नवीन लेखन...

बोथट बहिष्कारास्त्र ?

चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोर्‍यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे सुरू झाले होते. रेल्वेसह अन्य सरकारी आस्थापनांनी याआधी चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करत तसेच भारताच्या सीमांशी सीमा भिडलेल्या देशांतील परकीय गुंतवणुकीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात केली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले तीन करार स्थगित करून महाराष्ट्रानेही या अर्थयुद्धात आपला सहभाग नोंदवला. नागरिकांनीही सरकारला साथ देत #BoycottChina म्हणजेच चिनी वस्तू-उत्पादनांवर बहिष्काराची मोहीम सुरु करून चीनवर बहिष्कारास्त्राचा मारा केला. पण, जशा सीमेवरील कलह निवळन्याच्या बातम्या येऊ लागल्या तशी या बहिष्कारास्त्राची धार बोथट होऊ लागल्याची दिसते आहे. दोन दिवसापूर्वी चिनी मालाची होळी करणार्‍यांच्या भडकलेल्या भावना आता काहीश्या शांत झाल्या.. सोशल मीडियावरील निषेधाचे सूरही बरेच थंडावले दिसत आहेत. इतकेच नाही तर, सरकारी पातळीवरही पुनरविचाराची गुऱ्हाळे सुरू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चीन विरोधातील आपला संताप हा केवळ क्षणिक होता का? असा प्रश्न उपस्थित होतो. आणि, या क्षणिक संतापातून, विरोधातून, बहिष्कारातून चीनची आर्थिक कोंडी होऊ शकते! असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा वेळी नेमके तथ्य आणि आपली त्यातील भूमिका ही आपण समजून घेणे नक्कीच जरुरीची आहे.

आठवडाभरापूर्वी चीनविरोधात संपूर्ण देशभर संताप उफाळला होता. ठीकठिकाणी चिनी वस्तूच्या होळ्या करून लोकांनी आपला राग व्यक्त केला. भावनिक दृष्ट्या विचार केला तर भडकलेल्या भावना शांत करण्यासाठी अशा प्रतिक्रिया योग्य म्हटल्या पाहिजे. मात्र त्यापलीकडे या आंदोलनांचे भवितव्य काय? किंबहुना, लोकांचा हा राग आणि सरकारची ही भूमिका किती काळ टिकेल ? याचाही विचार केला गेला पाहिजे. आजवरचा इतिहास बघितला तर चिनीमालाचा विरोध हा काही पहिल्यांदाच केला गेलेला नाही. स्वदेशीचा नारा देऊन आजवर अनेकदा हे बहिष्कारास्त्र बाहेर काढण्यात आलं आहे. नुकतेच २०१७ मध्ये चीनने डोकलाम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हाही अशाच चिनी मालाच्या होळ्या करण्यात आल्या होत्या.. मात्र सात आठ दिवसात वातावरण शांत झालं आणि आपण पुन्हा चिनी कंपनीचे मोबाईल, टीव्ही विकत घेतले. आपली, म्हणजेच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमी आहे. तसेच आपलं देशप्रेम हे फक्त सोशल मीडियावरच उतू जातं. त्यामुळेच भावनेचा पहिला जोर ओसरल्यानंतर आपल्याकडे बाजारपेठीय गणितेच अधिक प्रभावी ठरतात. दुर्दैवाने यावेळीही काही वेगळी अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. लोक जुने मोबाईल फोडून आणि दोनशे रुपयांच्या चिनी वस्तूंची होळी करून आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत. तर काही ‘मेड इन चायना’चा मोबाईल हाती धरून समाजमाध्यमांवर चिनी मालावर बहिष्काराच्या पोस्ट व्हायरल करण्यात धन्यता मानत आहेत. अर्थात, याला काही अपवाद असू शकतात! पण त्यांची संख्या बघितली तर चीनची आर्थिक कोंडी होण्याऐवजी त्यांचीच आर्थिक कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. आता हेच बघा ना, देशभर चिनी मालाची होळी सुरु असताना दोन दिवासापूर्वी भारतात लॉन्च झालेला चिनी कंपनीचा एक मोबाईल अवघ्या काही तासात “आऊट ऑफ स्टॉक” झाल्याची बातमी आहे. अर्थात, एकाद्या मोबाईलवर बहिष्कार टाकून चीनची आर्थिक कोंडी करता येणार नाही, तर त्यासाठी दीर्घपल्याचे नियोजन करावे लागेल.

आज आपल्या देशात असे एकही क्षेत्र नाही, जेथे चीनने घुसखोरी केलेली नाही. साध्या सुईपासून ते महागातल्या महाग इलेक्ट्रॉनिक वस्तूपर्यंत आपण चिनी उत्पादनावर अवलंबुन आहोत. आपल्या संस्कृतीचा, जीवनपद्धतीचा अभ्यास करून टाकाऊ पण आकर्षक आणि कमी किमतीच्या वस्तू विक्रीस आणून चिनी ड्रॅगनने भारतीय बाजारपेठेला विळखा मारला आहे. चीनची भारतातील गुंतवणूक डोळे पांढरे करणारी आहे. त्यामुळे हा विळखा तोडायचा असेल तर सर्वात आधी आपल्याला सक्षम व्हावे लागेल. एकेकाळी आपल्या देशात बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. त्याकाळी भारत स्वयंपूर्ण होता. सगळ्या वस्तू आपल्याच देशात निर्माण केल्या जात होत्या. परंतु जागतिकीकरणाच्या लाटेत लहान मोठे उद्द्योग धुळीस मिळाले आणि दिवाळीच्या पणत्यावरही चीनची मक्तेदारी झाली. ज्या वस्तू आपल्या देशात नाहीत त्या आयात करण्यात काहीही गैर नाही. रोजगार निर्मिती, विकासाला चालना देण्यासाठी चीनवरून कच्चा माल आयात करणेही चूक नाही. पण जेव्हा गणेशमूर्तीही चीनवरून आयात केल्या जातात तेव्हा आश्चर्य वाटते. ‘ गणेशमूर्तींही ‘मेड इन चायना’ कशाला? ‘ असा सवाल केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी नुकताच उपस्थित केला. त्या अनुषंगाने बघायचे झाले तर, आपण फक्त गणेश मूर्तीचं आयात करत नाही तर अगरबत्ती, प्लास्टिकचे सामान, साबण ठेवण्याचे डब्बे देखील आयात करतो ही वास्तविकता आहे. त्यामुळे आत्मनिर्भरता पेक्षा स्वावलंबनाकडे वळण्याची आज पहिली गरज आहे. आजही आपण कृतिशीलता दाखवली आणि १३५ कोटी भारतीयांनी एकमताने ठरवले तर चिनी कंपन्या, त्यांची उत्पादने भारतीय बाजारपेेठेतून हा हा म्हणता गायब झाल्याचे चित्र दिसू शकेल! पण इतकी निर्धारी वृत्ती आपल्याला आचरणात आणता येईल का ? हा मुख्य प्रश्न आहे.

चीनने सीमेवर आगळीक केली तर त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी आपलं सैन्य सक्षम आहे. मात्र आजच्या काळात युद्ध फक्त सीमेवर लढल्या जात नाही तर ते अनेक पातळ्यांवर लढल्या जाते.. आणि चीनसारख्या मस्तावाल देशाला धडा शिकवायचा असेल तर आर्थिक कोंडी हा एक राजमार्ग ठरू शकतो! पण हा मार्ग प्रत्यक्ष अंलबजावणीसाठी सहज सोपा नाही. त्यासाठी सगळी जनता चीनविरोधात पेटून उठली पाहिजे. सोशल मीडियावर पोस्ट करून देशप्रेम व्यक्त करणाऱ्या तरुणाईने आपलं स्किल डेव्हलप करून चिनी मालाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी तयार झालं पाहिजे. सरकारच्या भूमिकाही कोडग्या नाही तर रोखठोक असल्या पाहिजे. सीमेवरील युद्ध अल्पकाळ लढल्या जाते, मात्र एकाद्या देशाची आर्थिक कोंडी करायची असेल तर त्यासाठी दीर्घकाळ युद्ध लढण्याची मानसिकता ठेवावी लागते. म्हणून,खरोखरच चीनला आर्थिकदृष्ट्या पराभूत करायचं असेल तर फक्त भावनिक भूमिका न घेता भारताचे शाश्वत हित लक्षात घेऊन धोरणात्मक आणि दीर्घपल्याचं नियोजन करून जनमानसाचे चिनीमालावरील बहिष्कारास्त्र बोथट होणार नाही, यासाठी पाऊले उचललेल्या गेली पाहिजे.

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..