इ.स. १८०० पर्यंत भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले होते – महाराष्ट्रावर ब्रिटिशांचे राज्य यायला १८१८ पर्यंत उशीर झाला तो पेशवाई राज्यातील नाना फडणवीस सारख्या कार्यक्षम लोकांमुळे. १८१८ मध्ये ब्रिटिशांचे राज्य आले तरीही लोकांच्या मनात छत्रपती आणि त्यांचे पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते. ब्रिटिशांना सतत त्याची धास्ती होती. यासाठी ब्रिटिशांनी जी योजना बनवली तिचे दर्शन त्यांच्या १८५० नंतरच्या कारवायांमध्ये दिसते. या योजनेचे ३ मुख्य भाग दिसतात –
१) हिंदू लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडणे. हिंदू संस्कृती / इतिहास / व्यवस्था यांच्याबद्दल द्वेष पसरवणे. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक ब्राह्मणी धर्म (Brahminical Religion) असे नाव देणे – अस्पृश्यतेसारख्या मुख्यत: इस्लामी शासनकाळात सुरू झालेल्या (उदा. मुस्लिम व्हायला नकार देणाऱ्या लढाऊ जमातीला गावकुसाबाहेर ढकलणे, त्या जातीचे रक्षणाचे काम काढून घेऊन चामड्याचे काम देणे, अशाच कारणासाठी मूळ ब्राह्मण असलेल्या एका जमातीला मैलासफाईचे काम करायला भाग पाडणे इ.) प्रथेसाठी हिंदूधर्माला दोषी ठरवणे. ब्रिटिशांशी निष्ठा असलेल्या लोकांना शिक्षण, प्रोत्साहन देऊन त्यांना हिंदूधर्म आणि ब्राह्मण यांच्यावर टीका करायला – द्वेष पसरवायच्या कामाला लावणे. पेशवाईचा संबंध वर्णव्यवस्था आणि अन्याय यांच्याशी जोडून “ब्रिटिशांनी यातून आपली मुक्तता केली” असा समज लोकांच्या मनात बसवणे.
२) ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे – हिंदू धर्मापासून वरील प्रकारे बाजूला पडलेल्या, द्वेष करू लागलेल्या लोकांना ख्रिस्ती करणे, ज्यामुळे लोकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल परकेपणाची भावना राहणार नाही. अहमदनगर जिल्हा हा या प्रयोगासाठी सर्वप्रथम निवडला गेला. – तिथे सिंथिया फेरार या मिशनरी महिलेमार्फत विशेषत: महार या जातीला ख्रिस्तीकरणासाठी लक्ष्य बनवले गेले. वर उल्लेख केलेल्या एका ब्रिटिशनिष्ठ समाजसुधारकाने या महिलेला मदत केल्याचे उल्लेख त्यांच्या लेखनात येतात.
३) ब्रिटिशांशी निष्ठावान रहाणे कसे फायद्याचे हे लोकांना दाखवत रहाणे – भारतीय संस्कृतीला नावे ठेवणाऱ्या, जातींमध्ये फाटाफूट / द्वेष पसरवणाऱ्या लोकांचे सत्कार, त्यांना किताब / पदव्या देणे, सरकारी कामांचे ठेके / कंत्राटे देणे. एक मोठे उदाहरण म्हणजे कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ, १८१८ साली पुणे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर छत्रपती प्रतापसिंह यांना सुरक्षित साताऱ्याला पोचवण्यासाठी पेशव्यांचे सैन्य चाकणकडून सासवड घाटमार्गे साताऱ्याला जाताना ब्रिटिशांच्या मद्रासी सैनिकांची एक तुकडी त्या मार्गाने शिरूरहून पुण्याला जात होती. मराठी सैन्य मोठे असल्यामुळे या तुकडीने कोरेगाव भीमा या गावात घुसून आडोश्याने या सैन्यावर गोळीबार केला. हा गोळीबार मराठा सैन्यापैकी थोड्या लोकांनी अंगावर घेऊन दिवसभरात पूर्ण सैन्य सासवड घाटाच्या दिशेने निघून गेले. यात ब्रिटिशांच्या मद्रास रेजिमेंटचे काही सैनिक आणि काही मराठी सैनिक मारले गेले. या चकमकीला जवळजवळ ३३ वर्षे होऊन गेल्यावर ब्रिटीशांनी विजयस्तंभ उभारला. त्यांवर स्पष्ट लिहिले आहे – (ब्रिटिश) “सरकारशी निष्ठा बाळगणाऱ्या लोकांचे बहुत काळपर्यंत नाव व्हावे म्हणून हा स्तंभ उभारला आहे”. पुढे यालाच “शोषितांचे अन्यायी संस्कृतीशी झालेले युद्ध” असे धडधडीत खोटे रूप देऊन लोकांना दरवर्षी ०१ जानेवारीला या स्तम्भापाशी जाऊन ब्रिटिशांचा विजय साजरा करायला प्रोत्साहन दिले गेले. प्रत्यक्षात शिवाजी महाराजांपासून मराठी सैन्यात सर्वजातींचे सैनिक लढत असत हा इतिहास आहे – तो इथे लपवला गेला. महाराष्ट्रातील काही महान समाजसुधारकही या फसवणुकीला बळी पडले होते.
हे लिहिण्याचे कारण – आजही या तीनही प्रकारची फसवणूक भारतीय – मराठी लोकांच्या लक्षात आलेली नाही. ब्रिटिश गेले तरीही स्वत: मराठी माणूस कधी पुरोगामित्वाच्या नावाखाली तर कधी समतेच्या नावाखाली स्वत:च्याच सांस्कृतिक ओळखीपासून दूर जात आहे – जन्माधारित जातिद्वेषालाच शहाणपणा समजतो आहे. जी गोष्ट ब्रिटिशांच्या फायद्याची होती – तीच आज भ्रष्ट राजकारण्यांच्या फायद्याची आहे. मतदानाचे गणित जाती-जातींना फोडून सोपे होते – लोक देशाच्या हिताला सहज विसरतात.
— दिपक पुरोहित
नमस्कार.
लेख आवडला.
– १८३९ मध्ये किंवा त्या सुमारास शनवारवाडा जळून खाक झाला. आपोआप जळाला की ब्रिटिशांनी मुद्दाम अंतस्थ हेतूने तो आतून (hidden) फूस लावून जाळविला ? जरी १८१८ मध्ये पेशव्यांचे राज्य संपले होते, तरी पेशवा ( दुसरा बाजीराव ) जिवंत होता ( मग भले तो बिठूरला का असेना) , तसेच , छत्रपतीही , नामधारी का असेतना, पण होते. इंग्रजांना मराठ्यांची अजूनही भीती वाटत होती. मराठी अस्मिता जागृत व एकत्रित होण्याचे महत्वाचे जे ठिकाण ( symbol) असू शकत होते, ते म्हणजे म्हणजे शनवारवाडा. तोच जळून खाक झाल्यामुळे, तो symbol च नाहीसा केला गेला.
– (१८५७ नंतर भारतात इंग्रजांनी कायकाय केले, हा स्वतंत्र विषय असल्यामुळे, त्याला येथे स्पर्श केलेला नाही)
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक