व्यवहार जगती चाले
सारे बोनसाय जाहले
रक्ताचे नाते ओलसर
आज पार गोठुनी गेले
अंतरीचे वात्सल्यप्रेमही
आज पहा निष्ठुर जाहले
प्रेमाचे घरकुलही मोठे
घर छोटे कौलारू जाहले
देव्हाऱ्यातील देवही सारे
घरोघरी, विभक्त जाहले
अंगणीचे झाड़ नारळाचे
आज पहा कुंडित लागले
प्रीतभाव ते महासागरी
छोट्या जलाशयी गुंतले
नाही कधीच बदलली धरा
ऋतुचक्र अजुनही चालले
नाही बदलली जलधारा
तिथेच तृप्तती तहानलेले
वृक्षही देती नित्य साऊली
तिथेच विसावती श्रमलेले
अंतर्मुख हो रे महामानवा
पंचभूतही, नाही बदलले
सत्यार्थ एकची जीवनाचा
येता,जाता रे हात मोकळे
कुठली प्रीती कुठली भक्ती
मन भौतिक सुखात गुंतलेले
नाती इथली सारी व्यवहारी
बीजांकुर बोनसायी रुजलेले
— वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १७०
१७ – ७ – २०२२
Leave a Reply