रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचा जन्म २९ डिसेंबर १७६६ रोजी स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅकिन्टॉश हे केमिस्ट होते. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. कामावरून घरी आल्यानंतर ते रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटचा शोध लावण्यास सुरुवात केली. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे.
नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. लोकरीच्या दोन अस्तरांना वितळवलेल्या रबरने जोडले आणि अस्तर शिवून कोट बनवला. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.
चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल. चार्ल्स मॅकिन्टॉशचा हा पहिलावहिला रेनकोट जगभरात प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर मूळ रेनकोटमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं २५ जुलै १८४३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट