.
कधी कधी आपली ही समज असते की ‘हे तर मी सहज बोलून गेलो किंवा असं तर सर्वच करतात त्यात काय चुकीच केलं’ असे विचार करून आपण स्वतःला त्या चुकांसाठी प्रोत्साहित करतो. पण अश्या साध्या साध्या गोष्टींनीच मोठ्या चुका होतात. जर आपण कोणाचा विश्वासघात केला तर आज ना उद्या आपल्याला सुद्धा विश्वासघात करणारा कोणीतरी मिळेल. त्यावेळी जाणीव होईल की भावनिक रित्या घायाळ झालेला व्यक्ति किती दुःखी होतो. म्हणून जग कसं वागतेय ह्या कडे लक्ष्य न देता मला कसे वागायचे आहे हे ठरवावे.
ह्या जगामध्ये खूप चांगल्या व्यक्ति होऊन गेल्या. कधी आपण त्यांच्या चांगुलपणाला कॉपी करण्याचा प्रयत्न करून पाहू या. जेव्हा आपण दिलेला शब्द पाळतो तेव्हा आपल्याला स्वतःला अभिमान वाटतो. कोणाची फसवणूक नाही केली ह्याचे समाधान मिळते. पण जेव्हा आपण कोणाच्या भावना बरोबर खेल करतो तेव्हा स्वतः ही भावनिक रित्या गोंधळलेले, अशांत, चिंतातुर होतो. हे स्वतःचे नुकसान आपण आजाणता करत असतो. कधी साक्षी होऊन स्वतःलाच बघावे की आपण व्यावहारिक क्षेत्रात कसे आहोत? कोणी माझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवेल अशी माझी goodwill मी बनवली आहे. जसे एखाद्या दुकानात जातो, मग ते कपड्याचे, भांड्यांचे, दागिन्यांचे असो जर त्यांचे बोलणे एक आणि करणे दुसरे असेल तर त्या दुकानात आपण दुसऱ्यांदा पाऊल ठेवू? नाही ना. तसेच कोणी माझ्या संपर्कात आले आणि त्यांना जर जबरदस्त फटका बसला तर दुसऱ्यांदा ते माझ्याशी संबंध ठेवतील?
आज पासून आपण आपल्या जीवनाची एक धारणा बनवूया की ‘ मी जे बोलेन तसे वागून दाखवेन ’ जे माझ्याकडून होणे शक्य नाही त्याला सरल शब्दा मध्ये सांगून समोरच्याला चुकीच्या अपेक्षापासून मुक्त करेन. ज्यामुळे त्यांचे संकल्प, शक्ति, वेळ वाया जाणार नाही. व मी ही मानसिक रित्या स्वतःला मुक्त ठेवू शकेन.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply