सामान्य व्यवहारात आपण ज्या गोष्टीला ज्ञान असे म्हणतो त्याला शास्त्रात बाह्य जगताची जाणीव असे म्हटल्या जाते. या जगातील व्यवहारासाठी लागणाऱ्या समस्त कौशल्यांना भारतीय संस्कृतीत अविद्या असे म्हटले जाते. विद्या हा शब्द भारतीय संस्कृती फार वेगळ्याच अर्थाने वापरला जातो. सा विद्या या विमुक्तये ! या शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे विद्या ती जी मुक्तीचा आधार होते. या न्यायाने अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या हीच विद्या होय.
व्यवहारात उपयोगी पडणारे ज्ञान या अर्थाने जी विद्या तिला शास्त्रात वेगळ्या अर्थाने उपाधी असे म्हणतात. त्यालाच आपण पदवी असे म्हणतो. या उपाधीने माणूस खरे तर बंदिस्त होत असतो. आपल्या जवळ इतक्या आहेत याचाच अहंकार होऊ शकतो. अशा स्वरूपात अहंकाराचा बंध न देणाऱ्या आत्मविद्येलाच शास्त्रात महाविद्या असे म्हणतात. व्यवहारातील ज्ञानाला विद्या संबोधिले तर या ब्रह्मविद्येला, अध्यात्मविद्येला महाविद्या असे म्हणतात. या महाविद्येच्या द्वारे ज्या ब्रह्माचे निदर्शन केले जाते अर्थात ज्याच्या स्वरूपाचे गुणगाण केले जाते त्या परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीगणेशांना या महाविद्येचे स्वामी या अर्थाने महाविद्याधीश असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply