नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply