माणसाच्या जीवनात चढ-उतार हे असतातच. कोण एका वर्षांत करोडपती होतो, तर कधी कुणाच्या धंद्याचं दिवाळं निघतं. शोमन राज कपूरचं तसंच घडलं होतं. ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने तो खचून गेला होता. डोक्यावर भरमसाठ कर्ज झालं होतं. एक चांगला चित्रपट करण्यासाठी त्यानं पाण्यासारखा पैसा वापरला होता. सहा तासांचा झालेला चित्रपट कात्री लावून त्यानं तो साडेतीन तासांचा केला होता.
दोन वर्षांनी त्यानं पुन्हा नव्याने चित्रपट निर्मितीची तयारी केली. त्या चित्रपटाचं नाव होतं ‘बाॅबी’. या चित्रपटातील एका गीतासाठी त्याला नवीन उमदा गायक हवा होता. शोध घेताना, एका मंदिरात त्याला भजन गाणारा नरेंद्र चंचल भेटला. त्याच्या आवाजात वेगळीच जादू होती. ‘बाॅबी’ मधील त्यानं घातलेलं ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो…’ हे गाणं फारच गाजलं. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर यशस्वी झाला. ‘मेरा नाम जोकर’चं अपयश कोट्यावधी रुपयांचं उत्पन्न मिळून धुवून निघालं.
‘बाॅबी’च्या यशानंतर नरेंद्र चंचलकडे अनेक निर्मात्यांनी धाव घेतली. ‘आशा’ चित्रपटातील ‘तु ने मुझे बुलाया शेरावालीये…’, ‘बेनाम’ मधील ‘मैं बेनाम हो गया..’ हे गाणं त्यानं पडद्यावर स्वतःच गायलं होतं. चित्रपटातील शेवटचा क्लायमॅक्स याच गाण्यावर होता.
राजेश खन्नाच्या ‘अवतार’ या कौटुंबिक चित्रपटातील शबाना आझमी सोबतचं ‘चलो, बुलावा आया है, माता ने बुलाया है…’ हे वैष्णोदेवीचा नवस फेडण्यासाठी चित्रीत केलेलं गाणं चित्रपटाच्या उत्तुंग यशाला कारणीभूत ठरलं. कारण या गाण्याचे चित्रीकरण प्रत्यक्ष वैष्णौदेवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन केलं होतं. असंख्य पायऱ्या राजेश खन्ना व शबाना आझमी चढून जाताना, आपणदेखील त्यांच्या समवेत आहोत, असा भास हे गाणं पहाताना होतो.
‘अवतार’ मधील या गाण्यानंतर नरेंद्रने काही चित्रपट केले. प्रत्येक गायकाचा एक कालावधी असतो, तसंच यांच्याबाबतीत देखील झालं. १९७३ ते १९९४ पर्यंत चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीनंतर नरेंद्र पुन्हा जिथून आला होता, तिथे गेला व भजनात रमला.
माझा गायक मित्र, हिम्मतकुमार याने काही वर्षांपूर्वी नरेंद्र चंचल बरोबर शो करण्याचे ठरविले होते. तशी बोलणी देखील झाली होती. परंतु दुर्दैवाने तो शो काही होऊ शकला नाही. अन्यथा पुण्यातील रसिकांना नरेंद्र चंचलने आपल्या आवाजाने नक्कीच जिंकले असते…
नवीन पिढीला या गायकाबद्दल माहिती नाहीये. आता तर चित्रपटात भक्तीगीतं नसतातच. आवडी निवडी बदलून गेल्या. ऐंशी वर्षांच्या जीवनात त्यांच्या आईमुळे नरेंद्र भक्तीरसात न्हाऊन निघाले. गेले काही महिने ते आजारी होते.
इथे येणाऱ्याला कधी ना कधी जायचंच असतं. फक्त वाट पाहिली जाते, ती ‘बुलावा’ येण्याची! नरेंद्र चंचलला मातेचा ‘बुलावा’ आला, आणि तो आपल्यातून निघून गेला…
जेव्हा कधी नवरात्रात ‘चलो, बुलावा…’ हे गाणं कानावर पडेल तेव्हा नरेंद्र चंचलची आठवण आल्याशिवाय रहाणार नाही….
– सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
khupach chhan dhanyawad.