पन्नास वर्षांपूर्वी मी लहान असताना, मुंबईला पोलीस खात्यात असलेले माझे धाकटे काका पुण्याला आमच्या घरी येताना न चुकता ‘मगनलाल चिक्की’चं एक पॅकेट आणत असत. त्या केशरी रंगाच्या पॅकेटमध्ये प्लॅस्टीकच्या पेपरमध्ये पॅक केलेली चिक्की असे. पॅकेटवरती गोलाकार डायकट केल्यामुळे आतील चिक्की कोणत्या प्रकारची आहे, ते बाहेरून सहज कळत असे.
त्या चिक्कीच्या सोळा वड्या तासाभरातच संपून जात असत. मात्र चिक्कीची ती भन्नाट चव दिवसभर जिभेवर रेंगाळत राही.. मुंबईहून कोणीही आलं की, ‘मगनलाल चिक्की’चा खाऊ हे समीकरण बरेच वर्ष चालू होतं..
दहावीला असताना पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यावर समजले की, ‘मगनलाल चिक्की’ ही कोणत्याही रेल्वे स्थानकावरील स्टाॅलवर मिळू शकते..
१९७७ साली आम्ही चार मित्रांनी मुंबईची पहिली सफर केली. त्यावेळी लोणावळा स्टेशनवर गाडी थांबल्यावर, चिक्की विकणारे गर्दीने दिसू लागले. त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की पॅकेट्सची चळत असायची. शेंगदाणा, डाळ, खोबरा, तीळ, काजु, बदाम, क्रश, इ. असंख्य प्रकारच्या बाॅक्सेसने त्यांच्या खांद्यावरची पिशवी भरलेली दिसायची. त्याकाळी ५ रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत त्यांची किंमत असायची.
व्यवसायाच्या निमित्ताने मी मुंबईला कधी एशियाडमधून तर कधी रेल्वेने जात होतो. तेव्हाही मगनलाल चिक्की विकणारे दिसत होते.. फक्त महागाईमुळे चिक्कीचे दर वाढलेले होते..
कधी मित्रांबरोबर लोणावळ्याला फिरायला गेलेलो असताना तिथे मगनलाल चिक्कीचं मोठं दुकान पाहिलं. आवडणाऱ्या चिक्कीची पॅकेट्स खरेदी केली आणि ती खाताना पुन्हा बालपण आठवलं..
लोणावळ्याचं हवामान चिक्की व्यवसायाला पूरक असल्याने तिथे अनेक चिक्कीच्या कंपन्या वर्षानुवर्षे उत्पादन करताहेत.
आज ही लोणावळ्याची सुप्रसिद्ध चिक्की देखील उतारवयाला लागलेली आहे.. काळानुरूप माणसांच्या आवडी निवडी बदलत गेल्या. जिथं चिक्कीची दुकानं होती तिथं पिझ्झा बर्गरची, मॅकडोनल्डची आऊटलेट्स उभी राहिली आहेत. आता रेल्वेच्या प्रवासात चिक्की विकणारे क्वचितच दिसतात..
स्मार्ट मोबाईल्स आल्यापासून व्हाॅटसअपवर मुखवट्यामागच्या खऱ्या चेहऱ्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. तशाच एका क्लीपमध्ये चिक्की कशी केली जाते, त्याचे वास्तव चित्रण मी पाहिले.. त्यामध्ये एका हाॅलमधील फरशीवर, चिक्कीचं मिश्रण लाटणारे परप्रांतातील कामगार दिसत होते. ते अस्वच्छ वातावरण पाहून माझी चिक्कीवरील वासनाच उडून गेली..
शालेय जीवनात हवीहवीशी वाटणारी, अगदी कोणत्याही दुकानात, पानपट्टीवरही काचेच्या बरणीतून खुणावणारी चिक्की आता हद्दपार होऊ लागली आहे.. लोणावळ्याची ‘मगनलाल चिक्की’ ही काही वर्षांनंतर कोणे एके काळातील ‘दंतकथा’च होणार आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-१०-२१.
Leave a Reply