माझ्या दुसऱ्या जहाजावर मी फोर्थ इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो. जहाजासाठी लागणारे इंधन ज्याला शिपिंग इंडस्ट्री मध्ये बंकर फ्युएल असे सुद्धा म्हटले जाते, यामध्ये हेवी फ्युएल ऑइल म्हणजे क्रूड ऑइल पेक्षा थोड्या चांगल्या प्रतीचे ऑइल, जे रिफायनरी मधून फिल्टर होणारे काळे तेल असते ज्याला इंजिन मध्ये वापरण्याअगोदर जहाजावर प्यूरिफाय करून त्यातील पाणी आणि कचरा वेगळा करून सुमारे 125 °c पेक्षा जास्त गरम करावे लागते. तसेच डिझेल किंवा मरीन गॅस ऑइल अशा प्रकारच्या इंधनांचा समावेश असतो.
जहाजावर चीफ इंजिनियर सह फोर्थ इंजिनियरची बंकर घेण्याची जवाबदारी असते, त्यासाठी लागणारे पेपर वर्क आणि तयारी फोर्थ इंजिनियरला करावी लागते. जहाजावर इंधन किंवा बंकर घेण्यासाठी वेगवेगळ्या टाक्या असतात, हेवी फ्युएल ऑइल आणि डिझेल साठी वेगवेगळ्या आकारमानाच्या टाक्या असतात. जहाजात बॉयलर, मेन इंजिन आणि जनरेटर हेवी फ्युएल ऑइल आणि डिझेल अशा दोन्ही वर चालवता येण्याची सोय असते. परंतु डिझेल आणि हेवी फ्युएल ऑइल यांच्या किमतीत जवळपास दीडपटीचा फरक असतो. हेवी फ्युएल ऑइल 400 usd तर डिझेल 600 usd प्रति टन या किमतीत मिळतं असतं. एखाद्या मध्यम जहाजाला एका दिवसाला साधारण 35 ते 40 टन इंधनाची म्हणजेच, एका तासाला जवळपास 1500 लिटर पेक्षा जास्त इंधनाची समुद्रातून पुढे जाताना आवश्यकता असते. एका दिवसाकरिता भारतीय रुपयात हिशोब करून पाहिले तर एक जहाज खोल समुद्रात चालवण्यासाठी तब्बल वीस लाख रुपयांपेक्षा जास्त इंधन लागते. जहाज कुठून कुठे किंवा किती अंतर जाणार आहे त्याप्रमाणे जहाजावर इंधन पुरवले जाते 500 टनांपासून ते 2500 टन म्हणजे जवळपास दीड कोटी रुपयांपासून ते आठ कोटी रुपये किमतीचे इंधनाचा एका वेळेला पुरवठा केला जातो. बंकर घेण्यापूर्वी कोणत्या टाकी मध्ये किती बंकर घ्यायचे याचे नियोजन केले जाते. टाकीमध्ये किंवा जहाजावर किती बंकर आले हे मोजण्यासाठी प्रत्येक जहाजावर एक तक्ता दिलेला असतो मेजर टेप ने टाकीत तळापासून किती इंधन आहे ते मोजून त्याचे आकारमान काढले जाते. हल्ली जहाजांवर टाकीत किती इंधन आहे ते कॉम्पुटर वर ऑटोमॅटिकली कळण्याची सोय सुद्धा आहे.
जहाजावर बंकर किंवा इंधन पुरवठा करण्यासाठी लहान लहान बार्जेस येतात किंवा काही जेट्टीवर पाईप लाईन द्वारे सुद्धा पुरवठा केला जातो. बहुधा बंकर बार्जेस द्वारेच पुरवठा होत असतो. जिब्राल्टर, माल्टा, सिंगापूर, रोटरडॅम, इस्तंबूल यासारख्या पोर्ट वर खासकरून बहुतांश बंकर पुरवठा केला जातो.
बंकर बार्ज जहाजाच्या बाजूला येऊन जहाजाला बांधल्या जातात, जहाजावरील आणि बंकर बार्ज वरील टाक्यांमध्ये किती इंधन आहे याची अगोदर मोजणी केली जाते, इंधनाची चोरी किंवा पुरवठा करताना होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी बंकर सर्वे करणाऱ्या म्हणून काही कंपन्या सेवा पुरवत असतात.
आमचे जहाज इटलीहुन इस्तंबूल कडे निघाले होते जाताना माल्टा बेटा जवळ 400 टन हेवी ऑइल आणि 100 टन डिझेलचा पुरवठा होणार होता. सकाळी दहा वाजता जहाजाने नांगर टाकला तासाभरात बंकर बार्ज सुद्धा येऊन पोचली. आमच्या जहाजावर असलेल्या टाक्यामध्ये असलेला साठा तपासून झाल्यावर चीफ इंजिनियरने खाली बंकर बार्ज मध्ये जाऊन त्यांच्या टाक्यातील इंधन साठा तपासून पहायला सांगितले. समुद्र थोडासा अशांत होता, जहाज आणि बंकर बार्ज दोन्हीही हेलकावत होते, पायलट लॅडर किंवा शिडीने बंकर बार्ज वर उतरणे शक्य नव्हते. कॅप्टनला चीफ इंजिनियरने सांगितले की तपासणी साठी बार्ज मध्ये जाणे शक्य नाही, कॅप्टन म्हणाला बंकर पुरवठा पूर्ण झाल्यावर त्यात काही तफावत किंवा कमी जास्त पुरवठा झाल्यावर त्याची कोण जवाबदारी घेईल त्यापेक्षा फोर्थ इंजिनियरला क्रेन द्वारे बास्केट मधून खाली पाठवू या असे ठरले. त्यानुसार मी बास्केट वर उभा राहिलो आणि त्या बास्केटला क्रेन च्या साहाय्याने जहाजावरुन बंकर बार्ज वर नेण्यासाठी वर उचलले जहाज हेलकावत होते त्यामुळे क्रेन ने उचलेले बास्केट घड्याळातील दोलका प्रमाणे इकडून तिकडे हलायला लागले. जहाजाच्या डेकवर एबी ने बास्केट ला दोरी बांधली होती तिच्या साहाय्याने बास्केट जास्त हलू नये म्हणून तो आटोकाट प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे माझा मनात क्रेनने बास्केट अडकवले आहे तो स्टील चा वायर रोप तुटला तर वरून पन्नास फुटावरून खाली लोखंडी बार्ज वर आपण आपटलो तर काही जिवंत राहणार नाही अशी शंका आली . पण मी बार्जवर सुखरूप पोचलो. खाली गेल्या गेल्या बार्ज च्या चीफ ऑफिसरने सिगारेटचे पाकीट पुढे केले, मी स्मोक करत नाही सांगून त्याला लवकरात लवकर मला टाक्यामधील लेव्हल दाखवून मोकळे करायला सांगितले.
तपासणी करून झाल्यावर पुन्हा एकदा बास्केट द्वारे जहाजावर पोचलो. सेकंड इंजिनियर हसत हसत चीफ इंजिनियरला बोलायला लागला की आपला चार साब बार्ज वाल्याकडून दोन हजार डॉलर्स तरी नक्कीच घेऊन आला असेल, त्याचे खिसे तपासून बघायला पाहिजेत. पाचशे टन पैकी कमीत कमी दहा टन म्हणजे दहा हजार लिटर इंधन कमी देऊन त्यातील हिस्सा म्हणून मला बार्ज कडून पैसे मिळाले असे सेकंड इंजिनियरला मस्करीत म्हणायचे होते.
काही बंकर सप्लाय करणाऱ्या कंपन्या आणि जहाजावरील अधिकारी व कर्मचारी अशा प्रकारचे उद्योग करत असतात. हजार टन इंधनापैकी पंधरा वीस टन इंधन कमी मिळून सुद्धा, जहाजावर मिळालेले इंधन योग्य प्रमाणात आहे असे दाखवले जाते, जहाज हेलकावत असेल तर टाकीतील इंधनाची योग्य ती पातळी मिळतं नाही असे सांगून संधीचा फायदा उठवला जातो. जोपर्यंत योग्य पातळी कळते तोपर्यंत जहाज खूप पुढे निघून आलेले असते.
बंकर बार्ज कडून सुद्धा इंधन पुरवठा सुरु असताना त्या पाईप मध्ये कॉम्प्रेस एअर म्हणजे उच्च दाबाची हवा सोडली जाते, 100 मिली दूध आणि कॉफी पासून जसा कॉप्युचीनो चा 200 मिली चा मग भरला जातो तसाच प्रकार इंधन देताना होतो, हवेचे बूड बुडे सोडल्याने टाकीत गेलेल्या इंधनाची पातळी वर येते व जेवढे इंधन असेल त्यापेक्षा जास्त इंधन टाकीत भरले जातेय असा भास होतो.
जेव्हा दीड कोटी पासून ते आठ दहा कोटी पर्यन्त इंधनाचा पुरवठा काही तासात करायचा असतो त्यावेळी असे चोरीचे किंवा फसवणूक करणारे प्रकार नेहमी घडत असतात.
आमच्या कंपनीकडून योग्य विश्वासू व खात्रीशीर बंकर सप्लायर कडूनच नेहमी बंकर घेतले जात असल्याने चोरी किंवा फसवणूक तसेच लाच देण्याघेण्याचे प्रकार आजपर्यंत कुठल्याही जहाजावर बघितले किंवा ऐकले नाहीत.
बंकर घेणे ही एक मोठी जवाबदारी आणि त्यापेक्षा ते घेत असताना समुद्रात एक थेंब सुद्धा पडला गेला नाही पाहिजे याची दक्षता घेतली जाते, कधी कधी बार्ज वरून जहाजाला जोडलेला पाईप लीक होतो तर कधी कधी ज्या टाकीत बंकर घायचेये ती भरून ओव्हरफ्लो व्हायला लागते. समुद्रात ऑइल गेले रे गेले की चीफ इंजिनियरसह ड्युटी वर असलेल्याना सरळ जेलची हवा खायला पाठवले जाते, युरोप आणि अमेरिकेतच नाही तर संपूर्ण जगात ऑइल पोल्युशन चे कायदे खूप कडक असून त्यातील शिक्षा पण तेवढ्याच कडक आहेत. बंकर चालू झाल्यापासून संपेपर्यंत चीफ इंजिनियर आणि फोर्थ इंजिनियरला काही केल्या स्वस्थ बसता येत नाही.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply