व्यंग चित्रकार विकास सबनीस यांचा जन्म १२ जुलै १९५० रोजी झाली.
बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण हे विकास सबनीस यांचे आदर्श होते. विकास सबनीस यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये कलेचं शिक्षण घेतल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंग्यचित्रकलेचा प्रभाव असल्याने कुठल्याही ॲड एजन्सीत वगैरे काम न करता स्वतंत्र कार्टूनिस्ट म्हणून काम करू लागले. त्यांनी ‘मार्मिक’मध्ये १२ वर्षं काम केलं.
शिवसेनेचा पक्ष म्हणून उदय झाला आणि मा.बाळासाहेबांची जबाबदारी वाढली. मग त्यांनी मार्मिकची जबाबदारी विकास सबनीस यांच्यावर सोपवली. मा.बाळासाहेबांनी विकास सबनीस यांच्या ५० व्या वाढदिवशी स्वतः शब्दांकन केलेलं मानपत्र देऊन सत्कार समारंभ आयोजित केला होता. विकास सबनीस हे गेली अठ्ठेचाळीस वर्षे अर्कचित्रं, व्यंगचित्रं काढत होते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एखादी घटना घडली, एखादी व्यक्ती भेटली की, त्यांच्या मनात यातून कसं चित्र निर्माण होईल याचा विचार करून ते टिपणं काढून ठेवत असत. मा.विकास सबनीस व्यंगचित्रांद्वारे अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांतून राजकीय टिप्पणी केली असून, परदेशातील काही नियतकालिकांमध्ये तसेच इंग्रजीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रोजगारविषयक साप्ताहिकातही विविध विषयांवरील त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलताना मा.विकास सबनीस म्हणत असत, मी जे यश मिळवलंय, त्यात बाळासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे.
बाळासाहेबांना उत्कृष्टतेचा ध्यास होता. व्यंग्यचित्रामध्ये एकही त्रुटी आवडत नसे. ॲनॉटॉमीबाबत ते काटेकोर असत. अफाट कल्पनाशक्तीचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. व्यंग्यचित्रकला इतर कलावंतांनीही आत्मसात करावी, यासाठी त्यांची धडपड असे. त्याचं मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं आणि विचारांमध्ये स्पष्टता होती. त्यामुळे त्यांची भाषणं आजही आपल्या स्मरणात आहेत आणि त्यांची कला आपल्याला नवं काही करण्याची प्रेरणा देते. भाषा आणि रेषा या दोन्ही गोष्टींवर त्यांची कमांड होती. विकास सबनीस यांचे ‘व्यंगनगरी’ हे राजकीय व्यंगचित्रांचे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे.
विकास सबनीस यांचे २८ डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply