विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चि.वि.जोशी. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून १९११ मध्ये बी. ए. आणि १९१६ मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. १९२० सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. १९२८ पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. मा.चि.वि.जोशी यांचे २१ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply